Sambhal Mrityu Koop : संभल (उत्तरप्रदेश) येथील जामा मशिदीपासून अवघ्या १५० मीटर अंतरावर सापडली प्राचीन ‘मृत्यूची विहीर’

प्राचीन ‘मृत्यूची विहीर’

संभल (उत्तरप्रदेश) – येथे सध्या चालू असलेल्या पुरातन वास्तूंच्या शोधमोहिमेमध्ये प्राचीन विहीर सापडली आहे. ‘मृत्यूची विहीर’ म्हणून ती ओळखली जात होती. तिला बुझवण्यात आले होते. आता प्रशासनाने तिचे खोदकाम चालू केले आहे. ही विहीर संभलच्या सार्थल चौकीजवळ आहे. ‘या विहिरीत स्नान केल्याने मोक्ष मिळतो’, अशी लोकांची श्रद्धा होती. शाही जामा मशिदीपासून ती केवळ १५० मीटर अंतरावर आहे, जिथे सर्वेक्षणावरून गदारोळ झाला होता. संभलमध्ये २४ कोसी परिक्रमेच्या मार्गावर येणार्‍या ६८ देवस्थान आणि १९ विहिरी यांचा शोध प्रशासनाकडून घेण्यात येत आहे. आतापर्यंत २२ विहिरी सापडल्या आहेत. सापडणार्‍या वास्तूंचा जीर्णोद्धार करण्यात येणार आहे.

वर्ष १९८५ मध्ये लिहिलेल्या पुस्तकातही या विहिरीचा उल्लेख आहे. या पुस्तकात संभल परिक्रमा आणि येथील तीर्थक्षेत्रे यांविषयी लिहिले आहे. या पुस्तकात ‘विमल कुप’(विमल विहीर) आणि बली कुप (बली विहीर) आदींचा यात उल्लेख आहे. या विहिरीवर अतिक्रमण झाल्याचा आरोप स्थानिक हिंदूंनी केला आहे. या भूमीवर मुसलमान दावा करत आहेत. पुरातत्व विभागाने संभलमधील काही ठिकाणांची पहाणीही केली आहे.