औरंगजेब हा धर्मनिरपेक्ष नव्हे, तर धर्मांध आक्रमक होता ! – संजय राऊत, खासदार, शिवसेना

संजय राऊत

मुंबई – औरंगजेब हा धर्मांध आक्रमक होता. तो धर्मनिरपेक्ष (सेक्युलर) अजिबात नव्हता. बाबराने जे अयोध्येत केले, तेच औरंगजेब महाराष्ट्रात करत होता. औरंगजेबाचा सरळ संबंध छत्रपती संभाजीराजांच्या वधाशी जोडला गेला आहे. असा औरंगजेब कुणाला प्रिय असेल, तर त्यांना कोपरापासून साष्टांग दंडवत. हे वागणे ‘धर्मनिरपेक्ष’ नव्हे,’ अशी टीका शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी काँग्रेस पक्षावर केली आहे. शिवसेनेचे मुखपत्र दैनिक ‘सामना’तील लेखात राऊत यांनी नामांतराचे सूत्र पुन्हा उपस्थित केले आहे. ‘औरंगाबाद’चे ‘संभाजीनगर’ असे नामांतर करण्यासाठी शिवसेना आग्रही आहे; मात्र महाविकास आघाडीतील मित्रपक्ष काँग्रेसने नामांतरास कडाडून विरोध केला आहे.

संजय राऊत यांनी लेखात म्हटले आहे की,

१. अल्पसंख्याक ‘व्होटबँके’वर आणि स्वत:च्या ‘धर्मनिरपेक्ष’ प्रतिमेवर प्रश्‍नचिन्ह निर्माण होईल, यासाठी काँग्रेसने ‘औरंगाबाद’चे ‘संभाजीनगर’ होऊ नये, अशी भूमिका घेतली आहे.

२. काँग्रेसची भूमिका काहीही असली, तरी औरंगजेबाच्या कोणत्याही खुणा निदान महाराष्ट्रात ठेवू नयेत, या मताचा मोठा वर्ग आहे.

३. भारताची घटना ‘धर्मनिरपेक्ष’ आहे; पण म्हणून बाबर, औरंगजेब, शाहिस्तेखान, ओवैसी वगैरे लोकांना ‘धर्मनिरपेक्ष’ कसे मानावे ? औरंगजेबाने शीख आणि हिंदू यांचा छळ केला. त्यांच्या खुणा आपण का जतन कराव्यात ?

४. महाराष्ट्रातील सर्वच पुढार्‍यांनी औरंगजेबाचा रक्तरंजित इतिहास पुन्हा वाचायला हवा. निदान आपल्या बालपणातील इतिहासाची शालेय क्रमिक पुस्तके दृष्टीखालून घालायला हवीत.

५. औरंगजेबाला ‘इस्लाम’ धर्माधिष्ठित राज्यविस्तार करायचा होता. त्याची धर्मांधता म्हणजे आदर्श राज्यव्यवस्था होऊ शकत नाही. त्याने राज्यविस्तारासाठी निर्घृण मार्गाचाच अवलंब केला.

६. त्याने धर्माचेच राजकारण केले. बिगर मुसलमानांना मारण्यासाठी जिहाद पुकारणे, रक्तपात करणे ही गोष्ट इस्लामी धर्माच्याविरुद्ध नाही, असे मानणार्‍यांपैकी तो होता.

७. त्याच्या जीवनात कपट, धर्मांधता, अमानुषता ठासून भरली होती. त्याने छत्रपती शिवाजीराजांना शत्रू मानले; पण छत्रपती संभाजी महाराज यांना हाल हाल करून मारले. अशा औरंगजेबाच्या नावाने महाराष्ट्रात तरी एखादे शहर असू नये, हीच शिवभक्ती आहे.