सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोना रुग्णांसाठी २०० अतिरिक्त खाटांची व्यवस्था

  • पालकमंत्री उदय सामंत यांची पत्रकार परिषदेत माहिती

  • कोविड केंद्र चालू करण्यावर भर

  • जिल्ह्यात कम्युनिटी स्प्रेडचा प्रारंभ

उदय सामंत

सिंधुदुर्ग – सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेता, जिल्हा रुग्णालयासह अन्य नियोजित ठिकाणी आणखी २०० खाटांची व्यवस्था करण्यात येणार आहे. जिल्हा रुग्णालयात सध्या केवळ ३० खाटा शिल्लक आहेत. यासह कोरोनाबाधितांना लवकराच लवकर उपचार मिळावेत, यासाठी जिल्ह्यातील खासगी डॉक्टर, जिल्हा प्रशासन आणि जिल्हा रुग्णालय यांनी एकत्र येऊन कोरोना केंद्र चालू करण्यासाठी प्रयत्न करावेत, तसेच ज्या डॉक्टरांना कोरोना केंद्र चालू करायचे असेल, त्यांना अनुमती दिली जाईल, असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत केले.

या वेळी पालकमंत्री सामंत म्हणाले,

१. कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यातील आरोग्य अधिकारी, सर्वपक्षीय नेते, खासगी डॉक्टर यांची बैठक घेऊन चर्चा केली. या वेळी सर्वांनी सहकार्य करण्याची सिद्धता दर्शवली.

२. गतवर्षीच्या कोरोनाच्या संसर्गाचे प्रमाण पहाता आताचे प्रमाण तिप्पट आहे. त्यामुळे कठोर निर्बंधांशिवाय पर्याय नाही. त्यामुळे निर्बध शिथिल करण्याविषयी आता बोलणे कठीण आहे.

३. जिल्ह्यात गृहअलगीकरण बंद करण्याचा विचार होता; पण रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता, गृहअलगीकरण रहित केले, तर आरोग्य यंत्रणेवर आणि शासकीय रुग्णालयांवर ताण येणार.

४. पत्रकारांनी कोरोनाला घालवण्यासाठी सकारात्मक जनजागृती करावी. राजकीय पक्षांनी आता राजकारण करू नये. टीकाटिपणी करू नये. चुका असल्यास अवश्य सांगा, मार्गदर्शन घेऊन त्या दूर केल्या जातील.

५. खासगी वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टर, तसेच खासगी डॉक्टर आणि परिचारिका उपलब्ध झाल्यास त्यांना चांगले मानधन देऊन कार्यरत करण्याची सिद्धता आहे.

६. खासगी डॉक्टर, जिल्हा प्रशासन आणि जिल्हा रुग्णालय प्रशासन यांनी एकत्र येऊन कोरोना केंद्र चालू करण्यासाठी प्रयत्न करावे, अशा सूचना दिल्या आहेत. यामध्ये केंद्राला पायाभूत सुविधा सरकार देईल, तर डॉक्टरांनी येऊन सेवा द्यायची आहे. त्यांचे शुल्क जिल्हाधिकारी ठरवतील.

७. कोरोना केवळ शहरात नाही, तर आता ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात पसरत आहे. दिगोशी गाव संपूर्ण प्रतिबंधित क्षेत्र घोषित केले आहे, तसेच होऊ नये म्हणून प्रशासनाला सहकार्य करा.

८. जिल्ह्यात सार्वजनिक संसर्ग (कम्युनिटी स्प्रेड) होण्यास प्रारंभ झाला आहे, त्यामुळे नियम पाळले गेले नाहीत, तर भयावह स्थिती निर्माण होऊ शकते.

९. खासगी रुग्णालयात कोरोनाबाधितांवर उपचारांसाठी ५ खाटा असतील.

१०. कोरोनाची ही लाट आगामी १५ दिवसापर्यंत वाढेल, नंतर हळूहळ न्यून होत जाईल.