Punjab Shiv Sena Leader Murdered : मोगा (पंजाब) येथे शिवसेनेच्या जिल्हाध्यक्षाची गोळ्या झाडून हत्या

  • ११ वर्षांच्या मुलालाही लागल्या गोळ्या

  • आतंकवादी घटना नसल्याचा पोलिसांचा दावा

शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष मंगत राय मंगा

मोगा (पंजाब) – येथे अज्ञात आक्रमणकर्त्यांनी १३ मार्चच्या रात्री शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष मंगत राय मंगा यांची गोळ्या झाडून हत्या केली. या गोळीबारात एक ११  वर्षांचा मुलगाही घायाळ झाला. मंगत राय रात्री १० वाजता गिल पॅलेसजवळील एका डेअरीमध्ये दूध खरेदी करत होते. त्याच वेळी दुचाकीवरून आलेल्या ३ जणांनी त्यांच्यावर गोळीबार केला. गोळीबार होत असल्याचे पाहून मंगत राय हे त्यांच्या दुचाकीवरून तेथून पळून जाऊ लागल्यावर आक्रमणकर्त्यांनी त्यांचा पाठलाग केला. यात एक गोळी त्यांना लागली आणि ते दुचाकीवरून खाली पडले.  यानंतर गोळीबार करणारे तेथून पळून गेले. मंगत राय यांना जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. घायाळ झालेल्या त्यांच्या मुलावर रुग्णालयात उपचार चालू आहेत.

मोगा पोलिसांच्या म्हणण्यानुसार मंगा यांचे अलीकडेच स्थानिक प्रतिस्पर्ध्यांच्या एका गटाशी भांडण झाले होते. ही घटना त्याचाच परिणाम असू शकते. मोगाचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक अजय गांधी यांनी ही हत्या आतंकवादी आक्रमण असल्याचे नाकारले आहे.

केशकर्तनालयाच्या मालकावर गोळीबार  

दुसर्‍या एका घटनेत रात्री ९ वाजण्याच्या सुमारास मोगाच्या बागियाना बस्ती येथील एका केशकर्तनालयात केस कापण्यासाठी ३ जण आले. त्यांनी दुकानाचे मालक देवेंद्र कुमार यांच्यावर २ गोळ्या झाडल्या. यानंतर ते पळून गेले. देवेंद्र यांच्या पायाला गोळी लागली आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार चालू आहेत.

संपादकीय भूमिका

पंजाबमध्ये गेल्या काही वर्षांपासून हिंदु नेत्यांना लक्ष्य करून ठार मारले जात आहे. पंजाबमध्ये खलिस्तानी आतंकवाद पुन्हा डोके वर काढत आहे. याकडे राज्य आणि केंद्र सरकार यांनी गांभीर्याने पहाणे आवश्यक आहे !