ब्राझिलच्या राष्ट्रपतीकडून कोरोना नियमावलीचा भंग केल्याने त्यांना दंड

भारतात कधी असे होऊ शकते का ?

ब्रासिलिया (ब्राझिल) – ब्राझिलचे राष्ट्रपती जेअर बोलसोनारो यांना कोरोना नियमावलीचा भंग केल्याने दंड ठोठावण्यात आला आहे. ‘मारान्हो शहरामध्ये राष्ट्रपती जेअर बोलसोनारो यांच्या उपस्थित एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते; मात्र या ठिकाणी नियमांची पायमल्ली झाल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांच्या विरोधात गुन्हा नोंद करणे योग्य आहे. कायदा हा सर्वांना समान आहे’, असे मारान्होचे राज्यपाल फ्लेव्हिओ डिनो यांनी सांगितले आहे. राष्ट्रपती बोलसोनारो यांना उत्तर देण्यासाठी १५ दिवसांचा अवधी देण्यात आला आहे. त्यानंतर दंडाची रक्कम निश्‍चित केली जाणार आहे.

यापूर्वी थायलंडचे पंतप्रधान प्रयुथ चान ओचा यांना सार्वजनिक ठिकाणी मास्क न घातल्याच्या प्रकरणी त्यांच्याकडून १४ सहस्र रुपयांचा दंड आकारण्यात आला होता. नुकताच थायलंडमध्ये मास्क न घालण्याच्या संदर्भातील गुन्ह्यासाठी दंड वाढवून ४७ सहस्र रुपये इतका करण्यात आला आहे.