ठोकून काढण्याची भाषा करणार्‍यांना वेळप्रसंगी त्याच भाषेत उत्तर देण्याची आमची क्षमता !

सकल हिंदु समाजाची पत्रकार परिषदेद्वारे चेतावणी

पत्रकार परिषदेत बोलतांना श्री. उमेश नरके आणि मान्यवर

छत्रपतींच्या सन्मानाचे पुरोगाम्यांना वावडे का ?

कोल्हापूर – शिवाजी विद्यापिठाचा नामविस्तार ‘छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ’ असा होण्यासाठी १७ मार्चला होणार्‍या मोर्चात केवळ हिंदुत्वनिष्ठ संघटना नाही, तर समाजातील प्रत्येक स्तरातील घटक सहभागी होत आहेत. मोर्चाच्या मागणीसाठी आम्ही जमलेले याच कोल्हापुरातील आहोत, याच मातीतील आहोत. नामविस्ताराला विरोध करणार्‍यांना छत्रपतींच्या सन्मानाचे वावडे आहे का ? जर कुणी ठोकून काढण्याची भाषा करत असेल, तर वेळप्रसंगी त्याच भाषेत उत्तर देण्याची आमची क्षमता आहे, अशी चेतावणी सकल हिंदु समाजाच्या वतीने घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली. ही पत्रकार परिषद १५ मार्चला पार पडली.

या पत्रकार परिषदेस ‘छत्रपती ग्रुप’चे संस्थापक श्री. प्रमोददादा पाटील, ‘श्री’ संप्रदायाचे करवीर तालुकाप्रमुख श्री. उमेश नरके, हिंदु महासभेचे श्री. मनोहर सोरप, महाराष्ट्र मंदिर महासंघाचे कोल्हापूर जिल्हा सहसंयोजक श्री. अभिजित पाटील, हिंदु राष्ट्र समन्वय समितीचे श्री. आनंदराव पवळ, हिंदु एकता आंदोलनाचे शहराध्यक्ष श्री. गजानन तोडकर, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख श्री. किशोर घाटगे आणि श्री. उदय भोसले, श्री. विकास जाधव, श्री. अर्जुन आंबी, धर्मप्रेमी श्री. रामभाऊ मेथे, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख श्री. संभाजीराव भोकरे उपस्थित होते.

या प्रसंगी श्री. गजानन तोडकर म्हणाले, ‘‘नामविस्तार होणार, हे लक्षात आल्यामुळे काही लोकांच्या पोटत दुखत आहे. काल ज्या नेत्यांनी ठोकून काढण्याची भाषा वापरली त्यांनी हे लक्षात ठेवावे की, आम्हीही १२ महिने विविध आंदोलनांच्या निमित्ताने रस्त्यावर उतरून आंदोलन करतो.’’ ‘छत्रपती ग्रुप’चे संस्थापक श्री. प्रमोददादा पाटील म्हणाले, ‘‘जे कुणी म्हणत आहे की, कोल्हापुरातील स्वाभिमानी जनता खपवून घेणार नाही, त्यांनी लक्षात ठेवावे की, हिंदु समाज हा पूर्ण देशात आहे आणि त्यांचा स्वाभिमान हा छत्रपतींच्या पूर्ण आदराने घेतलेल्या नावातच आहे. या स्वाभिमानासाठी आम्ही सर्वजण मोर्चाच्या निमित्ताने एकत्र आलेलो आहोत. तुम्हाला जर प्रत्युत्तर द्यायचे असेल, तर ते लोकशाही मार्गाने द्या. ठोकून काढण्याची भाषा कशासाठी ? प्रसिद्धीसाठी चाललेला हा प्रयत्न आहे. एखादी गोष्ट जर चांगल्या उद्देशाने पालटली जात असेल, तर विरोध का ? छत्रपती शिवाजी महाराज ही भारताची अस्मिता आहे. असे असतांना ‘छत्रपती’ या नावाला विरोध का ? याचा अर्थ विरोध करणारे ‘छत्रपती’ ही पदवी मानत नाहीत का ? सध्या आम्ही ज्या भेटीगाठी घेत आहोत, त्यातील एकानेही आम्हाला हे चुकीचे असल्याचे सांगितले नाही.’’