कोल्हापूर, २६ मे – ‘सेव्ह मेरीट सेव्ह नेशन’ या संस्थेच्या वतीने आरक्षणातून झालेली भरती रहित करण्याची मागणी पत्राद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. या संस्थेचे कोल्हापूर येथील डॉ. तन्मय व्होरा हे सदस्य आहेत.
त्यामुळे संतप्त झालेल्या मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी या संस्थेचे सदस्य असलेले डॉ. तन्मय व्होरा यांचा मराठा आरक्षणाला विरोध असल्याचा आरोप करत त्यांच्या सूर्या रुग्णालयातील फलक तोडला. डॉ. तन्मय व्होरा यांनी मराठा समाजाची क्षमा मागत मी जरी संस्थेचा सभासद असलो तरी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्राशी माझा संबंध नसल्याचे स्पष्ट केले. या वेळी पोलीस आणि आंदोलक यांच्यात झटापट झाल्यावर पोलिसांनी आंदोलकांना कह्यात घेतले.
२६ मे या दिवशी मराठा समाजातील कार्यकर्त्यांनी प्रथम डॉ. तन्मय व्होरा यांच्या रुग्णालयासमोर निदर्शने केली. नंतर काही कार्यकर्त्यांनी रुग्णालयात घुसून फलकाची तोडफोड केली. अचानक झालेल्या प्रकारामुळे कोरोनावर उपचार चालू असणारे रुग्ण, नातेवाईक, काम करणारे कर्मचारीही घाबरले. या सर्वांनी तात्काळ रुग्णालयाची सर्व द्वारे बंद केली. या वेळी तेथे उपस्थित असणार्या पोलिसांनी आंदोलकांना जिन्यातच रोखल्याने पुढील अनर्थ टळला.