Abdul Rehman Makki Died : पाकिस्तानी जिहादी आतंकवादी हाफिज अब्दुल रहमान मक्की याचा हृदयविकाराच्या झटक्यामुळे मृत्यू

पाकिस्तानी जिहादी आतंकवादी हाफिज अब्दुल रहमान मक्की

इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकिस्तानी जिहादी आतंकवादी हाफिज अब्दुल रहमान मक्की याचा पाकमध्ये हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला. तो लष्कर-ए-तोयबाचा उपप्रमुख होता. तसेच हाफिज महंमद सईद याचा नातेवाईक होता. वर्ष २०२३ मध्ये मक्की याला संयुक्त राष्ट्रांनी आंतरराष्ट्रीय आतंकवादी घोषित केले होते. त्या अंतर्गत मक्कीची सर्व संपत्ती जप्त करण्यात आली होती. त्याखेरीज मक्कीच्या प्रवासावर आणि शस्त्र बाळगण्यावर प्रतिबंध घालण्यात आले होते.

आतंकवादी मसूद अझहर याला अफगाणिस्तानमध्ये हृदयविकाराचा झटका

आतंकवादी मसूद अझहर

जैश-ए-महंमद या जिहादी आतंकवादी संघटनेचा प्रमुख आणि भारतासाठी पसार असणारा मसूद अझहर याला हृदयविकाराचा झटका आला आहे. तो अफगाणिस्तानच्या खोस्त प्रांतात आतंकवाद्यांना प्रशिक्षण देत होता. येथेच त्याला हृदयविकाराचा झटका आला. सध्या त्याला उपचारासाठी पाकिस्तानात आणण्यात आले आहे. त्याच्यावर कराचीतील सैन्य रुग्णालयामध्ये उपचार चालू आहेत. त्याला लवकरच रावळपिंडी येथे उपचारासाठी पाठवले जाऊ शकते, असे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.

मसूद अझहर भारतीय संसद, पंजाबमधील पठाणकोट आणि काश्मीरमधील पुलवामा येथील सैन्यावरील आक्रमणे यांचा प्रमुख सूत्रधार आहे. त्याने वर्ष २००५ मध्ये अयोध्येतील रामजन्मभूमीवर आक्रमण केले होते. यासह वर्ष २०१६ मध्ये जम्मूच्या उरी येथील सैन्यतळावर आणि अफगाणिस्तानातील मजार-ए-शरीफ येथील भारतीय वाणिज्य दूतावासावरील आक्रमणामागेही तो आहे. त्याला भारताने अटकही केली होती; मात्र वर्ष कंदहार विमान अपहरणाच्या वेळी सोडण्यात आलेल्या आतंकवाद्यांमध्ये त्याचाही समावेश होता. संयुक्त राष्ट्रांनी त्याला आंतरराष्ट्रीय आतंकवादी घोषित केलेले आहे.