साधनेमुळे भारतीय आणि पाश्चात्त्य संगीत यांचे आध्यात्मिक स्तरावर विश्लेषण करणे शक्य ! – कु. तेजल पात्रीकर, संगीत समन्वयक, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय

फोंडा, गोवा – संगीताची उत्पत्तीच मंदिरातून झाल्याने आपल्या संगीत कलेमध्येच अध्यात्म आहे. अनेक संतांनी संगीताचा आधार घेऊनच ईश्वरप्राप्तीकडे मार्गक्रमण केले आहे. भारतीय आणि पाश्चात्त्य गायन, वादन अन् नृत्य या कलांमध्ये आतापर्यंत महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाने ४०० हून अधिक विविध प्रयोग केले आहेत. विश्वविद्यालयाच्या माध्यमातून भारतीय कलांचा अभ्यास केवळ वैज्ञानिकदृष्ट्याच नाही, तर सूक्ष्म स्तरावरही करण्यात येतो. साधना करत असलेल्या व्यक्तीची स्वतःची सूक्ष्म जाणण्याची क्षमता साधनेमुळे वाढते आणि ती भारतीय अन् पाश्चात्त्य संगीत यांचे आध्यात्मिक स्तरावर विश्लेषण करू शकते, असे प्रतिपादन महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संगीत समन्वयक कु. तेजल पात्रीकर यांनी केले. ‘उर्वशी डान्स, म्युझिक आर्ट अँड कल्चरल सोसायटी’च्या वतीने ८ आणि १० जानेवारी २०२१ या दिवशी ‘सुर-ताल हुनर का कमाल’ हे आंतरराष्ट्रीय ‘ऑनलाईन’ चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. त्यामध्ये कु. तेजल पात्रीकर या ‘संगीत साधना आणि महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाने संगीतामध्ये आतापर्यंत केलेले विविध संशोधन कार्य’ अन् ‘कलांचा सूक्ष्म स्पंदनांच्या दृष्टीने करण्यात येत असलेला अभ्यास’ या विषयांवर बोलत होत्या. या चर्चासत्रात ‘भारतीय कला आणि संस्कृती’ या विषयावर कला क्षेत्रातील विविध मान्यवर अन् प्रसिद्ध व्यक्ती यांनी सहभाग घेतला होता. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पुणे येथील सौ. ममता सिंह यांनी केले.

या आंतरराष्ट्रीय ‘ऑनलाईन’ कार्यक्रमाच्या माध्यमातून भारतीय कला आणि संस्कृती यांच्या संवर्धनार्थ देश-विदेशातील कलाकारांचे भारतीय गायन अन् नृत्य यांच्या स्पर्धांचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून देश-विदेशातील कलाकार आणि गायन-नृत्य गुरु यांना जोडण्याचे कार्य ‘उर्वशी डान्स, म्युझिक आर्ट अँड कल्चरल सोसायटी’ करत आहे.

चर्चासत्रात सहभागी झालेले अन्य मान्यवर

१. श्री. संदीप मारवाह, निर्माते-निर्देशक, पत्रकार, व्यावसायिक आणि ‘नोएडा फिल्म सिटी’चे संस्थापक, देहली
२. ‘पद्मश्री’ सौ. शोभना नारायण, प्रसिद्ध भारतीय कथ्थक नृत्यांगना आणि माजी आय.ए.एस्. अधिकारी
३. डॉ. पी.एन्. मिश्रा, प्रोफेसर ऑफ मॅनेजमेंट हेड डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिक्स, अहिल्या विद्यापीठ, इंदूर (यज्ञ आणि मंत्र यांचे आध्यात्मिक अन् वैज्ञानिक दृष्टीने संशोधन करणारे संशोधक)
४. श्री. सुबोध राठोड, कथ्थक नर्तक, लंडन
५. राणी खानम, प्रसिद्ध कथ्थक नृत्यांगना, देहली
६. श्री. अश्विनी निगम, प्रसिद्ध कथ्थक नर्तक आणि प्रशिक्षक, मॉस्को, रशिया
७. प्रा. आनंद वर्धन, कला आणि मंदिरे यांचे विशेष अभ्यासक, देहली
८. प्राची दीक्षित, कथ्थक नृत्य कलाकार आणि प्रशिक्षक, अमेरिका
९. निशी सिंह, कथ्थक नृत्यांगना आणि प्रशिक्षक, दुबई

 

विशेष अभिप्राय

कु. तेजल पात्रीकर

१. दोन्ही दिवसांच्या चर्चासत्रांच्या वेळी उपस्थित मान्यवर आणि गुरुजन यांनी कु. तेजल पात्रीकर यांनी मांडलेल्या विषयांना चांगला प्रतिसाद दिला. या वेळी उपस्थितांनी ‘आम्हीही या कार्यात आमचे योगदान देऊ’, असे सांगितले.

