|
पणजी, १२ मे (वार्ता.) – गोव्यात कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करणार्या गोवा वैद्यकीय महाविद्यालयात (गोमेकॉत) ऑक्सिजनच्या अभावामुळे कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू होत असल्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठाने १२ मे या दिवशी गोवा शासनाला खडसावले. गोमेकॉत कोरोनाबाधित रुग्णांना होत असलेले त्रास, तसेच काही रुग्णांचा आक्सिजनच्या अभावी मृत्यू होत असल्याच्या घटनेची गोवा खंडपिठाने गंभीर नोंद घेऊन राज्यशासनाला म्हटले, ‘‘ऑक्सिजनच्या अभावामुळे रुग्णांचा मृत्यू होत असल्यास ते राज्यघटनेतील कलम २१ चे पूर्णपणे उल्लंघन आहे. १२ आणि १३ मेच्या रात्री ऑक्सिजनच्या पुरवठ्याच्या अभावामुळे एकाचाही मृत्यू होणार नाही, याची राज्यशासनाने निश्चिती करावी.’’ गोव्यातील कोरोना व्यवस्थापनावरून गोवा खंडपिठाकडे दक्षिण गोवा अधिवक्ता संघटनेसह एकूण तिघांनी प्रविष्ट केलेल्या जनहित याचिकांवरील सुनावणीच्या वेळी गोवा खंडपिठाने शासनाला फटकारले.
ऑक्सिजनची मागणी आणि पुरवठा यांवरून प्रतिज्ञापत्र प्रविष्ट न केल्यावरून गोमेकॉचे अधिष्ठाता डॉ. शिवानंद बांदेकर यांना खडसावले
गोमेकॉत ऑक्सिजनची मागणी आणि पुरवठा यांवरून प्रतिज्ञापत्र प्रविष्ट न केल्यावरून खंडपिठाने गोमेकॉचे अधिष्ठाता डॉ. शिवानंद बांदेकर यांना खडसावले. खंडपिठाने गोमेकॉचे अधिष्ठाता डॉ. शिवानंद बांदेकर यांना ‘व्हर्च्युअल’ सुनावणीसाठी उपस्थित रहाण्यास भाग पाडले. यानंतर सुनावणी अडीच खंटे चालू राहिली.
ऑक्सिजनच्या अभावी होणारे मृत्यू टाळण्यासाठी कोणते उपाय करणार ते सांगा
या वेळी न्यायालय राज्यशासनाला म्हणाले, ‘‘ऑक्सिजनच्या अभावी अनेकांचा मृत्यू होत आहे. यावर कोणते उपाय काढणार ते शासनाने खंडपिठाला सांगितले पाहिजे. गोव्यात कोरोनाबाधित रुग्णांचे मृत्यूचे प्रमाण पुष्कळ असल्याचे आकडेवारी सांगते. शासनाने अन्य सूत्रे बाजूला सारून या सूत्राला सर्वोच्च प्राधान्य दिले पाहिजे. आतापर्यंत झालेल्या मृत्यूवरून दोषारोप करण्यासाठी आम्ही येथे बसलेलो नाही, तर यापुढे एकाही रुग्णाचा ऑक्सिजनच्या अभावी मृत्यू होणार नाही, हे पहाणे हे आमचे प्राधान्य आहे. काही वेळा प्रशासन सांगते की, ऑक्सिजन पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहे; मात्र रिकामे सिलिंडर, ट्रॉली किंवा वाहतूक करणे आदी समस्या असल्याचे राज्यशासन सांगते; मात्र हेच शासन पुढे काही रिकामे सिलिंडर उपलब्ध केल्यावर ते भरण्यासाठी ऑक्सिजनची कमतरता असल्याचे सांगते.’’
गोमेकॉत ऑक्सिजनचा पुरवठा आणि खाटा यांची कमतरता असल्याचे शासनाने न्यायालयाकडे केले मान्य
‘व्हर्च्युअल’ पद्धतीने सुनावणीसाठी उपस्थित राहिलेले गोमेकॉचे अधिष्ठाता डॉ. शिवानंद बांदेकर यांनी गोमेकॉत ऑक्सिजनचा पुरवठा आणि खाटा यांची कमतरता असल्याचे शेवटी न्यायालयाकडे मान्य केले. गोमेकॉत १ सहस्र रुग्णांसाठी केवळ ७०० खाटा आहेत, तर १६० रुग्णांना नलिकेद्वारे, तर उर्वरित ३२० रुग्णांना सिलिंडरच्या माध्यमातून ऑक्सिजनचा पुरवठा केला जातो, असे अधिष्ठाता डॉ. बांदेकर यांनी सांगितले. गोमेकॉच्या नोडल अधिकारी डॉ. खांडेपारकर यांनी अधिष्ठाता डॉ. बांदेकर यांच्या वतीने न्यायालयाला सांगितले की, ११ मे या दिवशी सकाळी कोरोनाबाधित रुग्णांसाठी ४०० ऑक्सिजन सिलिंडरची, तर रात्री २ वाजेपर्यंत ५०० ऑक्सिजन सिलिंडरची कमतरता निर्माण झाली.