Kerala HC Slams Temple Board : हा मंदिराचा उत्सव आहे कि महाविद्यालयाचा ?

  • केरळमध्ये मंदिरात मंदिराच्याच निधीतून संगातीचा कार्यक्रम सादर केल्याचे प्रकरण

  • केरळ उच्च न्यायालयाने मंदिर व्यवस्थापन मंडळाला फटकारले !

श्री कडक्कल देवी मंदिरातील संगीत कार्यक्रमावरून उच्च न्यायालयाची फटकार !

थिरूवनंतपूरम् (केरळ) – केरळ उच्च न्यायालयाने कोल्लममधील श्री कडक्कल देवी मंदिराचे व्यवस्थापन करणार्‍या मंडळाला फटकारले आणि १० मार्च या दिवशी मंदिराच्या ठिकाणी झालेल्या संगीताच्या कार्यक्रमाविषयी स्पष्टीकरण मागितले. न्यायालयाने विचारले, ‘तुम्ही मंचावर कोणत्या प्रकारची सजावट केली आहे ? हा महाविद्यालयातील उत्सव आहे का ? हे करण्यासाठी तुम्ही भक्तांकडून पैसे घेतले आहेत का ? हा मंदिराचा उत्सव आहे. मंदिरात चित्रपटगीते नव्हे, तर भक्तीगीते लावायला हवी होती, अशा शब्दांत न्यायालयाने मंडळाला फटकारले. या उत्सवाच्या वेळी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि त्याच्या ‘डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया’ या विद्यार्थी संघटनेचे झेंडेही लावण्यात आले होते. यासमवेत साम्यवादी राजकीय गटांशी संबंधित क्रांतीकारी गाणीही लावण्यात आली होती.

केरळ उच्च न्यायालयाने मंदिर मंडळाला चेतावणी दिली की, ‘मंडळाद्वारे व्यवस्थापित केलेल्या कोणत्याही मंदिरात अशा घटना घडू नयेत.’ त्याच वेळी, मंदिर मंडळाने म्हटले की, ‘मंदिर सल्लागार समितीने त्यांना न कळवता संगीतमय कार्यक्रम आयोजित केला होता.’ तथापि त्रावणकोर देवस्वोम मंडळाच्या या युक्तीवादाशी न्यायालय सहमत नव्हते. अधिवक्ता विष्णु सुनील यांची याचिका न्यायालयाने स्वीकारली आणि श्री कडक्कलदेवी मंदिर सल्लागार समिती आणि इतर प्रतिवादींकडून त्यावर उत्तर मागितले.

मंदिराच्या निधीचा गैरवापर रोखता आला असता !

उच्च न्यायालयाने म्हटले आहे की, मंडळाने घेतलेल्या भूमिकेने आम्ही प्रथमदर्शनी प्रभावित झालेलो नाही. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, एलईडी स्क्रीन आणि फ्लॅश लाईट्सने सुसज्ज असलेल्या मंचावरील विविध व्यवस्थेसाठी मोठी रक्कम खर्च करण्यात आली आहे. मंदिराच्या निधीचा असा गैरवापर रोखता आला असता. कोणत्याही संघटनेला किंवा भाविकांच्या गटाला मंदिरातील उत्सव आयोजित करण्यासाठी भाविकांकडून किंवा जनतेकडून पैसे गोळा करण्याची अनुमती दिली जाणार नाही. निधीचे कोणतेही संकलन मंडळाच्या अनुमतीने केले पाहिजे. गोळा केलेल्या सर्व पैशांचे सरकारकडून लेखापरीक्षण केले जाईल. मागील निर्णयांमध्ये मंदिर समित्यांनी गोळा केलेल्या मंदिर निधीच्या संरक्षणासाठी मार्गदर्शक तत्त्वे प्रसारित केली आहेत.

त्रावणकोर देवस्वोम बोर्डाच्या अधिवक्त्यांनी न्यायालयाला सांगितले की, मुख्य दक्षता आणि सुरक्षा अधिकारी (पोलीस उपनिरीक्षक) यांना घटनेची चौकशी करण्यास अन् अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. मंदिर सल्लागार समितीला ‘कारणे दाखवा’ नोटीसही बजावण्यात आली आहे.

धर्मनिरपेक्षतेच्या तत्त्वाचे उल्लंघन ! – याचिकाकर्ता

याचिकाकर्ते अधिवक्ता विष्णु सुनील यांनी म्हटले आहे की, गायिका अलोशी ॲडम यांना उत्सवात संगीत सादर करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते, जे अत्यंत अवैध होते. यामुळे भाविकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. हे सादरीकरण कधीही मंदिर उत्सवाचा भाग नव्हता. हे राज्यघटनेच्या मूलभूत रचनेचा भाग असलेल्या धर्मनिरपेक्षतेच्या तत्त्वाचे उल्लंघन आहे.