१. प्रशासनाने तातडीने या ठिकाणी डॉक्टर उपलब्ध करून द्यायला हवेत !
२. येणार्या आपत्काळात प्रत्येक नागरिकापर्यंत आधुनिक वैद्य पोचणे कठीण आहे. यासाठी प्रत्येकाने प्रथमोपचार शिकणे, आयुर्वेदिक औषधी वनस्पती आपल्या घरात लावणे त्याचा उपयोग समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे ! |
सातारा, १२ मे (वार्ता.) – महाबळेश्वर तालुक्यातील कांदाटी दुर्गम भागातील वाघावळे येथील बामणोली आयुर्वेदिक रुग्णालय आणि बेल एअर संस्थेचे आरोग्य केंद्र यांमध्ये आधुनिक वैद्य नसल्याने रुग्णांचे हाल चालू असून सध्या तेथील परिचारक आणि परिचारिकाच रुग्णांवर उपचार करत आहेत.
मागील मासापर्यंत या आरोग्य केंद्रांमध्ये आधुनिक वैद्य उपचारासाठी येत होते; मात्र आता तेथे आधुनिक वैद्य उपलब्ध नाहीत. कांदाटी खोर्यात कोरोनाने शिरकाव केला असून २ रुग्णही दगावले आहेत. रुग्णांवर उपचारासाठी कोणतीही सोय उपलब्ध नाही. तसेच तापोळा, महाबळेश्वर याठिकाणी जाण्यासाठी वाहन उपलब्ध नाही. दळणवळण बंदीमुळे खासगी वाहनेही बंद आहेत. कोरोनाने कांदाटी खोर्यात हातपाय पसरण्याआधीच आरोग्य विभागाने तातडीने या आरोग्य केंद्रांमध्ये आधुनिक वैद्य उपलब्ध करून द्यावेत अशी, मागणी नागरिक करत आहेत.