सध्या राज ठाकरे यांच्या महाकुंभमेळ्यासंदर्भातील एका विधानामुळे सगळीकडे चर्चा चालू आहे. ते विधान हे जरी त्यांचे वैयक्तिक मत असले, तरीही आपल्या हिंदु समाजाला पुरोगामी भूमिका मांडायची हौस कायमच असते. कुठलाही सण आला किंवा कुणी काही बोलले, तरीही त्यात पुरोगामीपणा शोधला जातो. ही भूमिका बहुतेक वेळा हिंदु श्रद्धांच्या विरोधात असते; पण पुरोगामी भूमिका म्हणून तिचे महत्त्व वाढवले जाते.
१. हिंदु सणांना पुरोगामी पद्धतीने साजरा करण्यास दिले जाणारे प्रोत्साहन
अगदी आताच पाहिले, तर सध्या होळीचा सण चालू आहे, मग होळीसाठी पाणी वापरावे कि नाही ! त्यात मुसलमान समाजाची ईदही आहे, अशा वेळेला बाहेर रंग खेळावे का? कुणाच्या भावना दुखावतील का ? असे अनेक विचार समाजमाध्यमांवर मांडले जात आहेत. खरेतर अशा प्रकारचे विचार प्रत्येक सणाच्या वेळेला मांडले जातात. दिवाळीच्या वेळी ध्वनीप्रदूषण, गणपति असले की, जलप्रदूषण; नवरात्र असली की, स्त्रियांवर होणारे अत्याचार, वटपौर्णिमेच्या वेळी झाडे लावण्याचा विचार, महाशिवरात्र असली की, दूध शंकरावर वहाण्याऐवजी गरिबांमध्ये वाटावे, असे अनेक पुरोगामी विचार मांडले जातात. त्या सणाचा मूळ उद्देश बाजूला ठेवून त्याला पुरोगामी पद्धतीने साजरा करायला प्रोत्साहन दिले जाते. हे विचार कुणी अन्य धर्मीय नाही, तर हिंदूच मांडत असतात.

२. पाश्चात्त्य विकृतीचा परिणाम
पुरोगामी विचार मांडून स्वतःला आधुनिक दाखवण्याची हौस हिंदु धर्मातील लोकांइतकी कुणालाही नाही. हा पुरोगामी बहुतेक वेळेला पाश्चात्त्य विचारांचा असतो. आपले सण साजरे करण्याची पद्धत, आपली जीवनशैली ही वेगळी आहे; कारण आपली संस्कृती, हवामान हे सगळे वेगळे आहे; पण हे समजून न घेता युरोप किंवा अमेरिकेत ज्या पद्धतीने सण साजरे करतात किंवा ते जसे रहातात जसे िवचार करतात, तसेच विचार आपणपण केले पाहिजेत, असेच बर्याच जणांना वाटत असते.
३. छत्रपती शिवाजी महाराज यांना ‘सर्वधर्मसमभावी’ म्हणणे चुकीचेच !
अनेकदा हे पुरोगामी विचार सर्वधर्मसमभावीसुद्धा असतात. अनेक महापुरुषांना सर्वधर्मसमभी दाखवले जाते. या विचाराला विरोध अजिबात नाही; पण जे नाही ते दाखवण्याचा अट्टहास कशासाठी करायचा ? ‘छत्रपती शिवाजी महाराज सर्वधर्मसमभावी होते’, हा विचार तर अनेकदा मांडला जातो; पण ते तसे खरेच होते का ? हे कुणीच शोधून काढत नाही. महाराजांचे गुरु समर्थ रामदासस्वामी असतांना उगीचच याकूबबाबा त्यांचे गुरु होते असे दाखवले जाते. महाराजांच्या सैन्यात ५७ टक्के मुसलमान असल्याचे खोटे दाखले दिले जातात. महाराज कायमच ‘हिंदवी’ स्वराज्य म्हणजे हिंदूंचेच राज्य स्थापन करण्याच्या विचारांचे होते.
छत्रपती संभाजी महाराज तर त्यांच्या एका पत्रात आपल्या पूर्वजांना ‘म्लेंच्छक्षयदीक्षित’, म्हणजे म्लेंच्छ समाजाचा नाश करण्याची दीक्षा घेतलेले असा उल्लेख करतात. तसेच ते आपल्या पूर्वजांचा उल्लेख हिंदु धर्मउद्धारक असाही करतात. शंभूराजांच्या संदर्भातही त्यांची हत्या मनुस्मृतीप्रमाणे झाली असा उल्लेख सातत्त्याने केला जातो. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे ही सगळी विधाने करणारे हिंदूच असतात.
४. सण आत्मीयतेने साजरे करणे हाच वैज्ञानिक विचार !
प्रत्येक ठिकाणी आधुनिक विचार मांडण्याची ही वृत्ती न्यून करण्याची आवश्यकता आहे. आपल्या गणपति अथर्वशीर्षामधे पण ‘त्वञ् ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि ॥’ असे म्हटलेले आहेच. पुरोगामी विचार म्हणजे फक्त पाश्चात्त्य विचार किंवा आपल्या धर्माशी फटकून वागण्याचे विचार असे नाही. तर एखादा सण का साजरा करायचा ? याच्यामागचे कारण समजून घेऊन अधिक आत्मीयतेने तो साजरा करणे म्हणजे खरा वैज्ञानिक विचार म्हणता येईल. तो सणच नाकारणे किंवा वेगळ्याच पद्धतीने तो साजरा करणे म्हणजे वैज्ञानिक विचार नव्हे.
चुकीच्या पद्धतीने वागून किंवा चुकीचे विचार करून जर आपण आपले सण साजरे करायला लागलो, तर आपली संस्कृती धोक्यात येऊन ती संपून जायला वेळ लागणार नाही; म्हणून आपण चुकीच्या पद्धतीने आधुनिक किंवा पुरो(अधो)गामी न बनता खरी परिस्थिती समजून घेऊन त्या प्रमाणे कृती करूया आणि खर्या अर्थाने आधुनिक बनवूया.
– कु. अन्नदा विनायक मराठे, दापोली, जिल्हा रत्नागिरी. (१३.३.२०२५)