पाश्चात्त्य विकृतीच्या विरोधात लढणाऱ्यांचा देशाप्रतीचा त्याग आठवून भारतीय संस्कृती जोपासा ! – सुमित सागवेकर, युवा संघटक, हिंदु जनजागृती समिती

पाश्चात्त्य विकृतीच्या विरोधात लढणारे थोर राष्ट्रपुरुष, क्रांतीकारक यांचा देशाप्रतीचा त्याग आठवून भारतीय संस्कृती जोपासा ! – सुमित सागवेकर, युवा संघटक, हिंदु जनजागृती समिती

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘३१ डिसेंबर या पाश्चात्त्य विकृतीला भारतभूमीतून हद्दपार करणे’ या विषयावर ‘ऑनलाईन’ प्रशिक्षणवर्गातील धर्मप्रेमींचे प्रबोधन

सुमित सागवेकर

पुणे, २ जानेवारी (वार्ता.) – आपल्याला कोणी १ जानेवारीला नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या, तर आपण ‘सेम टू यू’, असे म्हणतो. अशा वेळी आपल्या थोर राष्ट्रपुरुषांचे स्मरण व्हायला हवे. छत्रपती संभाजी महाराजांनी असह्य शारीरिक छळ सहन करूनही हिंदु धर्म सोडला नाही. शेवटी त्यांना पाणी पाजण्यासाठीही मुख उरले नाही, त्यांना नळीने पाणी पाजण्यात येत होते. लोकमान्य टिळक, चापेकर बंधू यांसारख्या क्रांतीकारकांनी पाश्चात्त्य गुलामगिरीच्या विरोधात स्वत:च्या प्राणांची चिंता न करता देशासाठी लढा दिला. अशा पाश्चात्त्य विकृतीच्या विरोधात लढणारे थोर राष्ट्रपुरुष, क्रांतीकारक यांचा देशाप्रतीचा त्याग आठवून भारतीय संस्कृती जोपासा, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे युवा संघटक श्री. सुमित सागवेकर यांनी केले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘३१ डिसेंबर या पाश्चात्त्य विकृतीला भारतभूमीतून हद्दपार करणे’ या विषयी प्रशिक्षणवर्गातील धर्मप्रेमींचे प्रबोधन करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला प्रशिक्षणवर्गातील ५५ हून अधिक धर्मप्रेमी जोडले होते.

नुकत्याच झालेल्या या ‘ऑनलाईन’ कार्यक्रमाचा आरंभ प्रार्थना आणि श्लोक यांनी  झाला. त्यानंतर श्री. सुमित सागवेकर यांनी सोदाहरण चर्चा करत भारतीय संस्कृतीचे महत्त्व, तसेच पाश्चात्त्य विकृतीपासून होणारी हानी स्पष्ट केली. त्यानंतर धर्मप्रेमींनी मुक्त संवाद करत उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला आणि नववर्ष गुढीपाडव्यालाच साजरे करण्याविषयी प्रतिज्ञा करत सर्वांचे प्रबोधन करणार असल्याचे सांगितले. काही धर्मप्रेमींनी उत्स्फूर्तपणे मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या शेवटी श्री. सुमित सागवेकर यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी लिहिलेल्या ‘केवळ हिंदु’ या कवितेच्या पंक्ती वाचून सर्वांमध्ये राष्ट्र-धर्माभिमान जागृत केला.

श्री. सुमित सागवेकर यांनी प्रखरपणे मांडलेली सूत्रे

१.  खोट्या ख्रिसमस झाडाची पूजा करण्याऐवजी हिंदु धर्मात सांगितल्याप्रमाणे खर्‍या झाडांची पूजा करून हिंदु धर्माची महानता अनुभवा.

२. कॉन्व्हेंट शाळांमुळे केवळ बालक नव्हे, तर पालकही ‘सेक्युलर’ झाले. त्यांचेही प्रबोधन करून त्यांना हिंदु संस्कृतीची महानता सांगायला हवी.

