भरतनाट्यम् या भारतीय शास्त्रीय नृत्यप्रकाराचा संशोधनपर प्रयोग करतांना नृत्य शिकणार्‍या साधिकांना प्रयोगापूर्वी, प्रयोगाच्या कालावधीत आणि प्रयोगानंतर आलेल्या अनुभूती

नृत्य आणि संगीत यांविषयी अद्वितीय संशोधन करणारे  महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय

भारतीय नृत्यप्रकारांतील सात्त्विकतेचा अभ्यास करण्याच्या दृष्टीने महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या माध्यमातून भरतनाट्यम् या नृत्यप्रकाराचा २१.३.२०२१ या दिवशी संशोधनपर प्रयोग घेण्यात आला. या वेळी भरतनाट्यम् शिकलेल्या साधिकेने अन्य साधिकांना भरतनाट्यम्मधील आरंभी करावयाचा नमस्कार, काही नृत्यमुद्रा आणि काही अडवू (टीप) शिकवले. या वेळी शिकवणारी साधिका आणि शिकणारे साधक यांच्यावर भरतनाट्यम्चा काय परिणाम होतो ?, हे यू.ए.एस. या उपकरणाच्या साहाय्याने अभ्यासण्यात आले. या प्रयोगात २ विदेशी आणि ४ भारतीय साधिका सहभागी झाल्या होत्या. या प्रयोगाचा कालावधी १ घंटा एवढा होता.

या प्रयोगात सहभागी झालेल्या साधिकांना प्रयोगापूर्वी, प्रयोगाच्या वेळी आणि प्रयोगानंतर आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.

(टीप : अडवू : पदन्यास (पायांच्या हालचाली), हातांच्या हालचाली आणि नृत्यहस्त (हाताने केल्या जाणार्‍या विविध मुद्रा) एकत्रितपणे करणे, याला अडवू असे म्हणतात. नृत्याचा श्री गणेशा अडवूंनी केला जातो.)

संगीत सदर ईश्‍वरप्राप्तीसाठी संगीतयोग

भरतनाट्यम् ही अभिजात शास्त्रीय नृत्यकलांपैकी एक आणि मूळची तंजावरची कला आहे. भरतनाट्यम्मधील भ म्हणजे भाव, र म्हणजे राग आणि त म्हणजे ताल ! भाव तेथे देव, या उक्तीप्रमाणे देवाला विविध रागांवर आधारित बोल आणि गीते यांनी तालात आळवणे, म्हणजेच या माध्यमातून देवाची भक्ती करणे, असे म्हटले जाते. सारांश रूपाने भरतनाट्यम् नृत्य करणे, म्हणजे देवाची भक्ती करणे, असे झाले, तरच नृत्यकाराला आत्मिक आनंदाची अनुभूती येऊ शकते आणि तो जेव्हा रंगमंचावर हे नृत्य करतो, तेव्हा प्रेक्षकांनाही ती अनुभूती येऊ शकते. हाच या नृत्यशैलीचा मुख्य उद्देश आहे. ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्याच्या उद्देशाने प्राचीन काळी भरतमुनींना प्रत्यक्ष भगवान शिवाचे शिष्य तंडुमुनी यांनी हे ज्ञान दिले. त्यांमुळे हे ज्ञान आणि नृत्य हे सर्व दैवी आहे.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाचे साधक नृत्य करतांना आणि शिकतांना याची अनुभूती घेत आहेत.

१. सौ. राधा मल्लिक, व्हॅन्कुवर, कॅनडा. 

१ अ. प्रयोगाच्या वेळी – हिपहॉप आणि भरतनाट्यम् ही दोन्ही नृत्ये शिकतांना त्यात पुष्कळ भेद असल्याचे लक्षात येणे : आज पहिल्यांदाच मी भारतीय शास्त्रीय नृत्यकलांपैकी एक असलेल्या भरतनाट्यम् या शास्त्रीय नृत्याचा प्राथमिक भाग शिकण्यासाठी आले. लहान असतांना मी हिपहॉप (विदेशी नृत्यप्रकार) हे पाश्‍चात्त्य नृत्य शिकण्यासाठी गेले होते. हिपहॉप आणि भरतनाट्यम् ही दोन्ही नृत्ये शिकतांना त्यात पुष्कळ भेद असल्याचे माझ्या लक्षात आले.

