राष्ट्राभिमानी आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असणारा ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठलेला उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला वाशी (नवी मुंबई) येथील कु. आदिश विश्‍वनाथ गौडा (वय ७ वर्षे) !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! या पिढीतील कु. आदिश गौडा हा आहे !

‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना सिद्ध केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

पालकांनो, हे लक्षात घ्या !

‘तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

कु. आदिश गौडा

(वर्ष २०१७ मध्ये कु. आदिश याची आध्यात्मिक पातळी ५३ टक्के होती.- संकलक)

कु. आदिश गौडा (वय ७ वर्षे) याने २१ ऑक्टोबर २०२० या दिवशी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्याचे घोषित करण्यात आले. त्यानिमित्ताने त्याची आई सौ. चंचलाक्षी गौडा यांना जाणवलेली त्याची गुणवैशिष्ट्ये पुढे देत आहोत.

१. प.पू. रामदेवबाबा यांचा योगासनाचा कार्यक्रम पाहिल्यावर स्वतः योगासने करण्याचा प्रयत्न करणे

‘एकदा दूरदर्शनवर प.पू. रामदेवबाबा यांचा योगासने शिकवण्याचा कार्यक्रम प्रसारित होत होता. त्यानंतर कु. आदिश स्वतः योगासने करण्याचा प्रयत्न करू लागला. नामजपाला बसतांनासुद्धा तो पद्मासनात बसून नामजप करण्याचा प्रयत्न करतो.

२. प्रसिद्धीची आवड नसणे

तो नामजप करत असतांना मी भ्रमणभाषवर त्याचे चित्रीकरण करण्याचा प्रयत्न करत होते. मध्येच त्याने डोळे उघडले आणि मी चित्रीकरण करत असल्याचे त्याच्या लक्षात आले. तो मला म्हणाला, ‘‘आई, भ्रमणभाषवर काय करत आहेस ? त्यापेक्षा तू नामजप कर.’’ मी भ्रमणभाष बाजूला ठेवल्यावर तो नामजप करू लागला. कधी कधी तो खोलीत एकटाच बसून नामजप करतो.

३. राष्ट्राभिमान असणे

३ अ. चिनी ‘अ‍ॅप’विषयी प्रबोधन करणे : एकदा तो दूरदर्शनवर बातम्या पहात होता. ‘Tik-Tok’  app हे चिनी ‘अ‍ॅप’ असल्याने त्यामुळे आपली हानी होते’, ही वार्ता त्याने पाहिली. त्यानंतर आमच्या घराजवळ रहाणार्‍या एका ताईला त्याने सांगितले, ‘‘दीदी तुम्ही Tik-Tok वापरता, ते चांगले नाही. ते चिनी अ‍ॅप आहे. तुम्ही ते बंद करा.’’ तो अशा प्रकारचे प्रबोधन नेहमी करतो.

३ आ. सर्वांना विदेशी वस्तूंऐवजी स्वदेशी वस्तू वापरण्यास सांगणे : एकदा आदिशने भ्रमणभाषवर स्वदेशी आणि विदेशी वस्तू यांची माहिती असलेला ‘व्हिडिओ’ पाहिला. तेव्हा ‘आपण स्वदेशी वस्तूच  वापरायला हव्यात’, हे त्याच्या लक्षात आले. त्यानंतर ‘आमच्या घरातील सर्व साहित्यामध्ये काही विदेशी साहित्य आहे का ?’, हे तो पडताळून पहात होता. दुकानदारांनाही तो ‘‘विदेशी वस्तू घेऊ नका, स्वदेशी आणा. विदेशी साहित्य चांगले नाही’’, असे सांगत होता.

४. भ्रमणभाषवर खेळ खेळण्यापेक्षा सायकल चालवणे अधिक आवडणे

आदिशला भ्रमणभाषवर खेळ खेळण्यापेक्षा सायकल चालवणे, धनुष्यबाण आणि अन्य शारीरिक खेळ आवडतात. वर्गात छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी माहिती मिळाल्यावर ‘मलाही लाकडी तलवार हवी आहे’, असे त्याने सांगितले.

