गायरान भूमी वाचवण्यासाठी कराड ते सातारा पदयात्रा !

सातारा, १५ मार्च (वार्ता.) – शासनाने राज्यातील सहस्रो एकर गायरान भूमी महावितरणच्या व्यवस्थापनाला अल्प भाड्याने दिली आहे. ‘महावितरण’ने पुन्हा ही भूमी खासगी ठेकेदाराला भाडेपट्ट्याने दिली. याला अनेक गावांचा विरोध असतांनाही गायरान भूमी दिली आहे. या प्रकल्पात आर्थिक घोटाळे झाले असण्याची शक्यता आहे. या संपूर्ण प्रकल्पाची निवृत्ती न्यायमूर्तींच्या वतीने चौकशी करावी, तसेच हा प्रकल्प रहित करावा, ग्रामपंचायतींना गायरान भूमी परत कराव्यात, या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी कराड ते सातारा अशी पदयात्रा चालू केली आहे. या पदयात्रेमध्ये गोरेगाव वांगी, राजाचे कुरले, शिरसगाव, कुमठे, भाकरवाडी, शेणोली आदी गावांतील नागरिक सहभागी झाले आहेत. या प्रकरणी शासनाने गांभीर्याने लक्ष न घातल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल, अशी चेतावणी दिली आहे.