देहली-गोवा गोमांसाच्या तस्करीचे जाळे उघडकीस !

‘चिकन’च्या नावाने गोव्यात गोमांसाची तस्करी

पणजी, १५ मार्च (वार्ता.) – मडगाव रेल्वेस्थानकावर काही दिवसांपूर्वी ‘चिकन’ असे लिहिलेल्या गोणीत (पार्सलमध्ये) कुजलेले गोमांस आढळल्याने देहली ते गोवा या मार्गावर गेल्या अनेक वर्षांपासून चालू असलेल्या गोमांसाच्या तस्करीचे जाळे उघडकीस आले आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे ही तस्करी केली जात होती, अशी माहिती पोलिसांना अन्वेषणातून प्राप्त झाली आहे.

कोकण रेल्वेचे पोलीस निरीक्षक सुनील गुडलर यांनी काही दिवसांपूर्वी सुमारे दीड लाख रुपये किमतीचे ५१४ किलो गोमांस मडगाव रेल्वेस्थानकावर पकडले होते. या प्रकरणी मूळचा कर्नाटक येथील आणि आता दवर्ली, मडगाव येथे रहाणारा फय्याज अहमद केंगनावार याला कह्यात घेण्यात आले. देहली येथील हजरत निझामुद्दीन रेल्वेस्थानकावरून ‘चिकन’ असे लिहिलेल्या पार्सलमधून हे गोमांस गोव्यात वितरित करण्यासाठी आणले होते.

या प्रकरणाचे अन्वेषण करणारे पोलीस अधिकारी म्हणाले, ‘‘मडगाव रेल्वेस्थानकावर गोमांस पकडण्याची ही एकमेव घटना नाही, तर रेल्वे पार्सल योजनेतील त्रुटींचा अपलाभ उठवत असे प्रकार नियमितपणे चालू होते, अशी माहिती अन्वेषणातून मिळाली आहे. रेल्वेतून येणारी पार्सले तपासण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडे अत्याधुनिक यंत्रणा नसल्याची माहिती तस्करांना होती. पार्सलमध्ये ‘चिकन’ असल्याचे सांगून कागदपत्रे करण्यात आली; मात्र आतमधून गोमांस पाठवण्यात आले. पार्सलमधून दुर्गंधी येऊ लागल्याने हा प्रकार उघडकीस आला, अन्यथा याचा थांगपत्ता लागला नसता. गोमांसाची तस्करी देहली-गोवा मार्गावरच नव्हे, तर देशातील इतर मार्गांवरूनही होत असण्याची शक्यता आहे. संशयिताकडून मिळत असलेली माहिती आणि कागदपत्रे यांचा मागोवा घेतला असता गोमांसाच्या तस्करीसंबंधी अनेक गोपनीय माहिती मिळू लागली आहे.’’ हल्ली गोव्यात अनधिकृत पशूवधगृहांवर कारवाई होऊ लागल्याने गोमांसाची आयात वाढू लागली आहे.