२. ‘कु. तेजल पात्रीकर यांनी मांडलेल्या विषयांच्या माध्यमातून एक वेगळे संशोधन आणि संगीत क्षेत्रातील कार्याची दिशा देश-विदेशांतील गायन-नृत्य क्षेत्रांतील मान्यवर गुरुजन, तसेच श्रोतावर्ग यांच्यापर्यंत पोचले. सगळे तुमच्या विषयाने पुष्कळ प्रभावित झाले’, असे कौतुकोद्गार कार्यक्रमाच्या आयोजन समितीचे सदस्य अधिवक्ता उमेश शर्मा यांनी काढले.

२ दिवसांच्या चर्चासत्रामध्ये सहभागी झालेल्या मान्यवरांनी मांडलेली महत्त्वपूर्ण सूत्रे

८ जानेवारी २०२१

१. श्री. संदीप मारवाह यांनी भारतीय कला विदेशात पोचवण्याचा विशेष प्रयत्न केला आहे. या वेळी श्री. मारवाह यांनी आतापर्यंत केलेल्या आणि पुढे कला क्षेत्रात करत असलेल्या विविध कार्यांचा आढावा सर्वांना सांगितला.

२. श्री. सुबोध राठोड – भारतीय नृत्यात विविध रस उत्पत्ती करण्याची क्षमता आहे !

विदेशात समूह नृत्यावर अधिक भर असतो; परंतु भारतीय नृत्य असे आहे की, जे एकटे सादर करू शकतो. भारतीय नृत्यात विविध रसांची उत्पत्ती करण्याची क्षमता आहे की, जी युनिव्हर्सल (विश्वव्यापी) आहे आणि ती आपल्या नृत्यातून एकट्याला सादर करता येते. त्यामुळे विदेशी लोक भारतीय नृत्याकडे आकृष्ट होतात.

३. राणी खानम – नृत्याचे रूपच साधना आहे !

भारतीय नृत्य हे शरीर, मन आणि आत्मा यांच्याशी संबंधित आहे. हेच याचे वैशिष्ट्य आहे. नृत्याचे रूपच साधना आहे. पोलिओग्रस्त मुलांसाठी मी नृत्य-चिकित्सेचे (डान्स थेरपीचे) विविध संशोधनात्मक प्रयोग करत आहे. त्यामुळे मुलांमध्येही वेगळी चेतना दिसून येत आहे.

४. श्री. अश्विनी निगम – भारतीय संगीताला असलेली आध्यात्मिक बैठक, हीच त्याची उत्पत्ती !

भारतीय संगीताला असलेली आध्यात्मिक बैठक, हीच त्याची उत्पत्ती आहे. तसेच जेव्हा कोणत्या उत्क्रांतीचा विषय येतो किंवा मनुष्य स्वत:ला ओळखण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा भारतीय संगीत एक आदर्श म्हणून त्याच्यासमोर येते. त्यामुळेच भारतीय संगीत विश्वात प्रसिद्ध होत आहे.

५. प्रा. आनंद वर्धन – भारतीय मंदिर परंपरेत गायन आणि नृत्य एक अविभाज्य अंग !

तंजावूर (तमिळनाडू) येथील मंदिरांचे नृत्याच्या दृष्टीने वैशिष्ट्य सांगतांना श्री. आनंद वर्धन म्हणाले की, पूर्वीच्या काळी नृत्यकलांना पुढे नेण्याच्या दृष्टीने आपल्या मंदिरांमध्ये मोठ्या रंगमंचाची व्यवस्था केलेली आढळते. तंजावूर येथील मंदिरांमध्ये पूर्वी ४०० हून अधिक नर्तक आणि नृत्यांगना यांना नृत्य शिकण्याची सुविधा होती, असे इतिहासात आढळते. ‘चिदंबरम्’ या मंदिरातील द्वार आणि गोपूरम् येथे शिवाच्या मूर्ती नृत्यातील विविध १०८ मुद्रांमध्ये कोरलेल्या दिसतात. यावरूनच आपल्या लक्षात येते की, भारतीय मंदिर परंपरेत गायन आणि नृत्य हे एक अविभाज्य अंग आहे.

