तौक्ते चक्रीवादळातील आपद्ग्रस्तांना साहाय्य

शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांच्याकडून सर्जेकोटवासियांसाठी पाण्याची सोय

वैभव नाईक

मालवण – नुकत्याच झालेल्या चक्रीवादळाच्या तडाख्यात ग्रामीण भागातील वीजपुरवठाही खंडित झाला असल्याने किनारपट्टीतील गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. यामध्ये तालुक्यातील कोळंब, सर्जेकोट गावाचाही समावेश आहे. या गावाची पाण्याची समस्या समजताच शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी गावात तातडीने पाण्याचा टँकर उपलब्ध करून देत ग्रामस्थांच्या पिण्याच्या पाण्याची सोय केली.

देवगड फिशरमेन्स सोसायटीचे बोटमालकांना आर्थिक साहाय्य

देवगड – तौक्ते चक्रीवादळामध्ये देवगड बंदरातील ३ मासेमारी नौका बुडाल्या होत्या, तसेच ४ खलाशीही बुडाले होते. या वादळात मासेमारी नौकांची हानी झाली. या पार्श्‍वभूमीवर देवगड फिशरमेन्स सोसायटीने हानी झालेल्या तीनही नौकांच्या मालकांना प्रत्येक २५ सहस्र रुपयांचे साहाय्य केले असून या रकमेचा धनादेश नौकांचे मालक पांडुरंग कोयंडे, रघुनाथ कोयंडे आणि अक्षता निरज कोयंडे यांना सोसायटीचे अध्यक्ष द्विजकांत कोयंडे अन् अन्य सदस्य यांच्या हस्ते देण्यात आला.

लायन्स क्लबच्या वतीने तौक्ते वादळग्रस्तांना साहाय्य

मालवण – तौक्ते चक्रीवादळामुळे वायरी, भूतनाथ येथील ग्रामस्थांची मोठी हानी झाली. या पार्श्‍वभूमीवर लायन्स क्लब ऑफ मालवण यांच्या वतीने ग्रामस्थांना एकूण ४० ताडपत्री आणि मेणबत्त्या यांचे वाटप करण्यात आले.