
मुंबई – पानीपतच्या युद्धात मराठा युद्धवीरांनी दाखवलेल्या शौर्याचा इतिहास साकारला जाणार आहे. तेथील ‘कालाअंब’ परिसरात मराठा शौर्य स्मारक उभारले जाईल, अशी माहिती राजशिष्टाचारमंत्री जयकुमार रावल यांनी प्रसिद्धीमाध्यमांना दिली.
या संदर्भातील शासन निर्णय वाचण्याकरीता येथे क्लिक करा
जयकुमार रावल म्हणाले, ‘‘या स्मारकाच्या भूमी अधिग्रहणाची प्रकिया लवकरच चालू होईल. त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य पुतळाही उभारला जाणार आहे. मराठा शौर्याचे प्रतीक असणारे संग्रहालय, दृकश्राव्य कार्यक्रम आणि आवश्यक त्या सुविधा तेथे निर्माण केल्या जातील. यासाठी हरियाणा राज्य शासनाशी मी स्वत: समन्वय करत आहे. १७ आणि १८ व्या शतकात मराठा साम्राज्याचा विस्तार अफगाणिस्तानापर्यंत झाला होता. मराठा वीरांच्या अतुलनीय पराक्रमामुळे अटकपासून कटकपर्यंत हिंदवी स्वराज्याचा झेंडा रोवला गेला. वर्ष १७६१ अहमदशाह अब्दाली विरुद्ध झालेल्या पानिपत रणसंग्रामामध्ये मराठा वीरांनी झुंज दिली. या लढाईत मराठा साम्राज्याची अपरिमित हानी झाली; मात्र इतिहासामध्ये ही लढाई त्याग, बलीदान, राष्ट्रप्रेम, लढाऊ वृत्ती, राष्ट्रासाठी संपूर्ण समर्पण यादृष्टीने संस्मरणीय आहे. युद्धातील मराठा वीरांच्या बलीदानाला नमन करण्याच्या उद्देशाने मराठा शौर्य स्मारक होत आहे.’’