उच्चस्तरीय समितीची नियुक्ती
ठाणे, २६ एप्रिल (वार्ता.) – येथील वर्तकनगर भागातील वेदांत रुग्णालयात ४ कोरोनाबाधित रुग्णांचा ऑक्सिजनअभावी मृत्यू झाला, असा आरोप मृतांच्या नातेवाइकांनी केला आहे; मात्र रुग्णालयाने हा आरोप फेटाळला आहे. रुग्णांच्या मृत्यूनंतर नातेवाइकांनी रुग्णालयासमोर आक्रोश केला. मनसे आणि भाजप पक्षांच्या पदाधिकार्यांनी घटनास्थळी धाव घेतली. ऑक्सिजन संपल्यामुळेच रुग्णांचा मृत्यू झाल्याचा थेट आरोप मनसेकडून करण्यात आला आहे, तर ऑक्सिजन संपत आल्यानंतरही रुग्णालय प्रशासनाकडून तजवीज करण्यात आली नसल्याने रुग्णांचे नातेवाईक संतप्त झाले होते, असे नागरिकांचे म्हणणे आहे. पोलिसांकडून कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता.‘या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी भिवंडीचे आयुक्त डॉ. पंकज अशिया यांच्या अध्यक्षतेखाली ६ जणांच्या समितीची नियुक्ती केली आहे. समितीकडून या प्रकरणाची चौकशी करून प्रकरणाचा सविस्तर अहवाल आल्यानंतर दोषींवर कारवाई करण्यात येईल’, असे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे. ‘उच्चस्तरीय समितीच्या अहवालानंतर दोषींवर कारवाई केली जाईल. कुणालाही पाठीशी घातले जाणार नाही’, असे आश्वासन ठाण्याचे नगरविकास मंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.