विश्व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांची मागणी

पुणे, १५ मार्च (वार्ता.) – छत्रपती संभाजीनगरमधील औरंगजेबाची कबर महाराष्ट्र शासनाने लवकरात लवकर काढावी. याकरता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकाच दिवशी म्हणजे १७ मार्च या दिवशी सर्व तहसीलदार आणि जिल्हाधिकारी यांना सकाळी ११ वाजता निवेदन देणार आहोत, अशी माहिती ‘बजरंग दला’चे प्रांत संयोजक नितीन महाजन यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली, तसेच आम्ही सरकारला काही समयमर्यादा देऊ. त्या वेळेत सरकारने कबर काढली नाही, तर जसे कारसेवा करून बाबरी मशीद पाडली, तशी कारसेवा करून औरंगजेबाची कबर काढून टाकू, अशी चेतावणी नितीन महाजन यांनी दिली. या वेळी विश्व हिंदु परिषदेचे प्रांतमंत्री किशोर चव्हाण, प्रचार प्रमुख श्रीपाद रामदासी, प्रांत संयोजन संदेश भेगडे उपस्थित होते.
किशोर चव्हाण म्हणाले, ‘‘औरंगजेबाची कबर आमच्या गुलामगिरी, लाचारी आणि अत्याचार यांची आठवण करून देते. सख्ख्या भावाची हत्या करणारा, काशी विश्वनाथ, मथुरा, सोमनाथ मंदिरे फोडणार्या आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा ४० दिवस छळ करणार्या औरंगजेबाची कबर सरकारने स्वत:हून काढून टाकावी.’’
नियोजनबद्ध कार्यक्रम निश्चित !
प्रथम आम्ही सरकारला निवेदन देणार आहोत. त्यानंतर रस्त्यावर येऊन आंदोलन करू, आवश्यकता भासल्यास जक्काजाम आंदोलन करणार. या मोहिमेचा कालबद्ध कार्यक्रम आखला आहे.