एका संघटनेला दिसते ते सर्व यंत्रणा हाताशी असलेल्या प्रशासनाला का दिसत नाही ?
मडगाव, २२ डिसेंबर (वार्ता.) – येथील मोतीडोंगर या ठिकाणी राजकीय वरदहस्ताने अवैध बांधकामे होत असल्याचा आरोप परशुराम गोमंतक सेनेेने केला आहे. मोतीडोंगरावर उच्च न्यायालयाचा आदेश पायदळी तुडवत अवैधरित्या अनेक बांधकामे चालू आहेत. यातून धार्मिक तेढ निर्माण करायची नाही; परंतु समाजाला घातक प्रवृत्ती या ठिकाणी पोसली जात आहे. राजकारण्यांच्या वरदहस्तामुळे केवळ मतपेढीसाठी केल्या जाणार्या या अवैध वस्तीवर कारवाई करावी, अशी मागणी परशुराम गोमंतक सेनेचे अध्यक्ष श्री. शैलेेश वेलिंगकर यांनी केली आहे. मडगाव येथे श्री परशुराम गोमंतक सेनेने घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
या वेळी ते म्हणाले, ‘‘मोतीडोंगर येथे अवैध बांधकामे होत असल्याने अवैधपणे रहाणार्या वसाहतीत वाढ होत आहे. अनेक समाजविघातक कामे करणार्या व्यक्ती मोतीडोंगराचा आसरा घेतात, हे या आधीही समाजासमोर आले आहे. राजकारणी मतांसाठी या अवैध बांधकामांकडे दुर्लक्ष करून समाजाला घातक ठरणार्या व्यक्तींना आसरा देत आहेत. ते स्वतःच्या लाभासाठी लोकांची सुरक्षा धोक्यात घालत आहेत. या सर्वांमध्ये मडगावचे आमदार दिगंबर कामत यांचाही सहभाग आहे. वर्ष २०१३ पासून मोतीडोंगरावरील अवैध बांधकामामध्ये वाढ झाली आहे. सध्या १०० हून अधिक भूखंडांवर बांधकामे चालू असून मोतीडोंगरावरील गुंड प्रवृत्तीला आमचा विरोध आहे. मोतीडोंगरावरील अनेक व्यक्तींनी मतदारसूचीतही चुकीच्या पद्धतीने नावे घालून घेतलेली आहेत. या भागातील घरांना नगरपालिकेकडून क्रमांक दिलेले नसतांनाही बनावट घर क्रमांकावर रेशन कार्डही बनवण्यात आलेली आहेत. येथील गटविकास अधिकारी गेली १० ते १५ वर्षे निष्क्रीय असल्याने हे प्रकार होत आहेत. निवडणूक आयोगाकडून मतदारसूचीची फेरतपासणी करून दुहेरी नावनोंदणी आणि बनावट कागदपत्रे यांद्वारे नाव नोंदवलेल्या व्यक्तींवर कारवाई करावी. आम्ही राज्यातील सर्व धर्मियांचा आदर करतो; परंतु सामाजाला घातक असलेल्या प्रवृत्तींवर कारवाई करून राज्यशासनाने हे शासन ‘सेटींग’चे नाही (म्हणजे तत्त्वनिष्ठ आहे), हे दाखवून द्यावे.’’