Diwali Leave In US State Ohio : अमेरिकेतील ओहायो राज्यात हिंदु विद्यार्थ्यांना दिवाळी आणि अन्य हिंदु सणांच्या वेळी सुट्या मिळणार !

ओहायो (अमेरिका) – अमेरिकेच्या ओहायो राज्यामधील हिंदु विद्यार्थ्यांना  दिवाळीची सुटी मिळणार आहे. तसेच हिंदु विद्यार्थी त्यांच्या शैक्षणिक वर्षांत धार्मिक उत्सवाच्या वेळीही वर्षातून २ वेळा सुट्या घेऊ शकतात. भारतीय अमेरिकी आमदार नीरज अँटनी यांनी ही घोषणा केली. ते म्हणाले, ‘‘माझ्याद्वारे आणलेले या संदर्भातील विधेयक ओहायो स्टेट हाऊस आणि सिनेट यांनी प्रथम संमत केले. आता ओहायोचे राज्यपाल माईक डीविन यांनी ते संमत केले.’’

आमदार नीरज अँटनी म्हणाले की,

१. नवीन विधेयकामुळे ओहायोमधील प्रत्येक हिंदु विद्यार्थी वर्ष २०२५ मध्ये दिवाळीमध्ये सुटी घेऊ शकतील. तसेन अन्यही २ सणांच्या वेळी सुट्या घेऊ शकतील. हा ओहायोमधील हिंदूंचा अविश्‍वसनीय विजय आहे. ओहायो हे अमेरिकेच्या इतिहासातील पहिले राज्य आहे, जिथे प्रत्येक विद्यार्थ्याला दिवाळीची सुटी मिळेल.

२. आमच्या कायद्यानुसार विद्यार्थ्यांना इतर २ धार्मिक सुटी घेण्याची अनुमती दिली जाईल. याचा अर्थ असा आहे की गुजराती हिंदु विद्यार्थी नवरात्र किंवा अन्नकूट महोत्सव (गोवर्धन पूजा) या सणांसाठी एक दिवस सुटी घेऊ शकतात. तेलुगु हिंदु विद्यार्थी उगडीची, तमिळ हिंदु विद्यार्थी पोंगलची, बंगाली हिंदु विद्यार्थी दुर्गा पूजेसाठी, पंजाबी हिंदु विद्यार्थी लोहरीला, तर इस्कॉन संप्रदायानुसार साधना करणारे हिंदु विद्यार्थी कृष्णजन्माष्टमीला सुटी घेऊ शकतील.

३. ओहायोमध्ये कोणत्याही हिंदु मुलाला उत्सवामुळे अभ्यासामध्ये समस्या येणार नाहीत. विधेयकानुसार पालक शाळेच्या मुख्याध्यापकांना सुटी घेण्यासाठी स्वाक्षरी केलेले पत्र पाठवतील. या पत्रात विद्यार्थ्याने घेतलेल्या धार्मिक सुटीचा उल्लेख असेल. स्वाक्षरी केलेले पत्र शाळेच्या वर्षाच्या पहिल्या दिवसापासून १४ दिवसांच्या आत मुख्याध्यापकांना पाठवले जाईल.