आधुनिक वैद्या (सौ.) नंदिनी सामंत यांनी अनुभवलेले परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे अद्वितीयत्व आणि द्रष्टेपण !

परात्पर गुरु डॉ. आठवले

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यासारख्या अवतारी गुरूंची आणि त्यांच्या अवतारी कार्याची महती माझ्यासारख्या जिवाला काय ज्ञात होणार ? तरीही गेली २३ वर्षे मला स्थुलातून त्यांच्या जवळ रहाण्याचे भाग्य त्यांच्याच कृपेने लाभले आणि त्यांच्या माध्यमातून स्थापन होणार्‍या सनातन धर्मराज्याची (हिंदु राष्ट्राची) जडण-घडण होतांना मला ‘याची देही याची डोळा’ प्रत्यक्ष पहाता आली. जे माझ्या लक्षात आले, ते मी त्यांच्याच कृपेने लिहीत आहे. ७ मेपासून परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी आश्रमाजीवनातून साधकांना दिलेली शिकवण पहात आहोत. आज त्याचाच पुढील भाग पाहूया.

मागील भाग पहाण्यासाठी येथे क्लिक करा ः https://sanatanprabhat.org/marathi/474720.html


परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी आश्रमजीवनातून साधकांना दिलेली शिकवण

सभेनंतर साधकांचा सत्संग घेतांना परात्पर गुरु डॉ. आठवले

२२. फोंडा (गोवा) येथील आश्रम

२२ अ २. उपलब्ध साहित्यातून सात्त्विक रचना करण्यास शिकवणे : आश्रमाच्या परिसरात लाद्या (टाईल्स) बसवण्यासाठी टाईल्सच्या विक्रेत्याकडून लाद्यांचे लहान-मोठे तुकडे निःशुल्क किंवा अत्यल्प मोलाने मिळवून ते बसवायची कल्पनाही त्यांचीच होती. ते तुकडेही कसेही न बसवता कलात्मकतेने सुंदर दिसतील, असे ते प्रयत्नपूर्वक बसवायचे. त्यासाठी अनेकदा ‘टाईल्स’च्या मोठ्या ढिगार्‍यातून अपेक्षित अशी एकेक लादी मिळवून ती जिथे बसवायची असेल, त्या जागेचे माप घेऊन त्या मापानुसार अन्य जागी आधी उपलब्ध लाद्या कलात्मकरित्या बसवून ती रचना सात्त्विक आणि सुंदर झाल्याची निश्चिती करून घ्यायचे. मग ते त्या लाद्या उचलून मूळ ठिकाणी बसवायचे. हे सर्व काम उन्हात अनेक घंटे चालायचे आणि परात्पर गुरु डॉ. आठवले स्वतः हे सर्व करायचे. अशा प्रकारे अनेक वेळा स्वतः करून दाखवून त्यांनी ही पद्धत सिद्ध केली आणि कालांतराने त्यांनी काही साधकांना त्याप्रमाणे ही सेवा करण्यात प्रशिक्षितही केले.

२२ आ. सेवा करतांना आणि उपक्रम राबवतांना ‘साधकाची वैयक्तिक आध्यात्मिक उन्नती’ हाच केंद्रबिंदू ठेवणे

परात्पर गुरु डॉक्टरांनी आश्रमातील साधकांची व्यष्टी साधनेची (वैयक्तिक आध्यात्मिक उन्नतीसाठी केलेले प्रयत्न) आणि समष्टी साधनेची (इतरांच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी केलेले प्रयत्न) घडी बसवण्यासाठी पुष्कळ प्रयत्न केले.

२२ आ १. आश्रम स्तरावर स्वतः साप्ताहिक सत्संग घेणे : ‘साधकांची व्यष्टी साधना आणि समष्टी साधना यांची घडी बसावी’, यासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी आरंभी आश्रमस्तरावर स्वतः साप्ताहिक सत्संग घेतले. नंतर इतर साधकांना यासाठी सिद्ध केले. या सत्संगांत त्या सप्ताहात साधकांकडून झालेल्या चुकांचा ‘साधना आणि कार्य अशा दोन्ही स्तरांवर अंतर्मुख होऊन कसा अभ्यास करायचा ?’, याचे प्रत्येक साधकाकडून प्रात्यक्षिक करून घेतले जात असे. त्यामुळे साधकांना स्वतःची प्रत्येक कृती साधनेच्या दृष्टीने परिपूर्ण करण्याचा दृष्टीकोन प्राप्त झाला.

२२ आ २. साधकांच्या बैठका घेणे

२२ आ २ अ. बैठका म्हणजे साधकांना एकमेकांचे साहाय्य घेण्यासाठी बनवलेले चैतन्यमय व्यासपीठच ! : ‘साधकांना प्रत्येक कृती साधना म्हणून करता यावी’, यासाठी विभागवार बैठका घेण्याची पद्धत परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी निर्माण केली. या बैठका म्हणजे साधकांना त्यांच्या सेवेतील आणि व्यष्टी साधनेतील प्रयत्न, चुका, घडलेले प्रसंग, पुढील दिशा इत्यादींची उघड मनमोकळी चर्चा करून एकमेकांचे साहाय्य घेण्यासाठीचे एक चैतन्यमय व्यासपीठच बनले. या बैठकांमधून प्रत्येक साधकाच्या व्यष्टी आणि समष्टी साधनेचा नियमित आढावा घेतला जातो. या आढाव्यात साधक त्यांच्याकडून झालेल्या चुका स्वतःहून सांगतात किंवा इतरांच्या लक्षात आलेल्या चुका त्या साधकाला सांगतात. या चुकांवर मनमोकळेपणे चर्चा होऊन ‘अशी चूक पुन्हा होऊ नये’, यासाठी उपाययोजना काढली जाते. साधक स्वतःच्या चुका प्रांजळपणे फलकावरही लिहितात आणि स्वतःकडून झालेल्या चुकांचे पापक्षालन करण्याच्या दृष्टीने प्रायश्चित्तही घेतात.