१ अ १. हिपहॉप प्रकार शिकतांना अहं अधिक जागृत होणे आणि नृत्याचा सराव झाल्यावर पूर्णपणे थकून जाणे : हिपहॉप नृत्यप्रकार शिकतांना माझा अहं अधिक जागृत होत असे. माझ्या नृत्यामुळे पहाणारे किती प्रभावित होत असतील ?, ते माझ्याविषयी काय विचार करत असतील ?, अशा प्रकारचे विचार माझ्या मनात सतत येत असत. हिपहॉप नृत्यप्रकाराचा सराव झाल्यावर मी पूर्णपणे गळून आणि थकून जात असे.

१ अ २. भरतनाट्यम् शिकतांना दैवी ऊर्जा अधिक प्रमाणात कशी मिळेल ?, याकडे लक्ष जाऊन दैवी आनंदाची अनुभूती येणे : भरतनाट्यम्चा प्राथमिक भाग शिकतांना माझ्या मनात येणार्‍या विचारांचे प्रमाण अत्यल्प होते. माझे सगळे लक्ष मी नृत्य कसे करू ? ते आणखी चांगल्या प्रकारे कसे शिकू ?, जेणेकरून मला दैवी आणि आध्यात्मिक ऊर्जा अधिक मिळेल, यांकडे होते. नृत्य करतांना माझे अनाहतचक्र मोठे मोठे होत होते आणि मी आतून दैवी आनंदाची अनुभूती घेत होते. जसजसे पुढचे नृत्य शिकत होते, तसतसे मला हलके वाटत होते.

१ आ. प्रयोगानंतर सहस्रार चक्रातून पूर्ण देहात चैतन्य प्रवेश करत असल्याचे जाणवणे : माझे मन निर्विचार झाले. मी शांत बसले होते आणि माझ्या सहस्रार चक्रातून पूर्ण देहात चैतन्य प्रवेश करत आहे, असे मला जाणवले. काही वेळाने माझा देह कंपायमान स्थितीत आहे, असे जाणवले.

२. कु. अ‍ॅलीस स्वरीदे, इंग्लंड

२ अ. प्रयोगाच्या वेळी – नृत्य करतांना विचार उणावून वर्तमानकाळात आहे, असे अनुभवणे : नृत्य करतांना मला जाणवले, माझे विचार उणावले आहेत आणि मी वर्तमानकाळात आहे. इतर वेळी माझ्या मनात भूतकाळ किंवा भविष्यकाळ यांविषयीचे विचार अधिक असतात.

२ आ. प्रयोग झाल्यानंतर – पूर्वी झुंबा हा पाश्‍चात्य नृत्यप्रकार केल्यावर प्राणशक्ती उणावून नेहमी थकवा येणेे आणि भरतनाट्यम् केल्यावर जराही थकवा न येणे : माझ्यावर आलेले त्रासदायक शक्तीचे आवरण अत्यल्प होऊन साधनेसाठी मला पुष्कळ उत्साह जाणवत होता. मी पाश्‍चात्त्य नृत्यही करते. त्या नृत्याच्या तुलनेत भरतनाट्यम् केल्यावर मला जराही थकवा जाणवत नव्हता. तेव्हा माझ्या लक्षात आले की, भरतनाट्यम् केवळ एक शास्त्रीय नृत्यशैली नसून या नृत्याला एक शास्त्र आहे. मी झुंबा (एक पाश्‍चात्त्य नृत्यसदृश व्यायामप्रकार) नृत्यही केले आहे. ते करत असतांना माझी प्राणशक्ती उणावून मला नेहमी थकवा येत असे आणि झुंबा नृत्याचा शिकवणीवर्ग अर्धवट सोडावा लागत असे. झुंबा करत असतांना माझे नकारात्मक विचार वाढून माझ्यावर त्रासदायक शक्तीचे आवरण अधिक प्रमाणात येते. मी जेथे झुंबा नृत्य करते, ती खोली त्रासदायक शक्तीने भारली जाते, असे मला दिसते.

