हिंदूंची मंदिरे सरकारच्या जोखडातून मुक्त करा ! – सुनील घनवट, महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक, हिंदु जनजागृती समिती

सातारा येथे महाराष्ट्र मंदिर न्यास जिल्हा अधिवेशन

डावीकडून सद्गुरु स्वाती खाडये, दीपप्रज्वलन करतांना पू. निळकंठ शिवाचार्य धारेश्वर महाराज, ह.भ.प. कृष्णराव क्षीरसागर महाराज, श्री. सुनील घनवट, श्री. दिलीप देशमुख

सातारा, २० मार्च (वार्ता.) – सातारा ही क्रांतीची भूमी आहे. आतापर्यंत प्रत्येक क्रांती सातारा जिल्ह्यातून झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी सातार्‍याजवळील पुणे येथील रायरेश्वर शिवमंदिरात शपथ घेऊनच हिंदवी स्वराज्य स्थापनेस प्रारंभ केला. त्यामुळे सातारा येथील मंदिर विश्वस्त, पुजारी, प्रतिनिधी यांनी संघटितपणे क्रांती घडवून आणली पाहिजे आणि हिदूंची मंदिरे सरकारी जोखडातून मुक्त केली पाहिजेत, असे आवाहन मंदिर महासंघाच्या वतीने सातारा येथे झालेल्या महाराष्ट्र मंदिर न्यास जिल्हा अधिवेशनामध्ये श्री. सुनील घनवट यांनी केले.

वेदभवन मंगल कार्यालय येथे २० मार्च या दिवशी पार पडलेल्या अधिवेशनाचा शुभारंभ सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये, धारेश्वर मठाचे मठपती पू. नीळकंठ शिवाचार्य धारेश्वर महाराज, निवृत्त साहाय्यक धर्मदाय आयुक्त श्री. दिलीप देशमुख, अधिवक्ता जनार्दन करपे, मंदिर महासंघाचे राष्ट्रीय संघटक, तसेच हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाला.

या अधिवेशनाला जिल्ह्यातून विविध मंदिरांच्या माध्यमातून ३०० हून अधिक विश्वस्त, प्रतिनिधी उपस्थित होते. त्यानंतर सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी दिलेल्या संदेशाचे वाचन सनातन संस्थेचे श्री. मंगेश निकम यांनी केले. उपस्थितांचे स्वागत आणि प्रस्तावना महाराष्ट्र मंदिर महासंघाचे सातारा जिल्हाध्यक्ष श्री. शिवाजीराव तुपे यांनी केली.

उपस्थित धर्माभिमानी

धर्म आणि संस्कृती जिवंत ठेवण्याचे कार्य मंदिरांमुळेच झाले आहे ! – सद्गुरु स्वाती खाडये, सनातन संस्था

मंदिर हा हिंदु संस्कृतीचा वारसा आहे. तो जतन करणे महत्त्वाचे आहे. धर्म, तसेच संस्कृती जिवंत ठेवण्याचे कार्य मंदिरांमुळेच झालेले आहे. हिंदु समाजाची जन्महिंदूपासून ते कर्महिंदूपर्यंत वाटचाल होण्यासाठी मंदिर अधिवेशन हे प्रभावी माध्यम आहे. मंदिर संस्कृतीचा देशाच्या विकासात मोठा वाटा आहे.

उपस्थितांना मार्गदर्शन करतांना निवृत्त सहधर्मादाय आयुक्त दिलीप देशमुख यांनी कायदेविषयक मार्गदर्शन करून शंकानिरसन केले. धर्मादाय आयुक्त कार्यालयातील प्रक्रियांचे अभ्यासक सातारा येथील अधिवक्ता जनार्दन करपे यांनी न्यास नोंदणी, तसेच मंदिरांना येणार्‍या कार्यालयीन अडचणींविषयी मार्गदर्शन केले. भुईज येथील श्री महालक्ष्मी मंदिराचे विश्वस्त श्री. गजानन भोसले यांनी मंदिरांचे सुव्यवस्थापन कसे करायचे ? याविषयी माहिती सांगितली.

मंदिरे हिंदूंची प्रेरणास्रोत आहेत ! – पू. नीळकंठ धारेश्वर महाराज, धारेश्वर मठाचे मठपती

राज्यघटनेचे मूळ हे मठ-मंदिरांमध्ये आहे. हा विचार करूनच घटनेची निर्मिती झाली; मात्र याकडे दुर्लक्ष करून मठ-मंदिरे सरकारने कह्यात घेतली आहेत. मंदिरे आर्थिक, सांस्कृतिक, नैतिक परंपरा जोपासतात. त्यामुळे ती हिंदूंची प्रेरणास्रोत आहेत.

मंदिरांच्या माध्यमातून हिंदु युवकांना धर्मशिक्षण देणे आवश्यक ! – ह.भ.प. कृष्णराव क्षीरसागर महाराज

मंदिर महासंघाच्या माध्यमातून मंदिरांचे संघटन उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे. मंदिरांच्या संरक्षणासाठी मंदिरांचे संघटन होणे आवश्यक आहे. मंदिरांच्या माध्यमातून हिंदु युवकांना संघटित करून धर्मशिक्षण देणे आवश्यक आहे.

संपादकीय भूमिका

हिंदूंनो, धर्म आणि संस्कृती जिवंत ठेवणार्‍या मंदिर संस्कृतीचा वारसा जपण्यासाठी संघटित व्हा !