एकदा परात्पर गुरु डॉ. आठवले प्राणशक्ती अल्प असूनही पू. (श्रीमती) शालिनी माईणकरआजी यांना भेटायला रामनाथी आश्रमातील त्यांच्या खोलीत गेले होते. त्या वेळी त्यांच्यात झालेला संवाद पुढे दिला आहे.
१. ‘कुणी साधिका मला तुमच्याकडे नेत नाहीत’, असे पू. आजींनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांना सांगितल्यावर ‘म्हणून मी आलो’, असे परात्पर गुरु डॉक्टरांनी सांगणे
परात्पर गुरु डॉ. आठवले : तुमची चांगली प्रगती आहे. तुम्ही गेल्या वेळेपेक्षा आता पुष्कळ आनंदी दिसता. काय साधना केली ?
कु. सोनल जोशी : प.पू. डॉक्टर कालच पू. आजी तुमची पुष्कळ आठवण काढत होती. ‘तुम्हाला भेटायचे आहे’, असे सांगत होती.
पू. माईणकरआजी : मी सर्व साधिकांना सांगते, ‘‘तुम्ही मला परम पूज्यांकडे घेऊन चला’’; पण या कुणी माझे ऐकत नाहीत.
परात्पर गुरु डॉ. आठवले : म्हणून मी आलो !
पू. माईणकरआजी : हो. मी प्रतिदिन माझ्या सेवेतील साधिकेला सांगते, ‘‘मला परम पूज्यांकडे घेऊन जा गं.’’
परात्पर गुरु डॉ. आठवले : आता साधिकांना सांगायला नको. मीच येईन.
पू. माईणकरआजी : नाही. तसे काही नाही.
परात्पर गुरु डॉ. आठवले : तुम्ही इथे आहात ना ? आम्हाला आणखी काही नको. आमचे शिष्य आणि संत ! आणखी काय पाहिजे ? आता तुम्ही स्वतःसाठी जप करत नाही ना ? सोनलसाठी (नातीसाठी) आणि लेकीसाठी जप करत नाही ना ?
पू. आजी : नाही. साधकांसाठीच जप करते.
२. ‘पू. आजी निर्गुण स्थितीत असतात’, असे पू. आजींच्या नातीने सांगणे
परात्पर गुरु डॉ. आठवले : दिवसभर किती घंटे जप होतो ? दिवसभर जप चालूच असणार ना ?
सोनल : पू. आजीशी कुणीही बोलत असेल आणि त्यांचे बोलणे थांबले की, पू. आजीचा नामजप चालू झाला आहे, असे लक्षात येते. ‘आता ती निर्गुण स्थितीत असते’, असे वाटते; कारण नाम घेतांना तिची दृष्टीही एका ठिकाणी स्थिर होते. काही वेळा तिला २ – ३ हाका मारल्यावर ती ‘ओ’ देते.
परात्पर गुरु डॉ. आठवले : चला, त्या पंचज्ञानेंद्रियांमधून सुटल्या. आता देवाशी अखंड अनुसंधान आहे ना !
३. पू. आजी झोपलेल्या असतांना त्यांचा केवळ देह झोपलेला असणे आणि सूक्ष्मातून त्यांचे कार्य अखंड चालू असणे
सोनल : ‘पू. आजी झोपलेल्या असतात. तेव्हा त्यांचा केवळ देह झोपलेला असतो; पण त्यांचे सूक्ष्मातून कार्य अखंड चालू असते’, असे श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ म्हणाल्या होत्या. मी आजीला विचारले, ‘‘तुला काय जाणवते गं ?’’ त्या वेळी ती म्हणाली, ‘‘हो गं. मलापण असेच वाटते की, माझा केवळ देह झोपलेला असतो आणि देव माझ्याकडून काहीतरी सेवा करवून घेत आहे.’’
