श्री महालक्ष्मी मंदिरातील दुकानदारांकडून देवस्थान समिती कोषाध्यक्षा वैशाली क्षीरसागर यांचा सत्कार

देवस्थान समिती कोषाध्यक्षा वैशाली क्षीरसागर यांचा सत्कार करतांना परिसरातील दुकानदार

कोल्हापूर – कोरोनाच्या संकटकाळात श्री महालक्ष्मी मंदिर आणि परिसरातील दुकाने ८ मास बंद होती. नोव्हेंबर मासात मंदिर खुले केले; मात्र आवारातील दुकाने बंदच होती. ही दुकाने खुली करण्यासाठी संबंधित दुकानदारांनी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री. राजेश क्षीरसागर आणि देवस्थान समितीच्या कोषाध्यक्षा सौ. वैशाली क्षीरसागर यांच्याकडे मागणी केली होती. यानुसार सौ. वैशाली क्षीरसागर यांच्या पाठपुराव्यामुळे १ जानेवारीपासून ही दुकाने खुली करण्यास अनुमती देण्यात आली. त्यामुळे मंदिराच्या आवारातील दुकानदारांच्या शिष्टमंडळाने २ जानेवारी या दिवशी देवस्थान समितीच्या कोषाध्यक्षा सौ. वैशाली क्षीरसागर यांची भेट घेऊन त्यांचा पुष्पगुच्छ, शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार केला.

या वेळी दुकानदारांनी श्री. राजेश क्षीरसागर आणि सौ. वैशाली क्षीरसागर यांचे समस्त दुकानदारांच्या वतीने आभार मानत पुढील काळात अशाच काही समस्या असल्यास सहकार्य करण्याची अपेक्षा व्यक्त केली. या वेळी युवासेना शहरप्रमुख श्री. पियुष चव्हाण, ‘संजय गांधी निराधार योजने’चे अध्यक्ष श्री. किशोर घाटगे यांसह सर्वश्री वैभव मेवेकरी, विश्वनाथ मेवेकरी, साजन सलुजा, संतोष काटवे उपस्थित होते.