
विरार – येथील एक शिक्षिका इयत्ता १२ वीच्या वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका पडताळणीसाठी घरी घेऊन आली होती. त्याच रात्री घरात शॉर्टसर्किट झाल्याने आग लागली. यात घरातील इतर सामानासह या उत्तरपत्रिकाही जळून खाक झाल्या आहेत. या उत्तरपत्रिका तिने सुखासनावर ठेवल्या होत्या. या प्रकरणी संतप्त पालकांनी ‘उत्तरपत्रिका घरी आणता येतात का ?’, असा प्रश्न उपस्थित केला आहे. या घटनेत निष्काळजीपणा करणार्यांवर गुन्हा नोंदवण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. अग्नीशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी जाऊन आगीवर नियंत्रण मिळवले. यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही.