|
हरिद्वार, २ एप्रिल (वार्ता.) – बैरागी आखाड्यातील अनेक साधूसंतांच्या आखाड्यांना वीज जोडणीसह अन्य पायाभूत सुविधा अद्याप उपलब्ध झालेल्या नाहीत. त्यामुळे १ एप्रिल २०२१ या दिवशी रात्री बैरागी आखाड्यातील एका बैठकीत अप्पर मेळा अधिकारी हरबीर सिंह यांना साधूसंतांच्या रोषाला सामोरे जावे लागले. काही संतांनी अन्य पायाभूत सुविधा पुरेशा प्रमाणात अद्याप उपलब्ध न झाल्याविषयी प्रशासनाला जाब विचारला. प्रशासनाकडून होत असलेल्या या निष्काळजीपणामुळे बैठकीत हरबीर सिंह यांच्याशी किरकोळ वाद होऊन त्यांना धक्काबुक्की झाल्याचा प्रकार घडला.
१. विविध आखाड्यांच्या साधूसंतांना वारंवार मेळा कार्यालयात प्रशासनाचे उंबरे झिजवावे लागत आहेत. वारंवार विनवण्या करूनही भूमी वाटपासह अन्य पायाभूत सुविधा मिळत नसल्याने अधिकारी आणि साधू-संत यांच्यामध्ये वादही होत होते. तरीही प्रशासनाकडून याची विशेष नोंद न घेता धीम्या गतीनेच कामकाज चालू होते.
२. अखिल भारतीय निर्मोही अणी आखाड्यामध्ये पायाभूत सुविधांविषयी हरबीर सिंह संतांसमवेत बैठक घेत होते. या वेळी काही संतांनी वीजजोडणी देण्यामध्ये प्रशासनाकडून भेदभाव केला जात असल्याचा आरोप केला. याचसमवेत शौचालय, पाणपोई या सुविधाही अद्याप काही ठिकाणी पुरवल्या नाहीत. अंतर्गत रस्त्यांवर अद्याप खडी टाकलेली नाही, असे निदर्शनास आणले. तसेच अन्य काही संतांनी अन्य पायाभूत सुविधा पुरेशा प्रमाणात अद्याप उपलब्ध न झाल्याविषयी प्रशासनाला जाब विचारला.
३. प्रशासनाकडून होत असलेल्या निष्काळजीपणामुळे बैठकीत हरबीर सिंह यांच्याशी कोरकोळ वाद होऊन धक्कीबुक्की झाली.
४. या घटनेविषयी सिंह यांना विचारणा केली असता ‘त्यांनी सर्व पायाभूत सुविधा पुरवल्याचा दावा करून अपसमजातून रात्रीचा प्रकार झाला आहे’, असे सांगितले. (प्रत्यक्षात अनेक साधूसंतांच्या मंडपापर्यंत रस्त्यांसह अन्य पायाभूत सुविधा पोचलेल्या नाहीत. असे असतांना अशा प्रकारचे विधान करणार्या अधिकार्यांची सरकारने गच्छंती केली, तर अन्य अधिकारी असंवेदनशीलता दाखवण्यास धजवणार नाहीत, असेच सर्वसामान्यांना वाटते ! – संपादक)
मुख्यमंत्री तीरथसिंह रावत यांच्यासह मंत्रीमंडळातील अनेक मंत्र्यांनी इतकेच नव्हे, तर काही केंद्रीय मंत्री यांनीही कुंभमेळ्यात आखाड्यांना सुविधा मिळाव्यात; म्हणून मार्च मासात अनेक दौरे केले, तर काहींचे दौरे अद्याप चालू आहेत. साधूसंत आणि भाविक यांना वेळेत सर्व सुविधा मिळाव्यात, यासाठी राज्यस्तरावरूनही मुख्य सचिवांसह अनेक अधिकारी वारंवार दौर्यांवर दौरे करत आहेत. प्रशासनाने १ एप्रिल पूर्वी सर्व आखाड्यांना पायाभूत सुविधा पुरवण्याचे वारंवार आश्वासनही बैठकांमधून दिले होते. कुंभमेळ्यासाठी विकासकामांवर कोट्यवधी रुपये व्यय करून कामे झाल्याचा दावा मुख्यमंत्री करत आहेत; मात्र प्रत्यक्षात सरकारने घोषित केलेला कुंभमेळा १ एप्रिलपासून चालू होऊनही बैरागी आखाड्यांमध्ये अद्याप अनेक ठिकाणी अंतर्गत रस्त्यांसह अन्य पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात प्रशासन पूर्णपणे अपयशी ठरल्याचे चित्र दिसत आहे. |