परात्पर गुरु डॉ. आठवले : बापरे ! किती छान ! मला बघून तुम्हाला जेवढा आनंद झाला, त्याहून अधिक आनंद तुम्हाला बघून मला झाला.
४. पू. आजींचे हात गुलाबी झाले असून त्यांचे हात-पाय आणि तोंडवळा यांतून पुष्कळ चैतन्य प्रक्षेपित होत असल्याचे जाणवणे
परात्पर गुरु डॉ. आठवले : पू. आजींना विचारा, ‘‘त्यांच्या दोन्ही हातांकडे पाहून त्यांना काय वाटते ?’’
पू. माईणकरआजी : मला कळत नाही हो; पण दोन्ही हात गुलाबी झाल्याचे दिसते.
परात्पर गुरु डॉ. आठवले : हो. तेच सांगायचे होते. तुमचे हात-पाय गुलाबी झाले आहेत. तुमचे हात-पाय आणि तोंडवळा यांतून पुष्कळ चैतन्य प्रक्षेपित होत असल्याचे दिसत आहे.
पू. माईणकरआजी : काही माझे नाही. सर्व तुमचेच आहे. तुम्हीच सर्व करत असता.
५. नातीचा हात हातात धरल्यावर ‘तो हात परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या हातात दिला आहे’, असे पू. आजींना वाटणे आणि त्या वेळी ‘तुमचे हात अन् माझे हात एकच आहेत’, असे परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगणे
परात्पर गुरु डॉ. आठवले : आता तुम्ही तुमचे दोन्ही हात एकमेकांवर ठेवून ‘काय जाणवते ?’, हे पहा.
पू. माईणकरआजी : मला काही कळत नाही हो. मला चांगले वाटते.
परात्पर गुरु डॉ. आठवले : बरं मग, आता सोनलचा हात तुमच्या हातात धरून ‘काय वाटते ?’, हे सांगा.
पू. माईणकरआजी : मला काही कळत नाही गं.
परात्पर गुरु डॉ. आठवले : अहो, तुम्ही संत आहात ना; म्हणून बघून सांगता येईल.
पू. माईणकरआजी : मी संत आहे; पण तुम्ही मोठे संत आहात.
पू. माईणकरआजी (थोडा वेळ थांबून) : सोनलचा हात माझ्या हातात धरल्यावर मला असे वाटते की, मी हा हात तुमच्या हातात दिला आहे.
परात्पर गुरु डॉ. आठवले : मग, म्हणजे तुमचे हात आणि माझे हात एकच आहेत. किती छान आजी ! आजींचे हात किती गार आहेत ! मला तुमचा आशीर्वाद मिळाला !
६. पू. आजींची अवस्था प्रत्येक दिवशी वेगळी असणे
सोनल : पू. आजीची अवस्था प्रत्येक दिवशी वेगळी असते. एक दिवस ती निर्गुण स्थितीत असते, तर एक दिवस ती इतकी उत्साही असते की, खोलीतील सर्व साधिकांना गमती सांगून हसवते.
परात्पर गुरु डॉ. आठवले : हो. बाबांचे भजन आहे ना, सगुण निर्गुण नाही भेदाभेद !
७. ‘आश्रम हेच माझे घर आहे’, असे पू. आजींनी सांगणे
परात्पर गुरु डॉ. आठवले : आजी, तुम्हाला घरी बोलावत नाही का ?
सोनल : पू. आजी सांगते, ‘‘आता मला इकडेच आश्रमात रहायला सांगितले आहे. मी नंतर येते. आश्रम हेच माझे घर आहे.’’
पू. आजी : हो, हो.
८. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले हे माझे वडील आहेत’, असा पू. आजींचा भाव असणे
सोनल : पू. आजीचे वडील लहान वयात वारले. त्यामुळे तिला ‘तुम्हीच तिचे बाबा आहात’, असे वाटते. तुम्ही तिला काही भेट पाठवली, तर ती विचारते, ‘‘परम पूज्य माझ्यासाठी एवढे का करतात गं ?’’ मग मी तिला सांगते, ‘‘ते तुझे बाबा आहेत ना !’’ त्यावर आजी म्हणते, ‘‘हो, बरोबर गं. ते माझे बाबाच आहेत.’’
