कुंभमेळ्यातील संतांच्या व्यवस्थेसाठी विशेष समितीची स्थापना ! – बंशीधर भगत, शहरविकास मंत्री, उत्तराखंड

हरिद्वार कुंभमेळ्यामध्ये येणार्‍या संतांची चांगल्या प्रकारे व्यवस्था व्हावी, यासाठी विशेष समिती बनवण्यात आल्याचे शहरविकास मंत्री बंशीधर भगत यांनी घोषित केले. या वेळी त्यांनी कुंभमेळ्यासाठी करण्यात आलेली विकासकामे आणि आखाड्यांना देण्यात आलेल्या सुविधा यांची पहाणी केली. त्यानंतर ही कामे लवकरात लवकर होऊन सर्व सुविधा उपलब्ध होत आहेत ना, यांचे निरीक्षण करण्यासाठी ही समिती भगत यांनी नेमली आहे. या समितीमध्ये ऊस राज्यमंत्री स्वामी यतीश्‍वरांनद आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ. जयपालसिंह चौहान यांची नेमणूक करण्यात आली आहे. ते प्रशासन आणि आखाडे यांमध्ये समन्वय करणार आहेत.

भगत यांनी आखाडा परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री महंत नरेंद्र गिरि महाराज, सचिव श्री महंत रविंद्र पुरी महाराज यांची भेट घेतली. भाविकांची वाढती संख्या पहाता शौचालये अपुरी पडू शकतात, असे सांगून ‘त्यात वाढ करण्यात यावी’, अशी मागणी संतांनी केली. (संतांना अशी मागणी करावी लागणे, हे प्रशासनाला लज्जास्पद ! – संपादक) आखाडा परिषदेचे महामंत्री श्री महंत हरि गिरि महाराज यांनी आखाड्यांसाठी सरकारच्या वतीने शिधावाटप करण्यात यावे, अशी मागणी केली. त्यावर राज्यमंत्र्यांनी ‘लवकरच सरकारच्या वतीने सर्व आखाड्यांना अन्नधान्य (शिधा) वाटप करण्यात येईल’, असे आश्‍वासन दिले.