
पुणे – सर्वोच्च न्यायालयाने धार्मिक स्थळांवर लावलेल्या भोंग्याचे आवाज मर्यादित ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या भोंग्यामुळे ध्वनीप्रदूषण होत असल्याचे निदर्शनास आले. या आदेशाची कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधीमंडळात दिली. यानंतर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी शहरातील सर्व पोलीस ठाण्याच्या प्रमुखांची बैठक घेतली. याविषयीची माहिती संकलित करून अवैध भोंग्यांवर कारवाईचे आदेश त्यांनी दिले.
पुणे शहरात १ सहस्र ८३० भोंगे असल्याची माहिती पोलिसांकडे आहे. १ सहस्र मंदिरे, १३० चर्च, २०० बौद्ध विहार, ३०० मशिदी, १५० दर्गा, ५० मदरसे यांवर भोंगे आहेत. दिवसा भोंग्यांच्या आवाजाची पातळी ५५ डेसिबल, तर सायंकाळी ४५ डेसिबल असावी, असे ठरले आहे. रात्री १० ते सकाळी ६ या वेळेत भोंगे बंद ठेवण्यात यावेत. या मर्यादेचे उल्लंघन झाल्यास कारवाई होईल.
संपादकीय भूमिका :शहरातील आवाजाच्या पातळीच्या मर्यादेचे उल्लंघन झालेल्या भोंग्यांवर पोलीस स्वत:हून कारवाई का करत नाहीत ? प्रत्येक वेळी पोलिसांना हे न्यायालयाला का सांगावे लागते ? या कारवाईत जाणारा वेळ, पैसा, लागणारे मनुष्यबळ यांसाठी पोलीसच उत्तरदायी आहेत ! |