आधुनिक वैद्या (सौ.) नंदिनी सामंत यांनी अनुभवलेले परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे अद्वितीयत्व आणि द्रष्टेपण !

परात्पर गुरु डॉ. आठवले

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यासारख्या अवतारी गुरूंची आणि त्यांच्या अवतारी कार्याची महती माझ्यासारख्या जिवाला काय ज्ञात होणार ? तरीही गेली २३ वर्षे मला स्थुलातून त्यांच्या जवळ रहाण्याचे भाग्य त्यांच्याच कृपेने लाभले आणि त्यांच्या माध्यमातून स्थापन होणार्‍या सनातन धर्मराज्याची (हिंदु राष्ट्राची) जडण-घडण होतांना मला ‘याची देही याची डोळा’ प्रत्यक्ष पहाता आली. जे माझ्या लक्षात आले, ते मी त्यांच्याच कृपेनेे लिहीत आहे. ८ मे या दिवशी ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी आश्रमजीवनातून साधकांना दिलेली शिकवण’ या लेखातील काही भाग पाहिला. आज पुढील भाग पाहूया.

 ८ मे या दिवशी प्रसिद्ध झालेला लेख वाचण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/475043.html


परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी आश्रमजीवनातून साधकांना दिलेली शिकवण

डॉ. (सौ.) नंदिनी सामंत

२२. फोंडा (गोवा) येथील आश्रम

२२ ऐ. विविध सेवांच्या माध्यमातून साधकांना घडवणे

२२ ऐ १. विविध सेवा-कौशल्ये शिकून घ्यायची संधी देणे : परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी विविध सेवांच्या माध्यमातून साधकांना घडवले आहे. साधकाच्या साधनेच्या प्रवासातील आरंभीच्या टप्प्याला त्याच्या आवडीनुसार किंवा कौशल्यानुसार त्याला सेवा दिली जाते. नंतर त्याच्या साधनेसाठी जे आवश्यक आहे, त्यानुसार सेवा दिली जाते. परात्पर गुरु डॉ. आठवले साधकांना एकाच सेवेत न ठेवता त्यांना विविध सेवा-कौशल्ये शिकून घ्यायची संधी देतात. त्यायोगे साधक परिपूर्ण बनतो, उदा. स्वयंपाकघरात सेवा करणार्‍या साधिकांना त्यांनी संगणकीय टंकलेखन शिकवले. पुढे यातील एक साधिका ग्रंथ-विभागात पूर्णवेळ सेवा करू शकली आणि कालांतराने त्या विभागाचे दायित्वही घेऊ लागली.

२२ ऐ २. सर्व साधकांनी सर्व सेवा करणे : आश्रमातील सर्व कामे साधक स्वतःची साधना-सेवा म्हणूनच करतात. आश्रमात कोणत्याही कामासाठी एकही वेतनधारी (पगारी) नोकर नाही. आश्रमातील धान्य निवडणे, स्वयंपाक करणे, विविध कार्यालयीन सेवा यांपासून ते आश्रम, स्नानगृह, शौचालये यांची स्वच्छता हे सर्व साधक प्रतिदिन आळी-पाळीने करतात. सर्व कामांकडे ईश्‍वरप्राप्तीचे साधन (सेवा) म्हणूनच पाहिले जाते आणि त्याच भावाने ती केली जातात. स्वयंपाक आणि आश्रम स्वच्छता या सेवांमध्ये आश्रमातील सर्व साधक सहभाग घेतात.

२२ ऐ ३. रुग्णाईत साधकांची देखभाल : परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी आश्रमात साधक रुग्णाईत झाल्यास त्यांच्या देखभालीची कार्यपद्धत घालून दिली आहे. रुग्णाईत साधकांना वेळच्या वेळी न्याहारी, भोजन त्यांच्या पथ्यानुसार आणून देणे, त्यांना रुग्णालयात नेणे, औषधे आणून देणे, त्यांना अंघोळ घालणे, त्यांचे कपडे धुणे, त्यांची शुश्रुषा करावी लागल्यास ती करणे, रुग्णालयात भरती करावे लागले, तर त्यांच्यासह तेथे राहून त्यांची शुश्रुषा करणे इत्यादी सर्व काही त्या साधकाचे सेवेतील आणि खोलीतील सहसाधक आपली साधना म्हणून करतात. साधक हे सर्व स्वतःची साधना म्हणून करत असल्याने ती परिपूर्ण करणे अपेक्षित असते. यास्तव रुग्णाईत साधकाची सेवा करणार्‍या साधकांकडून झालेल्या छोट्या-मोठ्या चुका रुग्णाईत साधकाने त्यांना त्यांच्या साधनेत साहाय्य म्हणून त्या भावाने सांगणे अपेक्षित असते. सेवा करणार्‍या साधकांनीही त्या स्वीकारून त्यानुसार अपेक्षित पालट करायचे असतात. अगदी स्वतःचे पालक किंवा मुलेही करणार नाहीत, एवढ्या चांगल्या प्रकारे आश्रमात रुग्णाईत साधकांची सेवा केली जाते, हे अनेक आजारी साधकांनी अनुभवले आहे. वयोवृद्ध साधक किंवा साधकांचे वयोवृद्ध पालक यांचीही याच भावाने सेवा केली जाते.

