फलटण (जिल्हा सातारा) येथील कसाईनगर येथील २ पशूवधगृहांवर धाड !

११२ गोवंशाची सुटका

गोवंशियांना हत्येसाठी आणल्याची माहिती गोरक्षक आणि हिंदुत्वनिष्ठ यांनाच अगोदर कशी मिळते ? पोलिसांना का मिळत नाही, याचा विचार पोलीस करतील का ?

 

सातारा, ३ मे (वार्ता.) – ३० एप्रिल या दिवशी फलटण येथील कसाईनगरमधील २ पशूवधगृहांमध्ये ११२ गोवंश कापण्यासाठी आणण्यात आले होते. ही माहिती मिळताच गोरक्षक आणि हिंदुत्वनिष्ठ यांनी पोलिसांच्या सहकार्याने कसाईनगर येथील पशूवधगृहांवर धाड टाकली. त्याठिकाणी गायी, वासरे, खोंड आणि बैल अशा ११२ जनावरांची सुटका केली. फलटण येथील शिवसेना उपजिल्हाप्रमुख शादाब मुलाणी, गोरक्षक निखिल दरेकर, सचिन शिंत्रे, नीलेश पवार आणि त्यांच्या सहकार्‍यांनी पीपल फॉर अ‍ॅनिमल या संघटनेचे अधिकारी चेतन शर्मा आणि जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांना संपर्क केला. तसेच फलटण पोलीस ठाण्यातही माहिती दिली. त्यानुसार फलटण पोलिसांनी तात्काळ एक पथक सिद्ध करून माहिती दिलेल्या ठिकाणी धाड टाकली; परंतु अंधाराचा लाभ उठवत कसाई पळून जाण्यात यशस्वी झाले. (अंधाराचा लाभ उठवत कसाई पळून जातात याचा अर्थ पोलिसांचे नियोजन अल्प पडले कि पोलिसांनी त्यांना जाणूनबुजून जाऊ दिले ? अशा पोलिसांवरही कारवाई व्हायला हवी ! – संपादक) पशूवधगृहात जनावरांच्या रक्ताचे पाट वहात होते. एकेठिकाणी १०५ लहान-मोठी वासरे आणि खोंड यांच्या तोंडाला चिकटपट्टी बांधून त्यांना ठेवले होते. जवळच ६ मोठ्या गायी आणि १ बैल बांधून ठेवले होते. पोलिसांनी ४ लाख ४५ सहस्र रुपयांचा मुद्देमाल कह्यात घेतला. सुटका केलेल्या गोवंशाची पाठवणी सरसेनापती हंबीरराव मोहिते गोशाळेमध्ये करण्यात आली आहे. या प्रकरणी इरफान कुरेशी यांच्यावर फलटण पोलीस ठाण्यात १९६/२०२१ महाराष्ट्र पशूसंरक्षण अधिनियम ५ ब, महाराष्ट्र पशूछळ अधिनियम ११ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.