२२ आ २ आ. बैठकांमुळे झालेला लाभ : बैठकांमुळे प्रत्येक साधकाला विविध प्रकारे लाभ झाला.

अ. साधकांचा अहं घटायला साहाय्य झाले.

आ. चुकांचे गांभीर्य मनावर अधिक खोलवर अंकित झाले.

इ. अन्य साधकांना चुकांतून शिकायला मिळाले.

२२ इ. स्वभावदोष निर्मूलन सत्संग : परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे प्रत्येक साधकाची आध्यात्मिक उन्नती होण्याकडे लक्ष असते; म्हणूनच त्यांनी मार्गदर्शक साधकांपासून सर्वच साधकांना त्यांच्या चुकांची सखोल जाणीव करून देण्याच्या दृष्टीने संस्था स्तरावर स्वभावदोष निर्मूलन सत्संग घेतले.

डॉ. (सौ.) नंदिनी सामंत

२२ ई. साधकांच्या संस्था स्तरावरील चुका ‘सनातन प्रभात’ नियतकालिकांमधून छापणे : परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधकांच्या संस्था स्तरावरील चुका दैनिक ‘सनातन प्रभात’मधूनही छापल्या. यातून सनातनचा पारदर्शक कारभार सर्वांच्या लक्षात आला. ते स्वतःकडून झालेली चूकही अत्यंत प्रामाणिकपणे सांगतात. त्यांनी ‘साधकाची वैयक्तिक आध्यात्मिक उन्नती’ हाच केंद्रबिंदू सतत ठेवला आहे. ते नेहमी म्हणतात, ‘साधक मोक्षाला जाणार; कारण ते कार्य नाही, तर सेवा करतात.’

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधकांना स्वतःचे निरीक्षण आणि अभ्यास करणे शिकवले. ‘व्यष्टी आणि समष्टी साधना यांसंदर्भात स्वतःला काही नवीन सूत्रे सुचल्यास अथवा स्वतःकडून काही चुका झाल्यास त्याची लेखी नोंद ठेवणे, काही नवीन सुचवायचे असल्यास ते लेखी स्वरूपात पुढे देणे; एखादे संत वा धर्माभिमानी यांनी मार्गदर्शन केल्यास अथवा जाहीर सभांमधून ते सांगत असलेली सूत्रे लिहून घेणे; प्रत्येक व्यष्टी साधनेचा आढावा, तसेच सेवेच्या संदर्भातील आढावा चालू असतांना त्यातील सूत्रे लिहून घेणे’, असा लिखाणाचा दृढ संस्कार त्यांनी साधकांवर केला. इतरत्र अशा लेखी नोंदी ठेवणे अत्यल्प प्रमाणात दिसतात. ‘नाहीच’ म्हटले, तरी अतिशयोक्ती होऊ नये. याच्या फलस्वरूप साधकांना नेमकेपणाने विचार करण्याची सवय लागली. जे लक्षात आले, त्याचा अधिक खोल संस्कार होण्यास साहाय्यही झाले.

२२ ऊ. साधकांचे सर्वतोपरी दायित्व घेणे : परात्पर गुरु डॉ. आठवले सनातनशी जोडल्या गेलेल्या प्रत्येक साधकाचे पूर्ण दायित्व घेतात. ते त्याची आवड-नावड, वाढदिवस; साधकाच्या आई-वडिलांचे, तसेच साधकांचे स्वतःचे आजारपण; साधकांचे लग्न, त्यांच्या मुलांची मुंज इत्यादी प्रत्येक गोष्टीत पालकाच्या नात्याने पूर्ण साहाय्य करतात. यासाठी आश्रमस्तरावर कार्यपद्धती घातलेल्या आहेत. त्यामुळे संबंधित साधकांच्या वेळेचा आणि धनाचा किमान व्यय (खर्च) होऊन विधी परिपूर्ण आणि सात्त्विक पद्धतीने केले जातात. या विधींना उपस्थित असलेल्या साधकांच्या साधनेला विरोध असलेल्या नातेवाइकांनीही या कार्यक्रमांच्या आयोजनाचे कौतुक केले आहे.

२२ ए. आश्रमातील स्वयंशिस्त : आश्रमातील साधकांमध्ये अनेक साधक अविवाहित आणि तरुण वयोगटातील आहेत. इथे मुले-मुली एकत्रितपणे सेवा करत असूनही समाजात इतरत्र आढळतात, तशा समस्या इथे आढळत नाहीत. सर्वाेच्च न्यायालयाचे अधिवक्ता हरि शंकर जैन जून २०१४ मध्ये काही दिवस आश्रमात वास्तव्यास होते. त्यांनी व्यक्त केलेल्या त्यांच्या मनोगतामध्ये याविषयी अत्यंत मार्मिक टिप्पणी करतांना म्हटले की, ही साधक मुले-मुली आपापल्या सेवेत एवढी मग्न असतात की, त्यांचे एकमेकांकडे लक्षही नाही. आश्रमात छेड-छाड किंवा साधिकांशी असभ्य वर्तन, असे प्रकार इथे होत नाहीत. आपण विचार करायला हवा की, असे का आहे ? हे केवळ साधनेमुळे शक्य झाले आहे. साधनेमुळेच नैतिकता टिकून रहाते.

(क्रमश ः वाचा उद्याच्या अंकात)

– आधुनिक वैद्या (सौ.) नंदिनी सामंत, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२३.४.२०१७)