‘अ‍ॅमेझॉन’कडून राज ठाकरे यांची क्षमायाचना ! – अखिल चित्रे, मनसे

महाराष्ट्रात मराठी भाषेचा वापर करायला आढेवेढे घेणार्‍या ‘अ‍ॅमेझॉन’ने मराठीचा आदर केला असता, तर ही वेळ आली नसती !

मनसे’चे अध्यक्ष राज ठाकरे आणि ॲमेझाॅनचे संस्थापक जेफ बेझॉस

मुंबई – ‘अ‍ॅमेझॉन’ने त्यांच्या सर्व ‘डिजिटल प्लॅटफॉर्म’वर मराठी भाषेचा समावेश करण्याचे आश्‍वासन दिले आहे. यासह ‘अ‍ॅमेझॉन’कडून राज ठाकरे यांच्याकडे क्षमायाचना करण्यात आली, अशी माहिती मनसेचे नेते अखिल चित्रे यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना दिली.

या वेळी अखिल चित्रे म्हणाले, ‘‘अ‍ॅमेझॉनने त्यांच्या संकेतस्थळ आणि भ्रमणभाष ‘अ‍ॅप’वर ‘मराठी भाषेत लवकरच आपण येत आहोत आणि क्षमस्व आहोत’, असे लिहिले आहे. त्यांनी मराठीद्वेष दाखवला तेव्हाच मनसैनिकांनी ‘अ‍ॅमेझॉन’ला सह्याद्रीचे पाणी पाजणार’, असे सांगितले होते. त्याचप्रकारे २५ डिसेंबरला काही फटाके फुटले आणि ‘अ‍ॅमेझॉन’ प्रशासन खडबडून जागे झाले.’’ (महाराष्ट्रात राहून मराठीला दुय्यम लेखणार्‍यांविषयी राज्यशासनानेही ठोस भूमिका घ्यावी ! – संपादक)

मनसेकडून सातिवली (जिल्हा पालघर) येथील ‘अ‍ॅमेझॉन’च्या कार्यालयाची तोडफोड

मुंबई – ‘अ‍ॅमेझॉन’ समवेत मराठी भाषेच्या वापराविषयी चालू असलेल्या वादातून मनसेच्या कार्यकर्त्यांनी २५ डिसेंबर या दिवशी पालघर जिल्ह्यातील वसई पूर्वेकडील सातिवली येथील ‘अ‍ॅमेझॉन’च्या कार्यालयाची तोडफोड केली. या प्रकरणी पोलिसांनी ७ जणांवर गुन्हा नोंदवला आहे.