महत्त्वाची कागदपत्रे आणि फर्निचरही जळले !

अमरावती – चांदूर रेल्वे येथील सेंट्रल बँकेच्या इमारतीला १५ मार्चला दुपारी आग लागली. आगीमुळे बँकेतील लाखो रुपयांच्या नोटा आणि फर्निचर भस्मसात झाले आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न करण्यात येत आहेत. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज आहे. सुदैवाने आगीत जीवितहानी झालेली नाही.
नियमित कामकाज चालू असतांना हा प्रकार घडला. अचानक धूर आल्याने सर्वांची धावपळ झाली. ग्राहक आणि बँकेतील कर्मचारी लगेच बाहेर पडले. आगीने काही क्षणांतच रौद्र रूप धारण केले. चांदूर रेल्वे नगर परिषदेच्या अग्निशमन दलाला आग आटोक्यात येत नव्हती. त्यामुळे तिवसा आणि धामणगाव रेल्वे येथून अग्निशमन दल बोलावण्यात आले.
आगीत जीवितहानी झालेली नसली, तरी बँकेतील रोख रक्कम ठेवण्यात येणार्या ठिकाणाहून रोकड, महत्त्वाची कागदपत्रे आणि फर्निचर जळून खाक झाले.