देशात तात्काळ दळणवळण बंदी लावा !

‘कोविड टास्क फोर्स’च्या सदस्यांचा केंद्र सरकारला सल्ला

प्रतिकात्मक छायाचित्र

नवी देहली – आम्ही गेल्या काही दिवसांपासून सातत्याने सांगत आहोत की, लोकांना दळणवळण बंदी ही किती महत्त्वाची आहे, हे सांगितले जावे. सध्या आपण जशी अंशत: बंदी आणत आहोत, तशी नाही, तर देशव्यापी दळणवळण बंदी हवी; कारण कोरोनाचा संसर्ग संपूर्ण देशात वाढत आहे, असा सल्ला ‘कोविड टास्क फोर्स’च्या सदस्यांनी केंद्र सरकारला दिला आहे. व्ही.के. पॉल हे या टास्क फोर्सचे प्रमुख असून ते थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या संदर्भातील माहिती देत असतात. टास्क फोर्समध्ये एम्स आणि आयसीएम्आर् यांसारख्या संस्थांच्या तज्ञांचा समावेश आहे.

या फोर्सच्या एका सदस्याने सांगितले की, आपण या परिस्थितीकडे चुकीच्या दृष्टीकोनातून पहात आहोत. आरोग्य व्यवस्थेची वाढ उत्तम करण्यासाठी एक मर्यादा असते. आपण ऑक्सिजनचा पुरवठा सुधारला आहे; मात्र रुग्णांची वाढती संख्या पहाता आताही ऑक्सिजनची न्यूनता आहे. कोरोनाचा संसर्ग एकातून दुसर्‍या व्यक्तीत होतो. अशा वेळी दळणवळण बंदी करून संसर्गाची साखळी तोडणे, हा योग्य मार्ग आहे.