अलीकडच्या काळात आधुनिक वैद्यकशास्त्र विकसित होऊन समाजात त्याचा मोठ्या प्रमाणात वापर होत गेला. सध्याच्या काळात लोप पावलेली अन्य नैसर्गिक वैद्यकीय शास्त्रे अन् आयुर्वेदीय ज्ञान लक्षात घेता अॅलोपॅथी मानवाला दिलासा देणारी पॅथी ठरली, असे म्हणता येईल. हिंदु धर्मात सांगितलेल्या प्राचीन उपचार पद्धतीनुसार उपचार करणारे उपलब्ध न झाल्यामुळे लोकांना अॅलोपॅथीचा आधार घ्यावा लागला. सध्या आयुर्वेद विरुद्ध अॅलोपॅथी असा वाद उफाळून आला आहे. सध्या आयुर्वेदाला राजाश्रय नाही. असे असूनही ही प्राचीन उपचार पद्धत शेकडो वर्षांपासून टिकून आहे, हे विशेष. आयुर्वेदाची श्रेष्ठता जगासमोर येण्यासाठी काही कालावधी लागेल. पूर्वीच्या ऋषिमुनींनी अत्याधुनिक उपकरणांविनाही अनेक कठीण शस्त्रक्रिया यशस्वी केल्या, त्याचा अभ्यास खरे तर ‘आधुनिक वैद्यकशास्त्रा’ने करणे अभिप्रेत आहे. दोन्ही शास्त्रांच्या उपचारपद्धतींचा उद्देश आणि लाभ भिन्न आहेत. जेव्हा अॅलोपॅथीच्या मर्यादा, दुष्परिणाम ठाऊक असूनही स्वार्थी आधुनिक वैद्याकडून चालवलेली रुग्णांची आर्थिक पिळवणूक पुढे येते, तेव्हा पूर्वीच्या काळी बरेच वैद्यबुवा नि:स्वार्थपणे आणि अचूकपणे करत असलेल्या रुग्णसेवेचे महत्त्व अधोरेखित होते.
अॅलोपॅथीच्या मर्यादा आणि अतिरेक !
आयसीएमने (इंडियन मेडिकल असोसिएशनने) खासगी रुग्णालयांना ‘उपचाराच्या वेळी स्टिरॉईड आणि प्लाझ्मा यांचा अधिक वापर करू नका.’ असे सांगूनही बर्याच खासगी रुग्णालयांनी या गोष्टी आवश्यकतेपेक्षा अधिक प्रमाणात चालू ठेवल्या आहेत. अॅलोपॅथीनुसार स्टिरॉईड हे काही कोरोनाग्रस्त रुग्णांना देणे अपरिहार्य आहे; पण त्याचे अतीगंभीर दुष्परिणाम पहाता अतिरेक होणार नाही, याची तारतम्याने, रुग्णाच्या स्थितीचा पूर्ण अभ्यास करून काटेकोर काळजी किती रुग्णालयांत घेतली जाते, असा प्रश्न पुढे येत आहे. काळ्या बुरशीची (म्युकरमायकोसिस) वाढ होण्याच्या विविध कारणांतील ते एक महत्त्वाचे कारण आहे. महाराष्ट्र सरकारच्या कोव्हिड टास्क फोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी सांगतात, ‘आपल्याला ठाऊक आहे, प्लाझ्मा हा ‘म्युटंट’ (उत्परिवर्तन, रचनेत किंवा गुणांत पालट) निर्माण होण्यासाठी कारणीभूत आहे; पण आपण अजूनही प्लाझ्मा वापरतो. महाराष्ट्रात कोविड टास्क फोर्सने एप्रिल मासातच ‘प्लाझ्मा थेरपी’ उपचारपद्धतीमधून वगळण्याची सूचना जारी केली होती. ‘काही उपचारपद्धतींवर निर्बंध घालावे लागतील. नाहीतर अधिक म्युटंट सिद्ध होतील आणि येणार्या काळात हानी सोसावी लागेल’, असे सांगण्यात येत होते. रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार, रुग्णांच्या नातेवाइकांची परवड आदी सर्व झाल्यावर त्याचा सर्वांना उपयोग नाही, हे पुढे आले. सध्या भारतात अनेक ठिकाणी लसींचे दोन डोस घेऊनही लोकांना कोरोना झाल्याचे समोर आले आहे. याचा अर्थ वरील सर्व उपचारपद्धती निरर्थक ठरल्या किंवा त्यांनी कुणाला जीवदान मिळाले नाही, असे नाही; परंतु सदासर्वकाळ सर्वांना कायमस्वरूपी त्या उपयुक्त नाहीत आणि त्याचा अतिरेक तर नाहीच नाही. हीच नेमकी अॅलोपॅथीची