लाडू देतांना खासगी दुकानदारांकडून भाविकांची लूट !
शिर्डी (जिल्हा नगर) – कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी श्री साई मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी बंद करण्यात आले होते; मात्र पुन्हा श्री साई मंदिर भाविकांसाठी खुले होऊन ४ मास होत आले आहेत. असे असतांना श्री साईबाबा संस्थानकडून भाविकांना देण्यात येणारा लाडू-प्रसाद अद्याप संस्थानने चालू केलेला नाही. हा लाडू-प्रसाद चालू करण्यात यावा, अशी मागणी साईभक्तांनी श्री साई संस्थानकडे केली आहे.
शिर्डी येथे श्री साईबाबांचा प्रसाद म्हणून श्री साई संस्थानकडून देण्यात येणारे साजूक तुपात बनवलेल्या बुंदीचे लाडू प्रसिद्ध आहेत. दिवसेंदिवस या प्रसादाची मागणी वाढत आहे. यासाठी श्री साईबाबा संस्थानमध्ये स्वतंत्र विभाग आहे. संस्थानकडून एका पाकिटात ३ लाडू बांधून २५ रुपयांना दिले जातात. भाविकही या प्रसादाला पसंती देतात. इतर देवस्थानांकडून भाविकांना दिला जाणारा प्रसादही चालू करण्यात आला आहे; मात्र श्री साई संस्थानने अद्याप हा प्रसाद चालू केला नाही, असे भाविकांनी सांगितले.
लाडू देतांना खासगी दुकानदारांकडून भाविकांची लूट !
शिर्डी येथील काही व्यावसायिकांनी आपल्या दुकानात थेट लाडू विक्री चालू केली आहे. या दुकानदारांकडून एका पाकिटात ४ लाडू बांधून भाविकांना चढ्या दरात विक्री केली जात असल्याने भाविक अप्रसन्नता व्यक्त करत आहेत. श्री साई संस्थानने त्वरित लाडू-प्रसाद चालू करून भाविकांची होणारी लूट थांबवावी आणि भाविकांना संस्थानचा लाडू-प्रसाद द्यावा, अशी मागणी केली.