वडिलांना कारमध्ये ‘सीट बेल्ट’ला बांधून न्यावा लागला स्वतःच्या मुलीचा मृतदेेह !

रुग्णवाहिकेच्या चालकाने ३५ सहस्र रुपये मागितल्याने हतबल वडिलांची कृती !

  • वारंवार अशा तक्रारी येऊनही असे प्रकार रोखता न येणे सरकारी यंत्रणांना लज्जास्पद ! असे अमानवी वर्तन करणार्‍यांना सरकारने कारागृहातच डांबले पाहिजे !
  • असे प्रकार रोखण्यासाठी सरकार राष्ट्रीय पातळीवर रुग्णवाहिकांच्या चालकांसाठी शुल्क का निश्‍चित करत नाही ?

कोटा (राजस्थान) – कोरोनामुळे मृत पावलेल्या स्वतःच्या मुलीचा मृतदेह घरी नेण्यासाठी एका रुग्णवाहिकेच्या चालकाने तब्बल ३५ सहस्र रुपयांची मागणी केली. त्यामुळे मृत मुलीच्या वडिलांना कारमध्ये ‘सीट बेल्ट’ला बांधून मुलीचा मृतदेह न्यावा  लागल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाला आहे.

याविषयी मृत मुलीचे मामा मधु राजा यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, त्यांच्या ३४ वर्षीय भाचीचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यानंतर ‘वॉर्ड बॉय’पासून ते रुग्णवाहिकेच्या चालकापर्यंत सर्वांनी आमच्याकडे पैशांची मागणी केली. ‘वॉर्ड बॉय’ने भाचीचा मृतदेेह ‘स्ट्रेचर’वरून रुणवाहिकेपर्यंत घेऊन जाण्यासाठी १ सहस्र रुपये मागितले. कसेबसा तो मृतदेह रुग्णवाहिकेपर्यंत आणल्यानंतर वेगवेगळ्या रुग्णवाहिकांच्या चालकांनी तो मृतदेह तिच्या घरापर्यंत नेण्यासाठी १८ सहस्र ते ३५ सहस्र रुपयांपर्यंत मागणी केली. यानंतर मृत मुलीच्या वडिलांनी स्वतःच्या मुलीचा मृतदेह कारच्या सीटवर ठेवून ते ‘सीट बेल्ट’ने बांधला आणि तो घरी घेऊन गेले. त्यांची मुलगी विवाहित असून तिला एक मुलगाही आहे.