३. एका ‘मॉडेल’च्या छायाचित्राला ‘लाईक’ करणारे ख्रिस्ती पोप यांना ‘संत’ म्हटले जाते. याउलट हिंदु धर्मात मोठी संत परंपरा आहे. तेच खरे संत होय. चर्च या पोपना साहाय्य करते, तसेच त्यांचे कुकर्म लपवत असते.

४. ख्रिस्यांनी हिंदु धर्मियांचे केलेले बलपूर्वक धर्मांतर, ननवर होत असलेले अनन्वित अत्याचार, चर्चच्या काही फादरकडून झालेल्या अनैतिक कृती हे सर्व पहाता हिंदूंनी एक दिवसासाठी धर्मांतरित का व्हावे ?

. जे आपल्याला ख्रिस्ती नववर्षाच्या शुभेच्छा देतील, त्यांचे प्रबोधन करून गुढीपाडव्याचे शास्त्रीय, ऐतिहासिक आणि आध्यात्मिक महत्त्व समजावून सांगा आणि ‘आम्ही चैत्र शुद्ध प्रतिपदेलाच नववर्षाच्या शुभेच्छा देणार’, असे सांगण्याचा धर्माभिमान स्वतःमध्ये जागृत करा.

धर्मप्रेमींनी व्यक्त केलेले मनोगत

१. सौ. शीतल – आजच्या प्रवचनामुळे या विषयाची गंभीरता कळाली. पालक आपल्या मुलांना कॉन्व्हेंट शाळेत घालतात; पण त्यांना हे समजत नाही की, त्यांच्या पाल्याची किती हानी होत आहे.

२.  सुनिता आगरकर – आपण आपल्या धर्माचे रक्षण करायला हवे. ख्रिस्ती नववर्षाच्या प्रथांना बळी न पडता आपण आपले मित्र आणि नातेवाईक यांनाही यांच्या विरोधात सांगितले पाहिजे.

३. श्री. परमेश्वर आंधळे – ख्रिस्ती धर्मातील लोकांना आपले कोणतेही सण आवडत नाहीत, तर आपण कशाला त्यांचे सण साजरे करतो ? आपल्या गुढीचे वेगळेच वैशिष्ट्य आहे.

४. कु. प्रियंका जाधव – मराठी माध्यमातील शिक्षक उच्चशिक्षित असतात, तरीही आपल्याला आपल्या मुलांना मराठी शाळेत घालण्यासाठी न्यूनपणा वाटतो. आपण स्वदेशी उत्पादने वापरले पाहिजे.

५. सौ. तृप्ती पाटील – माझ्या पाल्यांना कॉन्व्हेंट शाळेत घातले होते; परंतु या प्रबोधनामुळे कॉन्व्हेंट शाळेच्या दुष्परिणामांची जाणीव झाली. आजपासून मी माझ्या पाल्यांना हिंदु धर्मानुसार संस्कार देण्यासाठी प्रयत्न करणार.

प्रशिक्षणवर्गातील धर्मप्रेमी युवतीचे धर्मांतर करणार्‍या ख्रिस्ती मुलींना सडेतोड उत्तर

‘ऑनलाईन’ कार्यक्रमात कु. आकांक्षा घाडगे यांनी त्यांच्यावर ओढवलेला धर्मांतराचा प्रसंग सर्वांसमोर मांडला. त्या म्हणाल्या, ‘‘एकदा जेव्हा मी बससाठी थांबले होते, तेव्हा दोन ख्रिस्ती मुली धर्मांतर करण्यासाठी माझ्याजवळ आल्या. ‘एकदा तुम्ही चर्चला येऊन पहा तुम्हाला पुष्कळ वेगळे वाटेल’, असे त्या म्हणाल्या. त्यावर मी त्यांना सांगितले की, मी माझ्या धर्माचे आचरण करते आणि मला कोणत्याही दुसर्‍या धर्मात जायचे नाही.’’ (धूर्त ख्रिस्ती विविध प्रकारे धर्मांतर करतात, हे या उदाहरणावरून लक्षात येते ! हिंदूंनी ख्रिस्त्यांच्या धूर्तपणाला बळी न पडता असाच धर्माभिमान बाळगायला हवा ! – संपादक)