परात्पर गुरु डॉ. आठवले : मी तुमच्यापेक्षा लहान आहे हो ! मला मोठी बहीण मिळाली.
पू. आजी : हो हो.
९. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी दिलेली साडी नेसल्यावर पू. आजी सतत त्यांच्या अनुसंधानात असणे
सोनल : परात्पर गुरु डॉक्टर, जेव्हा ती तुम्ही दिलेली साडी नेसते, तेव्हा ती तुमच्या अखंड अनुसंधानात असते. प्रत्येक साधकाला सांगतात, ‘‘ही साडी मला परात्पर गुरु डॉक्टरांनी दिली आहे.’’
परात्पर गुरु डॉ. आठवले : किती छान !
१०. पू. आजींचे केस मुळापासून काळे होऊ लागणे
सोनल : परात्पर गुरु डॉक्टर, आता पू. आजीचे केस मुळापासून काळे व्हायला लागले आहेत !
परात्पर गुरु डॉ. आठवले : अरे, हो का ? आता आजी तुम्ही तुमचे वय ९० – ९१ वर्षे असे सांगू नका. ५० – ६० वर्षे सांगा !
पू. माईणकरआजी : सिद्धेशची (कु. सोनल यांच्या मोठ्या भावाची) मुलगी शराया मला विचारते, ‘‘मामाई, तू सर्वांना तुझे वय ८९ ९० वर्षे असल्याचे का सांगतेस ? तू अल्प वय सांग.’’
परात्पर गुरु डॉ. आठवले : आता मीपण म्हटले ना, ५० ६० वर्षे सांगायला हवे !
सोनल : आजी घरी असतांना शराया १ वर्षाची होती. ती आजीला इकडे-तिकडे घेऊन जायची. आम्ही कुणीतरी समवेत असायचोच; पण ती एका हाताने आजीची काठी आणि एका हाताने आजीचा हात धरून तिला घेऊन जायची.
११. परात्पर गुरु डॉ. आठवले भेटायला आल्यावर ‘तुम्ही आलात, हेच माझ्यासाठी पुष्कळ झाले; मला आणखी काही नको’, असे समाधानाने म्हणणार्या पू. आजी !
परात्पर गुरु डॉ. आठवले : आज मला काही खायला नको. तुमचे बोलणे ऐकूनच माझे पोट भरले. (पू. आजींना प्रसाद देऊन) आजींना हा प्रसाद चावता येणार का ?
सोनल (पू. माईणकरआजींना) : तुला परात्पर गुरु डॉक्टरांनी प्रसाद दिला आहे.
परात्पर गुरु डॉ. आठवले : नंतर मऊ खाऊ पाठवू.
पू. माईणकरआजी : नको. तुम्ही आलात, हेच माझ्यासाठी पुष्कळ झाले. मला आणखी काही नको.
परात्पर गुरु डॉ. आठवले : गोड आणि मऊ खाऊ पाठवूया.
१२. ‘तुम्हाला भेटून मला पुष्कळ आनंद मिळतो’, असे परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी पू. आजींना सांगणे
परात्पर गुरु डॉ. आठवले : या वयातही केवढे ऐकायला येते ? असे कुठे पहायला मिळत नाही. छान आहे अगदी !
सोनल : आता तिचे वय ९१ वर्षे आहे.
परात्पर गुरु डॉ. आठवले : आजींनी मला हरवले. येतो आजी. आता आरामात झोपा. तुम्हाला भेटून मला पुष्कळ आनंद मिळाला.’
– कु. सोनल जोशी (पू. आजींची नात), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१३.८.२०२०)
|