२२ ओ. साधक आणि सामान यांची ने-आण यांची आदर्श घडी बसवणे : ‘देवाचे काटकसर आणि नियोजन कुशलता’ हे गुण अंगी बाणवण्याच्या दृष्टीने सनातनची उत्पादने आणि साधक यांची ने-आण यांचीही आदर्श कार्यपद्धत परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी घालून दिली आहे. साधक बस, रेल्वे, विमान किंवा वैयक्तिक वाहनाने जात असल्यास त्यांच्या कुवतीनुसार ते सात्त्विक उत्पादने, ग्रंथ, खाऊ, अन्य साहित्य अथवा साधक यांची ने-आण करतात. यासाठी साधक आश्रमाबाहेर कुठेही जाणार असल्यास त्यांचे जायचे निश्‍चित झाल्यावर भोजनकक्षात आणि स्वागतकक्षात लावलेल्या दोन फलकांवर साधक तशी नोंद करतात. त्यामुळे साधक जाणार असलेल्या भागात अन्य साधकांना काही साहित्य पाठवायचे असल्यास ते साधक जाणार्‍या साधकाकडे ते देतात. यामुळे ने-आण करण्यातील बराच व्यय (खर्च) वाचतो आणि सर्व साधकांमध्ये दायित्व अन् कुटुंबभावना वाढीस लागते.

२२ औ. साधकांना व्यवहारात अडकू न देता त्याच्या पलीकडे जायला शिकवणे : परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी आरंभीपासूनच साधकांना व्यावहारिक समस्यांविषयी प्रश्‍न न विचारण्याची शिकवण दिली आहे. ‘साधना केल्याने आणि गुरुकृपेने प्रश्‍न सुटणारच आहेत. व्यावहारिक प्रश्‍न सोडवणे, हे आपल्या साधनेचे ध्येय नसून ईश्‍वरप्राप्ती हेच ध्येय आहे’, हे त्यांनी प्रत्येक साधकाच्या अंतर्मनात रुजवले आहे. त्यामुळे व्यावहारिक प्रश्‍नांंविषयी मार्गदर्शन आणि दर्शनसोहळे हे सनातनमध्ये कधीच दिसले नाही.

२२ अं. संस्थेमध्ये पदाधिकारी नसून सर्व सेवक असणे : सनातनचे कार्य बहुअंगी असून ते जगभर पसरलेले आहे. कार्यातील अनेकविध उपक्रम आणि साधकांच्या व्यष्टी साधनेचे दायित्व शेकडो साधकांकडे आहे. इतरत्र असते, तसे संस्थेमध्ये पदाधिकारी, त्यांना सोयी-सुविधा-वेतन असे काही नाही. सर्व सेवेकरीच आहेत. या सर्वांना ‘सेवक’ या संज्ञेनेच संबोधले जाते, कुणीही प्रमुख नसते. साधकांना एखादी सेवा जमते; म्हणून नाही, तर ती सेवा शिकण्यासाठी आणि त्या माध्यमातून त्यांची साधना होण्यासाठी ती सेवा किंवा दायित्व दिले जाते. काही काळाने त्या साधकाचा साधनेचा तो टप्पा पूर्ण झाला, तर तो त्या सेवेत पारंगत झाला असला, तरी त्याच्या साधनेतील पुढील प्रगतीसाठी जी सेवा आवश्यक असेल, ती त्याला दिली जाते.

२३. रामनाथी आश्रम

२३ अ. एखाद्या आदर्श गृहिणीप्रमाणे गृहव्यवस्था करणे 

रामनाथी आश्रमामध्ये २५० हून अधिक साधक सेवा करतात. यांसमवेतच आश्रम पहायला येणारे नवीन साधक, धर्माभिमानी, जिज्ञासू, प्रतिष्ठित पाहुणे अथवा संत यांची ये-जा नेहमी चालूच असते. त्यामुळे या सर्वांच्या निवास व्यवस्थेसह त्यांची अन्य सर्व व्यवस्था, म्हणजे अंघोळ, जेवण, विश्रांती, आजारपण, वाढदिवस, नातेवाइकांचे येणे इत्यादी सर्वच गोष्टींची परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी आदर्श घडी बसवली आहे.

२३ आ. स्वयंपाकघरातील व्यवस्था

. साधक विविध प्रांतांतील असल्याने सर्वांना रुचेल आणि पचेल, असे अन्न बनवले जाते.

२. अन्न न्यून पडू नये आणि अन्नाची नासाडी होऊ नये, यासाठी साधकांचा सकाळ-संध्याकाळचा प्रसाद (चहा-न्याहारी) आणि दोन्ही वेळचा महाप्रसाद (भोजन) यांसाठीच्या प्रत्येक दिवशीच्या सेवेतील साधकांच्या उपस्थितीची नोंद प्रत्येक दिवशी सारणीत केली जाते. सारणीतील नोंदींप्रमाणे तेवढ्या जणांचे अन्न स्वयंपाकघरात शिजवले जाते.

३. अन्न शिल्लक राहिले, तर आधी शिळे अन्न संपवले जाते आणि मगच ताजे अन्न साधक वाढून घेतात.

४. साधकांना असलेल्या तेल, मीठ, तिखट, खोबरे, बटाटा इत्यादी प्रत्येक प्रकारच्या पथ्यानुसार त्याच्यासाठी वेगळे पदार्थ बनवले जातात.

५. एखादा पदार्थ अल्प प्रमाणात असेल, तर तो सर्वांना मिळावा, यासाठी त्या पातेल्यावर ‘प्रत्येकी १ घेणे’ अशा प्रकारची पाटी आधीच लावलेली असते. त्यामुळे साधक तो पदार्थ तितकाच घेतात आणि सर्वांना तो मिळतो.(क्रमश : वाचा उद्याच्या अंकात)

– आधुनिक वैद्या (सौ.) नंदिनी सामंत, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२३.४.२०१७)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक

या लेखाचा पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा ! : https://sanatanprabhat.org/marathi/476036.html