‘तौक्ते’ चक्रीवादळामुळे हानी झालेल्यांना लवकरच साहाय्य घोषित करणार ! – उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री, महाराष्ट्र

मुख्यमंत्र्यांकडून सिंधुदुर्गातील हानीग्रस्त भागाची पहाणी

सिंधुदुर्ग – ‘तौक्ते’ चक्रीवादळामुळे सिंधुदुर्गातील किनारपट्टी भागाची मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे. या हानीचे पंचनामे करण्याचे काम युद्धपातळीवर चालू आहे. पंचनामे पूर्ण होताच राज्यस्तरावर आढावा घेऊन हानीग्रस्तांना साहाय्य घोषित केले जाईल, असे आश्‍वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली.

‘तौक्ते’ चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात झालेल्या हानीची पहाणी करण्यासाठी मुख्यमंत्री ठाकरे २१ मे या दिवशी सिंधुदुर्ग जिल्हा दौर्‍यावर आले होते. या वेळी त्यांनी  मालवण किनारपट्टीची पहाणी केली आणि चिपी विमानतळ येथे आढावा बैठक घेतली.

या वेळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी ‘तौक्ते वादळामुळे ज्या फळबागा, झाडे, विद्युत् वाहिन्या, घरे यांची हानी झाली आहे, त्यांचे पंचनामे करून अहवाल तात्काळ सादर करावा’, अशी सूचना केली. वादळात झालेल्या हानीसह भूमीगत विद्युत् वाहिन्या, धूप प्रतिबंधक बंधारे, चिपी विमानतळाचे काम यांविषयीही आढावा घेतला.

या दौर्‍यात मुख्यमंत्री ठाकरे यांच्यासह पालकमंत्री उदय सामंत, परिवहनमंत्री अधिवक्ता अनिल परब, खासदार विनायक राऊत, आमदार दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक, मुख्य सचिव सीताराम कुंटे उपस्थित होते.       मुख्यमंत्री ठाकरे पुढे म्हणाले, ‘‘वादळाची पूर्वसूचना मिळाल्याबरोबर यंत्रणा कार्यान्वित झाली होती. या वेळी अधिक प्रमाणात हानी झाली. अशाही परिस्थितीत कोरोना रुग्णालयांचा ऑक्सिजन पुरवठा खंडित होऊ दिला नाही. त्यासाठी धन्यवाद देतो. पंचनामे लवकर संपवून तात्काळ अहवाल पाठवावा, जेणेकरून कुणीही आर्थिक साहाय्यापासून वंचित रहाणार नाही. भूमीगत विद्युत् वाहिन्या, धूप प्रतिबंधक बंधारे यांचे जे प्रस्ताव केंद्राकडे आहेत त्याविषयी निश्‍चित पाठपुरावा केला जाईल. राज्यस्तरावरील प्रस्तावांना मार्गी लावण्यात येईल.’

कोरोनाच्या संभाव्य तिसर्‍या लाटेसाठी सिद्ध रहाण्याचे आवाहन  

‘कोरोनाच्या संभाव्य तिसर्‍या लाटेसाठी सिद्धता हवी. ‘मिशन ऑक्सिजन’च्या अंतर्गत जिल्ह्याला स्वयंपूर्ण करण्याच्या दृष्टीने ऑक्सिजनची निर्मिती करणारा प्रकल्प उभारण्यासाठी प्रयत्न करावेत. आरोग्य यंत्रणेला आवश्यक सर्व गोष्टी पुरवल्या जातील’, असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले. या वेळी पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, आमदार दीपक केसरकर यांनी जिल्ह्यातील समस्या मांडल्या.

जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी संगणकीय सादरीकरण करून हानीचा सविस्तर आढावा दिला. यामध्ये चक्रीवादळापूर्वीची सिद्धता, पूर्वसूचना, नागरिकांचे स्थलांतर, मासेमार नौकांची माहिती, तसेच घरे, सार्वजनिक मालमत्ता, शेती, बागायती, महावितरण आस्थापन यांच्या हानीचा समावेश होता. या वेळी अन्य संबंधित अधिकारी उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी संवेदनशील आहेत, ते योग्य ते साहाय्य करतील ! – मुख्यमंत्री ठाकरे

तौक्ते चक्रीवादळानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरात राज्याची हवाई पहाणी करून हानीभरपाई घोषित केली. या पार्श्‍वभूमीवर बोलतांना मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, ‘‘केंद्रशासनाच्या निकषानुसार तात्काळ साहाय्याचे आदेश यापूर्वीच दिलेले आहेत. एकूण आढावा घेतल्यानंतर आणखीही साहाय्य उपलब्ध करून दिले जाईल. पंतप्रधानांसमवेत झालेल्या बैठकीत वादळाच्या अनुषंगाने ए.टी.आर्.एफ्. आणि एन्.डी.आर्.एफ्. यांचे निकष जुने झाले आहेत, ते पालटण्याची गरज असल्याचे सांगितले आहे. ‘निसर्ग’ चक्रीवादळाच्या वेळी अधिक साहाय्य केले गेले. केवळ ‘पॅकेज’ घोषित करण्यावर माझा विश्‍वास नाही. हानीचा जो अहवाल येईल, त्यानुसार निकष ठरवून साहाय्य केले जाईल. चक्रीवादळामुळे झालेल्या हानीकडे पंतप्रधानांचे लक्ष वेधले आहे. पंतप्रधान संवेदनशील आहेत, तेही योग्य ते साहाय्य करतील. राज्यशासनाच्या वतीने आम्हाला जे जे करता येईल, ते सर्व साहाय्य करू.’’