५. परात्पर गुरु डॉक्टरांप्रतीचा भाव

५ अ. दुकानदाराने दिलेल्या खाऊच्या कागदावर परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्र पाहून ते नीट कापून देवघरात चिकटवणे : एकदा आदिश आमच्या घराच्या बाजूला असणार्‍या दुकानातून खाऊ आणून खात होता. त्या दुकानदाराने तो खाऊ सनातन पंचांगाच्या कागदात बांधून दिला होता. त्या कागदावर आदिशला परात्पर गुरु डॉक्टरांचे छायाचित्र (भावचित्र) दिसले. तो त्या कागदाचा चुरगळलेला भाग नीट करत होता. मी त्याला विचारले, ‘‘हे तू काय करत आहेस ?’’ त्याने सांगितले, ‘‘आई, या कागदावर स्वामी तातांचे छायाचित्र आहे.’’ (आदिश परात्पर गुरु डॉ. आठवले यांना ‘स्वामी ताता’, असे संबोधतो. कन्नड मध्ये आजोबांना ‘ताता’ म्हणतात.) त्याने ते छायाचित्र नीट कापून देवघरातील देवतांच्या चित्रांच्या बाजूला चिकटवून ठेवले.

५ आ. स्वतः नामजप करत असल्याचे परात्पर गुरु डॉक्टरांना सांगण्यास सांगणे : कधी कधी आमच्या घरी साधक येतात. तेव्हा तो विचारतो, ‘‘आई, हे कशासाठी आले आहेत ?’’ तेव्हा ‘‘स्वामी तातांंनी तुझी आठवण काढली आहे आणि ‘तू नामजप करतोस कि नाही’, हे पहाण्यासाठी साधकांना पाठवले आहे’’, असे मी त्याला सांगतेे. नंतर तो नामजप करतो आणि ‘‘मी नामजप करतो, हे स्वामी तातांना सांग’’, असे सांगतो.

६. चि. आदिशमधील स्वभावदोष

हट्टीपणा, राग येणे आणि वडिलांचे दोष पाहून चिडचिड करणे

‘हे गुरुदेवा, तुमच्याच कृपेमुळे आम्हाला उच्च लोकातील हा जीव मुलगा म्हणून लाभला आहे. त्याचे योग्य पालनपोषण आणि त्याच्यावर चांगले संस्कार करण्यासाठी तुम्हीच आमच्याकडून प्रयत्न करवून घ्या’, अशी आपल्या चरणी प्रार्थना आहे.’

– सौ. चंचलाक्षी विश्‍वनाथ गौडा (आदिशची आई), वाशी, नवी मुंबई. (२८.५.२०२०)

दळणवळण बंदीच्या कालावधीत हिंदु जनजागृती समितीच्या ‘ऑनलाईन (online) सत्संगा’मुळे कुटुंबियांमध्ये झालेले पालट !

१. ‘कोरोना’ विषाणूचा त्रास होऊ नये, यासाठी बालसंस्कारवर्गात सांगितलेला नामजप करण्यास मुलाने प्रारंभ करणे आणि त्यात सर्व कुटुंबीय सहभागी होणे

‘मार्च २०२० या मासात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘ऑनलाईन सत्संग’ चालू झाले. माझा मुलगा चि. आदिश याला मी बालसंस्कारवर्ग ऐकायला देते, तसेच तो मध्ये मध्ये धर्मसंवादही ऐकतो. बालसंस्कारवर्गात ‘कोरोना विषाणूंचा त्रास होऊ नये’, यासाठी ‘श्री दुर्गादेवी, श्री दत्त आणि शिव’ या देवतांचा नामजप करण्यास सांगितले होते. आदिशने हे जप करण्यास लगेच आरंभ केला. माझे यजमान सनातनच्या कार्यास विरोध करत आणि त्यांना साधनेची आवडही नव्हती; परंतु त्यांना श्री दुर्गादेवीची भक्ती करायला आवडते. गुरुकृपेने या वेळी संतांनी सांगितलेल्या नामजपात श्री दुर्गादेवीचा नामजप असल्याने माझे यजमानही रात्री आमच्या समवेत नामजप करण्यास बसतात.