मर्यादा आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. कुणीही हे मान्य करील की, रोग नवीन आहे, त्याचे स्वरूप पालटत आहे. त्यामुळे सर्व गोष्टी सर्वांना नवीन आहेत. त्यामुळे कोरोना रुग्ण ‘प्रयोगशाळा’ बनले आहेत, हे गंभीर आहे. आता त्याही पुढे जाऊन त्याविषयीची आधुनिक वैद्यांची संवेदनशीलता जेव्हा संपते आणि त्यांच्यातील दायित्वशून्य अन् स्वार्थी वृत्ती जागी होते, तेव्हा अनेक प्रश्न उभे रहातात. त्याची उत्तरे कोण देणार, हा प्रश्नही ओघाने आलाच. कोविडसाठी वेगवेगळी खासगी रुग्णालये वेगवेगळ्या उपचारपद्धती वापरत आहेत. काही खासगी रुग्णालयांनी वाटेल ती देयके लावून प्रचंड पैसे कमावले; इतके की, त्यामुळे सरकारला त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी आदेश काढावा लागला. आतापर्यंत ४०० हून अधिक आधुनिक वैद्यांचा मृत्यू झाला आहे. योगगुरु रामदेवबाबा यांनी अॅलोपॅथीचे सर्व स्तरांवरील भयावह दुष्परिणाम आणि अॅलोपॅथीतज्ञांचा आयुर्वेदाविषयी असलेला द्वेष पाहून त्याला ‘वेडगळ विज्ञान’ म्हटले असेल, तर ते चूक नव्हे. रात्रंदिवस जीव धोक्यात घालून काम करणारे आधुनिक वैद्य आणि आरोग्य कर्मचारी यांचे योगदान अन् त्यांनी केलेला मोठा त्याग यामुळे न्यून होणार नाही; पण म्हणून आधुनिक विज्ञानाच्या विघातक दुष्परिणामांकडे दुर्लक्ष करून ते नाकारूनही चालणार नाहीत. पूर्वी केंद्र सरकारकडून अनुमती नाकारण्यात आलेल्या मध्यप्रदेश सरकारने ‘कोरोनील’ हे कोविडवरील पतंजलीच्या औषधांचे ‘कीट’ विनामूल्य वाटले आहे. आज सर्वच रुग्णालयांत होमिओपॅथी, फिजिओथेरपी, योग आणि आयुर्वेद यांचे काही उपचार कोरोनाग्रस्त रुग्णांवर केले जात आहेत, इथेच अॅलोपॅथीची मर्यादा स्पष्ट आहे.
आयुर्वेदाच्या ज्ञानाचा सन्मान करा !
योगगुरु रामदेवबाबा यांचे वक्तव्य हे आयुर्वेदाच्या वारंवार होणार्या अपमानाविषयीची आणि ही उपचारपद्धत विकसित करण्यासाठीची तळमळ या प्रेरणेतून आहे. सध्या आयुर्वेदीय ज्ञानापैकी केवळ काही प्रतिशत ज्ञान उपलब्ध आहे. उर्वरित काळाच्या ओघात लोप पावले आहे. त्यामुळे केवळ आयुर्वेदाच्या मर्यादा सांगण्याऐवजी त्यातील सखोल अभ्यास, गावोगावी असलेल्या पिढीजात तज्ञांच्या अनुभवाच्या ज्ञानाचे एकत्रीकरण करणे, प्राचीन ग्रंथांचा अभ्यास, त्यांतील विविध उपशाखांचा विकास आदी गोष्टी झालेल्या नाहीत, हे लक्षात घेतले पाहिजे. आयुर्वेदाचे मूळ दैवी उपचारांकडे, म्हणजेच अध्यात्माकडे जाते. यात दिनचर्या आणि योगाभ्यास यांसमवेत नामजप, मंत्रोपचार, स्तोत्रपठण, पोथीवाचन, धार्मिक विधी, करणी, भूतबाधा आदींवरील उपाय आदी अनेक गोष्टी येतात. त्याही पुढे जाऊन आयुर्वेदात रोगाचे मूळ कारण मागील जन्मातील कर्म सांगितली आहेत. अॅलोपॅथीत डोकेदुखीपासून कर्करोगापर्यंत रोगाचे केवळ तात्कालीक निवारण आहे. आयुर्वेदात रोग मुळासकट काढून टाकण्याची क्षमता आहे. आयुर्वेद अतिव्यापक आणि सर्वसमावेशक आहे. आयुर्वेदात तात्कालीक उपाय नाहीत, असा अपसमजही अज्ञानापोटी आहे. थोडक्यात अॅलोपॅथीच्या मर्यादा लक्षात घेऊन आयुर्वेदाचा अभ्यास करणे, ही काळाची आवश्यकता आहे !