१० जानेवारी २०२१

१. पद्मश्री सौ. शोभना नारायण – संगीत आणि नृत्य या कला देवतांमुळेच व्यक्तीच्या अंतरात्म्यापर्यंत पोचतात !

हिंदु संस्कृतीची मूल्ये आपल्याला भारतीय कलांमध्ये विशेष करून संगीत-नृत्यामध्ये आढळतात. नृत्यामध्ये योगही अंतर्भूत आहे. ‘ज्याच्या जीवनात संस्कृती, कला आणि संगीत नाही, त्यांचे जीवन पशूसमानच आहे’, असे शास्त्रात म्हटले आहे. इतर कोणत्याच पंथातील देवतांना कलेशी संबंधित असे सांगितलेले नाही; पण हिंदु धर्मातील देवता कलेशी संबंधितच आहेत, हे आपल्या संस्कृतीचे वैशिष्ट्यच आहे, उदा. नृत्याशी संबंधित भगवान नटराज, सतार हातात घेतलेली श्री सरस्वतीदेवी. देवतांमुळेच या कला व्यक्तीच्या अंतरात्म्यापर्यंत पोचतात.

२. प्राची दीक्षित – हिंदु संस्कृतीमुळे विदेशातील लोकांना भारतीय कला आवडतात !

ज्या वेळी भारतीय कलाकार विदेशात येतात, त्या वेळी त्यांना आम्ही ईश्वरस्वरूप पहातो. भारतीय कलांमध्ये मुळातच दिव्यता आहे, जी अन्य कलांमध्ये नाही. आपल्या हिंदु संस्कृतीमुळे विदेशातील लोकांना भारतीय कला आवडतात. मी एक नृत्य शिक्षिका आहे. त्यामुळे लोक येथे (विदेशात) माझ्याकडे लहान मुलांना नृत्य शिकायला घेऊन येतात, त्या वेळी मी त्यांना केवळ नृत्य न शिकवता त्यांना भारतीय नृत्याचे जे मूळ आहे, त्या मूलतत्त्वाकडे घेऊन जाते. या कलांसह आम्ही मुलांना योगही शिकवतो.

३. निशी सिंह – गायन, वादन आणि नृत्य हे व्यक्तीच्या ‘रिलॅक्सेशन’साठी (करमणुकीसाठी) अत्यावश्यक आहे.

४. डॉ. पी.एन्. मिश्रा – मंत्र आणि ॐकार साधना यांच्यामध्ये दैवी सामर्थ्य पुष्कळ आहे, ते आधुनिक विज्ञानाच्याही पुढे आहे.

डॉ. पी.एन्. मिश्रा
  • डॉ. पी.एन्. मिश्रा यांनी मंत्र आणि ॐकार साधना याचे विविध प्रयोग मनुष्यांवर केले आहेत. डॉ. मिश्रा यांना स्वत:ला ४ थ्या टप्प्याचा कर्करोग झाला होता. याविषयी ते म्हणाले की, मी वैद्यकीय उपचारांसह भगवंतावर श्रद्धा ठेवून ॐकार साधना आणि मंत्रांचे विविध उपाय केल्यामुळे मी पूर्णपणे कर्करोगमुक्त झालो. “वाचा गेलेल्या एका डॉक्टरांकडून ॐ काराचे उच्चारण करवून घेतल्यावर त्यांची वाचा पुन्हा आली.”

  • या कार्यक्रमात सहभागी करून घेतल्याविषयी ‘उर्वशी डान्स, म्युझिक आर्ट अँड कल्चरल सोसायटी’च्या संस्थापिका डॉ. रेखा मेहरा आणि अधिवक्ता उमेश शर्मा यांचे महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाने आभार मानले आहेत.
• सूक्ष्म-जगत् : जे स्थूल पंचज्ञानेंद्रियांना (नाक, जीभ, डोळे, त्वचा आणि कान यांना) कळत नाही; परंतु ज्याच्या अस्तित्वाचे ज्ञान साधना करणार्‍याला होते, त्याला ‘सूक्ष्म-जगत्’ असे संबोधतात.
• सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
• सूक्ष्म-परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला ‘सूक्ष्म-परीक्षण’ म्हणतात.
• सूक्ष्म-ज्ञानाविषयीचा प्रयोग : काही साधक सूक्ष्मातील कळण्याच्या क्षमतेचा अभ्यास म्हणून ‘एखाद्या वस्तूविषयी मन आणि बुद्धी यांच्या पलीकडे काय जाणवते’,  याची चाचणी करतात. याला ‘सूक्ष्म-ज्ञानाविषयीचा प्रयोग’ म्हणतात.