३. कु. शर्वरी कानस्कर, सनातन आश्रम, गोवा.

३ अ. प्रयोग झाल्यानंतर – काही वेळ शारीरिक त्रास होणे; परंतु नंतर पूर्ण दिवस स्वतःवर उपाय होत असल्याचे जाणवून मन आनंदी रहाणे : भरतनाट्यम् हा नृत्यप्रकार मी पहिल्यांदाच केला असल्याने प्रयोगानंतर मला काही वेळ शारीरिक त्रास झाला; पण नंतर पूर्ण दिवस माझ्यावर उपाय होत आहेत, असे मला जाणवत होते. जेव्हा माझे शारीरिक त्रासाकडे दुर्लक्ष व्हायचे, तेव्हा मन स्थिर होऊन मला जांभया येत आणि प्रयोगात सांगितलेल्या काही हालचाली (पदन्यास) आपोआप होत. पूर्ण दिवस माझे मन आनंदी होते. या अनुभूतीच्या माध्यमातून परात्पर गुरु डॉक्टरांंनी मला भरतनाट्यम् या नृत्याचे महत्त्व लक्षात आणून दिले, यासाठी मी त्यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करते.

४. कु. अपाला औंधकर, सनातन आश्रम, गोवा.

४ अ. प्रयोगाच्या वेळी

४ अ १. अडवू करतांना शरिरात पुष्कळ हलकेपणा जाणवून भान न रहाणे आणि देवतांच्या सभेत किंवा जिथे देवतांचे अस्तित्व आहे, तिथे नृत्य चालू आहे, असे वाटणे : अडवू करतांना माझ्या शरिरात पुष्कळ हलकेपणा जाणवला. माझा देह जणू एक नाजूक वेल आहे, असे मला वाटत होते. नृत्य करतांना मी करत असलेल्या नृत्य हालचालींचे मला भानच राहिले नाही आणि मी त्या हालचालींमध्ये रमून गेले. प्रयोगाचा वेळ कधी संपला ?, हेसुद्धा मला कळले नाही. मी नृत्य करत आहे, ते ठिकाण भूलोक नसून देवतांच्या सभेत किंवा जिथे देवतांचे अस्तित्व आहे, तिथे नृत्य चालू आहे, असे मला वाटले.

४ अ २. अडवू करतांना शरणागतभाव निर्माण होऊन आनंद आणि प्रीती अनुभवणे : पहिले दोन अडवू तट्ट आणि नट्ट करतांना मला शरणागतभाव जाणवत होता. मी परात्पर गुरु डॉक्टरांसाठीच हे करत आहे, असा भाव माझ्या मनात आपोआप निर्माण झाला. सर्व अडवूंमध्ये कुदित्तमेट्ट आणि विशरू हे अडवू करतांना मला आनंद अन् प्रीती अनुभवायला आली.

४ आ. प्रयोग झाल्यानंतर – ध्यान लागून सहस्रार चक्रातून पूर्ण देहात काहीतरी जात आहे आणि मन शांत होत आहे, असे जाणवणे अन् सप्तचक्रे तेजोमय होऊन त्यांवर आलेले त्रासदायक शक्तीचे आवरण नष्ट झाले आहे, असे वाटणे : प्रयोग झाल्यावर माझे ध्यान लागले. मी एक वेगळीच स्थिती अनुभवली. सहस्रार चक्रातून संपूर्ण देहात काहीतरी जात आहे आणि माझे मन शांत होत आहे, असे मला जाणवले. मला आसपासचा कोणताच आवाज येत नव्हता आणि कशाचा स्पर्शही होत नव्हता. साधारण १० मिनिटे माझे ध्यान लागले होते आणि ध्यानात मी शांतीची अनुभूती घेत होते. माझी सप्तचक्रे तेजोमय झाली असून त्यांवर आलेले त्रासदायक शक्तीचे आवरण नष्ट झाले आहे, असे मला वाटले. ध्यानात दैवी शक्ती मला पाठीमागे ओढत आहे, असे जाणवून माझे शरीर पाठीमागे झुकले. ध्यानातून बाहेर आल्यावर मला आनंद आणि उत्साह जाणवत होता. दोन मिनिटे मला आणि अन्य एका साधिकेला वेगळ्याच फुलांचा सुगंध आला. गुरुदेवांच्या कृपेने मला या प्रयोगात सहभागी होता आले. यातून भगवंताने मला पुष्कळ गोष्टी शिकवल्या, यासाठी मी कृतज्ञतेचे अडवूरूपी फूल त्यांच्या चरणकमली अर्पण करते.

