|
इस्लामाबाद (पाकिस्तान) – जाफर एक्सप्रेस रेल्वे अपहरण प्रकरणात पाकिस्तानी सैन्याने पत्रकार परिषद घेऊन सांगितले की, अपहरणात ३१ लोकांचा मृत्यू झाला होता, त्यांपैकी १८ सैनिक होते. यावर ‘बलुच लिबरेशन आर्मी’च्या स्वातंत्र्यसैनिकांनी पाक सैन्याची माहिती फेटाळत दावा केला की, त्यांनी सर्व २१४ ओलिसांना ठार मारले आहे. त्यांपैकी बहुतेक पाकिस्तानी सैनिक आहेत.
बलुच लिबरेशन आर्मीच्या स्वातंत्र्यसैनिकांनी पुढे सांगितले की,
१. आम्ही युद्ध बंदीवानांच्या देवाणघेवाणीसाठी पाकिस्तानी सैन्याला ४८ घंट्यांची मुदत दिली होती. ही त्यांची जीव वाचवण्याची शेवटची संधी होती; पण नेहमीप्रमाणे त्यांनी अहंकार दाखवला आणि ते स्वतःच्या निर्णयावर ठाम राहिले. कोणतीही चर्चा झाली नाही आणि वास्तव ठाऊक असूनही त्यांनी डोळेझाक केली. पाकिस्तानी सैन्य आणि सरकार यांच्या या हट्टीपणामुळे आम्ही सर्व २१४ ओलिसांना ठार मारले आहे.
२. आम्ही नेहमीच युद्धाच्या तत्त्वांनुसार आणि आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार काम करत आलो आहोत; परंतु पाकिस्तान सरकारने त्यांच्या सैनिकांचे प्राण वाचवण्याऐवजी त्यांना युद्धात बलीदान देणे योग्य मानले. शत्रूला या जिद्दीची किंमत २१४ सैनिकांच्या मृत्यूच्या रूपात मोजावी लागली.
३. पाकिस्तानी सैन्याशी झालेल्या संघर्षात आमचे १२ सैनिक मृत्यूमुखी पडले होते, ज्यांना आम्ही श्रद्धांजली वाहिली. या लोकांनी शत्रूविरुद्ध अविस्मरणीय बलीदान दिले. यात आमच्या माजीद ब्रिगेडच्या ५ आत्मघाती सैनिकांनीही प्राणांची आहुती दिली आणि शत्रूला योग्य उत्तर दिले, जे इतिहास नेहमीच लक्षात ठेवेल.