कराड, १९ मार्च (वार्ता.) – येथील प्रीतिसंगमावरील कराडचे ग्रामदैवत कृष्णामाई मंदिरात चोरी झाली आहे. १७ मार्चच्या पहाटे मंदिराचे पुजारी मंदिरात पूजेसाठी आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. अनुमाने ४०० ते ५०० रुपयांची चिल्लर चोरट्याने चोरून नेली आहे. याविषयी कोणतीही तक्रार आली नसल्याने गुन्हा नोंदवण्यात आला नाही, असे कराड शहर पोलिसांनी सांगितले. (पोलिसांची अशीच भूमिका इतर पंथियांच्या श्रद्धास्थानांच्या संदर्भातही असली असती का ? – संपादक)
याविषयी मंदिराचे पुजारी आवटे म्हणाले, ‘‘१७ मार्चच्या पहाटे पूजा करण्यासाठी मी मंदिरामध्ये आलो. तेव्हा मंदिराच्या दरवाजाची कुलपे तुटलेली होती. मंदिरातील दानकुंडात पैसे नसल्याचे लक्षात आले. चोरांनी मंदिराच्या नदीकडील दरवाजाचे कुलूप तोडून आतील दरवाज्याचे कुलूप तोडण्याचा प्रयत्न केला; मात्र तो यशस्वी झाला नाही. नंतर मंदिराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून चोरांनी मंदिरामध्ये प्रवेश केला असावा. मंदिरातील एका दानकुंडात ठेवलेली चिल्लर त्यांनी चोरून नेली. मंदिरामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे नसल्यामुळे चोरीचे असे प्रकार वारंवार घडत आहेत. त्यामुळे ग्रामदैवत कृष्णामाई मंदिराच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. नागरिक सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची मागणी करत आहेत.’’ (अशी मागणी का करावी लागते ? कृष्णामाई मंदिरात वारंवार चोरी होत असूनही येथे सीसीटीव्ही कॅमेरे का बसवले गेले नाहीत ? यातून प्रशासनाला हिंदूंच्या मंदिरांचे रक्षण व्हावे, असे वाटत नाही, असे हिंदूंनी समजायचे का ? – संपादक)
संपादकीय भूमिकाहिंदूंनी जागृत आणि संघटित होऊन मंदिरांचे रक्षण करणे आवश्यक आहे ! |