संभाजी ब्रिगेडचे नाव पालटण्यासाठी ‘शिवधर्म फाउंडेशन’चे संपूर्ण महाराष्ट्रात १८ मार्चपासून आंदोलन !

संभाजी ब्रिगेड संघटनेचे नाव ‘संभाजी’ या एकेरी शब्दाने प्रसिद्ध होत असल्याने महाराजांचा अवमान !

खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांचा जाहीर पाठिंबा !

अहिल्यानगर – संभाजी ब्रिगेड ही संघटना आणि पक्ष सातत्याने छत्रपती संभाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख करत असून, हा प्रकार महाराष्ट्रातील कोट्यवधी शिवभक्त आणि छत्रपती संभाजी महाराजांवर निस्सीम श्रद्धा असलेल्या जनतेच्या भावनांना गंभीर धक्का पोचवणारा आहे. त्यामुळे संभाजी ब्रिगेड संघटना आणि संभाजी ब्रिगेड पक्ष यांनी ‘संभाजी ब्रिगेड’, हे नाव पालटावे. जर त्यांनी नाव पालटण्यास नकार दिला, तर या संघटना आणि पक्ष यांची नोंदणी तात्काळ रहित करण्यात यावी. छत्रपती संभाजी महाराज यांचा सन्मान कायम राखण्यासाठी महाराष्ट्र शासनाने कठोर भूमिका घ्यावी आणि तातडीने योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी ‘शिवधर्म फाउंडेशन’चे संस्थापक अध्यक्ष दीपक काटे यांनी केली आहे. संभाजी ब्रिगेडच्या नावाविषयी शिवधर्म फाउंडेशन संपूर्ण महाराष्ट्रात १८ मार्चपासून आंदोलन चालू करणार असून अहिल्यानगर येथे २८ मार्चला मोर्चा काढणार आहे, असे दीपक काटे यांनी सांगितले. या आंदोलनाला खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे.

दीपक काटे म्हणाले की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा पराक्रम, त्याग आणि धर्मरक्षणासाठी दिलेले बलीदान यांची कीर्ती संपूर्ण जगभर प्रसिद्ध आहे. हिंदु धर्माच्या रक्षणार्थ दिलेल्या अतुलनीय योगदानामुळेच संपूर्ण रयतेने त्यांना ‘धर्मवीर’ ही उपाधी दिली; परंतु संभाजी ब्रिगेड संघटनेचे नाव ‘संभाजी’ या एकेरी शब्दाने प्रसिद्ध होत असल्याने महाराष्ट्रातील लाखो नागरिक अज्ञानात किंवा नकळत छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान करत आहेत. यामुळे संपूर्ण महाराष्ट्राची ऐतिहासिक आणि सांस्कृतिक अस्मिता धोक्यात येत आहे.

१८ मार्च ते ११ एप्रिलपर्यंत महाराष्ट्रात होणारी आंदोलने !

या मागणीसाठी पुणे येथे १८ मार्च, सातारा २० मार्च, कोल्हापूर २१ मार्च, सांगली २९ मार्च, सोलापूर २५ मार्च, अहिल्यानगर २८ मार्च, जालना २९ मार्च, छत्रपती संभाजीनगर ७ एप्रिल, नाशिक ९ एप्रिल, ठाणे, रायगड येथे ११ एप्रिल या दिवशी आंदोलन केले जाणार आहे.