भारतापेक्षा अमेरिकेवर १० पट कर्ज !
नवी देहली – भारतावर जगाच्या एकूण कर्जाच्या ३.२ टक्के कर्ज आहे. जगात बहुतेक देशांवर कमी-अधिक प्रमाणात कर्ज आहे. जगात सर्व देशांवर मिळून १०२ ट्रिलियन डॉलर (८ सहस्र ७१० लाख कोटी रुपयांहून अधिक) कर्ज आहे. जागतिक महासत्ता असणार्या अमेरिकेवर जगातील सर्वाधिक म्हणजे ३६ ट्रिलियन डॉलर (२ सहस्र ७५४ लाख कोटी रुपयांहून अधिक) इतके कर्ज आहे, हे विशेष ! हे प्रमाण जगाच्या तब्बल ३५ टक्के आहे. अमेरिकेनंतर चीन आणि जपान यांचा क्रमांक आहे. या सूचीत भारत सातव्या क्रमांकावर आहे. ‘वर्ल्ड ऑफ स्टॅटिस्टिक्स’ने आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या कर्जदार देशांची सूची प्रसारित केली आहे. त्यात ही माहिती देण्यात आली आहे.
१. जगातील दुसरा सर्वांत मोठा कर्जदार देश चीन आहे. चीनवर १४.६९ ट्रिलियन डॉलर्स (१ सहस्र १२३ लाख कोटी रुपयांहून अधिक) इतके कर्ज आहे. हे संपूर्ण जगाच्या कर्जाच्या १६.१ टक्के आहे.
२. तिसर्या क्रमांकावर जपान असून जगातील एकूण कर्जापैकी १० टक्के कर्ज जपानवर आहे. ते सुमारे १०.८ ट्रिलियन डॉलर्सपर्यंत वाढले आहे.
३. यानंतर ब्रिटन आहे. त्याच्यावर ३.६ टक्के कर्ज आहे. फ्रान्सचा वाटा ३.५ टक्के आणि इटलीचा ३.२ टक्के आहे.
४. कर्जामध्ये भारत सातव्या स्थानावर आहे. यानंतर जर्मनी (२.९ टक्के), कॅनडा (२.३ टक्के) आणि ब्राझिल (१.९ टक्के) यांचा समावेश आहे.