५. कु. म्रिणालिनी देवघरे, सनातन आश्रम, गोवा.

५ अ. प्रयोगापूर्वी – साडी परिधान करतांना शरिरावर असलेले त्रासदायक आवरण दूर होत आहे, असे जाणवणे : प्रयोगाला आरंभ होण्यापूर्वी साडी परिधान करतांना आणि परिधान केल्यावर मला जांभया येऊन माझ्यावर उपाय होत होते. माझ्या शरिरावर असलेले रज-तमयुक्त शक्तीचे त्रासदायक आवरण दूर होत आहे, असे मला जाणवत होते.

५ आ. प्रयोगाच्या वेळी

५ आ १. अडवू विलंबित लयीमध्ये करतांना सूक्ष्मातून संगीत चालू आहे, असे वाटणे : अडवू हे विलंबित (हळू), मध्य (थोडे गतीने) आणि द्रुत (जलद गतीने) या तीन लयींमध्ये क्रमाने करतात. मला अडवू हा प्रकार अधिकतर द्रुत लयीमध्ये करायला आवडतो; पण प्रयोगात विलंबित आणि मध्य या लयींत करतांना मला आनंद जाणवत होता. थोड्या वेळाने विलंबित लयीमध्ये करतांना सूक्ष्मातून संगीतसुद्धा चालू आहे, असे वाटत होते.

५ आ २. अडवूच्या माध्यमातून देवाशीच बोलत आहेे, असे वाटणे : इतर वेळी नृत्याचा सराव करतांना कोणत्या तरी देवतेविषयी नृत्य केल्यावर अनुसंधानात रहायला होते, अंतर्मुखता साध्य होऊन एकाग्रता येते किंवा ध्यान लागते, असे मी अनुभवले आहे ; परंतु अडवू हा प्रकार केल्यावर अनुसंधानात रहाण्याचा भाग आतापर्यंत कधी झाला नव्हता. आता प्रयोगात अडवू केल्यावर मला असे वाटले, अडवूच्या माध्यमातून मी देवाशीच बोलत आहे. प्रत्येक अडवू करतांना माझ्या शरिराच्या पुढच्या दिशेने थंडावा आणि पाठीला उष्णता जाणवत होती.

५ इ. प्रयोगानंतर – ध्यान लागून एका वेगळ्याच ठिकाणी आहे, असे जाणवणे आणि ध्यानस्थितीतून बाहेर येऊ नये, असे वाटून पूर्ण शरीर हलके होणे : पूर्वी अडवू हा प्रकार केल्यावर देवाचे स्मरण कधी झाले नव्हते; पण या प्रयोगानंतर आपोआप देवाची पुष्कळ आठवण येत होती. प्रयोग संपल्यावर काही वेळ सहज खाली बसले असतांना माझे ध्यान लागले. आरंभी ध्यानात शरिराच्या उजवीकडे चांगली स्पंदने जाणवत होती आणि नंतर ती हळूहळू शरिराच्या मध्यभागी सरकली, असे जाणवले. मी एका वेगळ्याच ठिकाणी आहे आणि ध्यानाच्या स्थितीतून बाहेर येऊ नये, असे मला वाटत होते. प्रयोग संपल्यावर माझे संपूर्ण शरीर हलके झाले होते.

या लेखाचा पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/481783.html
  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक