गोवा शासनाचे ऑक्सिजनचा तुटवडा दूर करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न

गोमेकॉत २० सहस्र लिटर मेडिकल ऑक्सिजनची टाकी बसवण्याचे काम युद्धपातळीवर चालू

पणजी – गोवा वैद्यकीय महाविद्यालयात २० सहस्र लिटर मेडिकल ऑक्सिजनची टाकी बसवण्याचे काम युद्धपातळीवर चालू आहे. ही टाकी बसवल्याने गोमेकॉत ऑक्सिजन पुरवठ्यासाठी ऑक्सिजन ट्रॉली पद्धतीवर अवलंबून रहावे लागणार नाही आणि ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत होण्यास साहाय्य होईल, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.

भारतीय वायू सेनेच्या २ विमानांनी २१५ विविध क्षमतेचे ऑक्सिजन सिलिंडर गोव्यात आणले

गोव्यातील ऑक्सिजनचा तुटवडा दूर करण्यासाठी भारतीय वायू सेनेच्या २ विमानांद्वारे विविध क्षमतेचे २१५ ऑक्सिजन सिलिंडर १३ मेच्या रात्री गोव्यात आणण्यात आले आहेत. हे सिलिंडर संबंधितांपर्यंत पोचवण्यासाठी योग्य समन्वय केला जात असल्याची माहिती विमानतळ प्राधीकरणाने दिली आहे.

मोले तपासणीनाक्यावर ऑक्सिजन टँकर सेस शुल्क न भरल्याने २० मिनिटे अडवून ठेवणारा वाहतूक खात्याचा अधिकारी सेवेतून निलंबित

मोले तपासणीनाक्यावर परराज्यातून आलेल्या ऑक्सिजन टँकरने सेस शुल्क न भरल्याने टँकर सुमारे २० मिनिटे अडवून ठेवणारे वाहतूक खात्यातील अधिकारी मंदार आडपईकर यांना खात्याने सेवेतून निलंबित केले आहे. १३ टन ऑक्सिजन घेऊन हा टँकर १३ मेच्या रात्री गोव्यात प्रवेश करत होता. प्रतिटन २५० रुपये सेस शुल्क न भरल्याने वाहतूक अधिकारी मंदार आडपईकर यांनी हा टँकर २० मिनिटे अडवून ठेवला.