२. बालसंस्कारवर्गामुळे योग्य आणि अयोग्य याची जाणीव होऊन कु. आदिशने वडिलांना त्याविषयी सांगणे आणि त्यांनीही दूरदर्शनवर अन्य कार्यक्रम न पहाता ‘रामायण’ अन् ‘महाभारत’ यांसारखे कार्यक्रम पहाणे

चि. आदिश बालसंस्कार वर्गामध्ये सांगितलेली सूत्रे आचरणात आणण्याचा प्रयत्न करतो. बालसंस्कार वर्गामुळे आदिशला योग्य आणि अयोग्य याची जाणीव होते. त्याचे वडील दूरदर्शनवरील मालिका किंवा अन्य कार्यक्रम पहात असतील, तर तो त्यांना सांगतो, ‘‘या कार्यक्रमांचा आपल्याला कोणताही लाभ नाही. हे कार्यक्रम चांगले नाहीत.’’ त्यामुळे त्याचे वडीलही आता दूरदर्शनवर ‘रामायण’ आणि ‘महाभारत’ यांसारखे कार्यक्रम पहातात.

३. बालसंस्कारवर्गात सनातन संस्थेच्या ‘चैतन्यवाणी अ‍ॅप’विषयी माहिती ऐकल्यावर आदिशने ते अ‍ॅप डाऊनलोड करण्याचा प्रयत्न करणे

आदिश बालसंस्कारवर्ग नियमितपणे पहातो. बालसंस्कारवर्गात सांगितली जाणारी गोष्ट त्याला पुष्कळ आवडते. एकदा बालसंस्कारवर्गात ‘सनातनचे चैतन्यवाणी अ‍ॅप’ याविषयी माहिती सांगण्यात आली होती. ते लक्षात घेऊन तो स्वतः भ्रमणभाषवर हे अ‍ॅप डाऊनलोड (download) करण्याचा प्रयत्न करत होता. त्याला इंग्रजी अक्षर येत नसल्याने त्या अ‍ॅपचा शोध घेण्यासाठी त्याला अडचण येत होती. तो साहाय्यासाठी माझ्याकडे आला. ‘‘तू काय करतोस ?’’, असे त्याला विचारल्यावर त्याने सांगितले, ‘‘आई यापुढे मला रात्री झोपतांना ‘ज्योत से ज्योत जगाओ’ ही आरती म्हणायला नको. ‘हे सर्व या अ‍ॅपच्या माध्यमातून आपल्याला भ्रमणभाषवर ऐकायला मिळणार आहे’, असे बालसंस्कार वर्गामध्ये सांगितले आहे.’’

४. आदिशने डोळे बंद करून स्थिर बसून नामजप करणे, तेव्हा तो बालसंस्कारवर्गात सांगितलेले सूत्र आचरणात आणण्याचा प्रयत्न करत असल्याचे लक्षात येणे

आदिश बालसंस्कारवर्गात सांगितलेले सूत्र स्वतः आचरणात आणण्याचा प्रयत्न करतो आणि आम्हालाही तसे प्रयत्न करण्यास सांगतो. एक दिवस बालसंस्कारवर्गात एकाग्रतेने नामजप करण्याविषयी सांगितले होते. त्या दिवशी त्यानेे डोळे बंद करून एकाच स्थितीत ३० मिनिटे स्थिर बसून नामजप केला. तो नामजपाला बसल्यावर थोडा वेळ झाल्यावर इकडे तिकडे पाहून ‘आम्ही नामजप करतो कि नाही ?’, हेही पहात असतो. ’

– सौ. चंचलाक्षी विश्‍वनाथ गौडा (कु. आदिशची आई), वाशी, नवी मुंबई. (२८.५.२०२०)

बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.