पुणे – रुग्णसंख्या न्यून होत असल्याने १५ मे पासून पुन्हा दळणवळण बंदी नको, तर लसीकरणाचा वेग वाढवा, अशी मागणी व्यापार उद्योग संघटनांनी केली आहे. ‘मास्क न घालणार्यांवर कठोर कारवाई करणे, सामाजिक सुरक्षित अंतराच्या नियमांचे काटेकोर पालन होईल, यावर प्रशासनाने लक्ष केंद्रित करून आरोग्य व्यवस्था सक्षम करावी’, असे उद्योग क्षेत्राने म्हटले आहे. ‘पुन्हा दळणवळणबंदी केल्यास उद्योग-व्यवसाय रसातळाला जातील. त्यामुळे पुन्हा दळणवळण बंदी करण्याऐवजी कामाच्या ठिकाणी कामगारांना लसीकरण उपलब्ध केले पाहिजे’, असे मत अनेकांनी व्यक्त केले.
प्रत्येक शहरातील परिस्थिती वेगळी असल्याने स्थानिक परिस्थितीनुसार निर्णय घेतला पाहिजे. सरसकट दळणवळण बंदी हा पर्याय होऊ शकत नाही, असे एम.सी.सी.आय.चे अध्यक्ष सुधीर मेहता यांनी सांगितले.
पुन्हा दळणवळण बंदी लागू करणे चुकीचे होईल. आकडेवारी तपासून अर्थव्यवस्थेकडे लक्ष दिले पाहिजे, असे मत पुणे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फत्तेचंद रांका यांनी व्यक्त केले.
‘उद्योगातून राज्य सरकारला मोठ्या प्रमाणात महसूल मिळतो. त्यातूनच अर्थव्यवस्था चालू रहाते; मात्र सध्या उद्योग आणि व्यापार बंद असल्याने अनेक उद्योजक अन् कामगार अडचणीत आले आहेत. त्यामुळे दळणवळण बंदी करण्याऐवजी लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी प्रयत्न करायला हवेत’, असे मत पिंपरी-चिंचवड लघुउद्योग संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे यांनी व्यक्त केले.