प्रसिद्ध हिंदुत्वनिष्ठ आणि पत्रकार फ्रान्सुआ गोतिए यांचे ट्विटर खाते बंद !

  • ट्विटरचा हिंदुद्वेष आणि भारतद्वेष पुन्हा एकदा उघड !

  • ब्रिटिश साम्राज्यशाहीला आव्हान देणारे ‘ऍन एन्टायर्ली न्यू हिस्ट्री ऑफ इंडिया’ पुस्तक लिहिल्यावरून कारवाई केल्याचा संशय व्यक्त !

  • सार्वभौम आणि सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारताला तथाकथित ‘अभिव्यक्तीस्वातंत्र्या’चे डोस पाजणार्‍या ट्विटरची ही दुटप्पी भूमिका नव्हे तर काय ? हिंदूंनो, ट्विटरच्या उद्दामपणाला आता संघटितपणे विरोध करण्याची आवश्यकता असल्याचे जाणा !
  • भारताचा नव्याने सत्य इतिहास लिहिण्याची आवश्यकता आहे, असे अनेक वेळा सांगितले गेले; मात्र कृती झाली नाही. वास्तविक अशी कृती सरकारी यंत्रणांकडून याआधीच होणे अपेक्षित होते; मात्र ते फ्रेंच पत्रकाराने केले, हे भारतीय यंत्रणेला लज्जास्पद. आता सरकारनेच ट्विटरला याचा जाब विचारून त्याची जागा दाखवून देणे आवश्यक !

नवी देहली – प्रसिद्ध हिंदुत्वनिष्ठ आणि फ्रेंच पत्रकार फ्रान्सुआ गोतिए यांना कोणतीच पूर्वकल्पना न देता ट्विटरने त्यांचे खाते बंद केले आहे. या विरोधात हिंदुत्वनिष्ठांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. यासाठी #ISupportGautier या हॅशटॅगने ९ मार्च या दिवशी ट्विटर ट्रेंडही करण्यात आला. ‘गरुडा प्रकाशन’ नावाच्या संस्थेने ५ मार्च या दिवशी केंद्रीय स्वास्थ्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्या हस्ते फ्रान्सुआ गोतिए लिखित पुस्तक ‘ऍन एन्टायर्ली न्यू हिस्ट्री ऑफ इंडिया’ (भारताचा एकदम नव्या पद्धतीने लिहिलेला इतिहास) प्रकाशित केले. या पुस्तकातून गोतिए यांनी ब्रिटिश साम्राज्यशाहीला आव्हान दिले असून पाश्‍चिमात्य देशांनी भारताचा इतिहास कशा प्रकारे कलंकित आणि कावेबाजपणे खोटा प्रसारित केला, यावर आसूड ओढले आहे. यामुळेच ट्विटरने ही कारवाई केल्याचे मत गरुडा प्रकाशनचे अध्यक्ष श्री. संक्रांत सानू यांनी व्यक्त केले आहे.

गोतिए यांनी याआधीही काश्मिरी हिंदूंचा वंशविच्छेद, औरंगजेबाची क्रूरता आदी सत्य इतिहास जागतिक व्यासपिठावर परिणामकारकणे मांडला होता.

फ्रान्सुआ गोतिए लिखित पुस्तक ‘ऍन एन्टायर्ली न्यू हिस्ट्री ऑफ इंडिया’चा संक्षिप्त परिचय !

आज प्रचलित असलेला भारतीय इतिहास हा पाश्‍चात्त्य इतिहासकार आणि त्यांचे समर्थक भारतीय विद्वान यांनी ख्रिस्ती धारणेनुसार ६ सहस्र वर्षांचाच मानवी इतिहास असल्याचे गृहीत धरून लिहिला आहे. या इतिहासकारांची गृहितके आणि तत्त्वे यांना समर्पक होईल, अशा प्रकारे भारतातील अनेक ऐतिहासिक तथ्यांना पुष्कळ विलंबाने घडल्याचे दाखवण्यात आले आहे. ‘आर्य आक्रमणा’चा खोटा इतिहासही त्यात आलाच ! तसेच वेदांमध्ये सरस्वती नदीचा ६० हून अधिक वेळा उल्लेख असूनही या महाशयांनी तिला ‘दंतकथा’ असल्याचे म्हणत दुष्प्रचार केला आहे. राजा अशोकने कलिंगच्या युद्धानंतर प्रायश्‍चित्त म्हणून बौद्ध धर्म स्वीकारल्याचा खोटेपणाही या पुस्तकातून फ्रान्सुआ गोतिए यांनी समोर आणला आहे. एकूण पहाता, या पुस्तकाद्वारे गोतिए यांनी भारतीय इतिहास नव्याने लिहिला असून प्रत्येक मोठी घटना वैज्ञानिक, भाषिक आणि अनुवांशिक शोधांच्या आधारे सादर केली आहे. या माध्यमातून भारतीय इतिहास पुष्कळ प्राचीन असल्याचे त्यांनी समोर आणले आहे.