आरोंदा (सिंधुदुर्ग) येथील श्री सातेरी भद्रकाली देवतांचा जत्रोत्सव

संकलक : श्री. वासुदेव डुबळे, आरोंदा, सिंधुदुर्ग.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील आरोंदा येथील श्री देवी सातेरी भद्रकालीचा जत्रोत्सव मार्गशीर्ष शुक्ल पक्ष चतुर्थीला साजरा केला जातो. या वर्षी हा जत्रोत्सव १८ डिसेंबर २०२० या दिवशी साजरा होत आहे.

श्री देवी सातेरी भद्रकाली, श्री देव ब्राह्मण, पुरमार, रवळनाथ, वेतोबा या सर्व देवांची मिळून ही एकत्र जत्रा असते. श्री देवी सातेरी, भद्रकाली, ब्राह्मण (श्री काळभैरवाचे लिंग) ही स्वयंभू आणि अनादि देवस्थाने आहेत. त्यांच्या स्थापनेविषयी कुणालाही काहीही ठाऊक नाही.

श्री सातेरी भद्रकाली देवतांची मंदिरे

या मंदिराचा सभामंडप आणि बांधकाम अनुमाने ३५० वर्षांपूर्वीचे आहे. त्याचप्रमाणे श्री सातेरी आणि श्री भद्रकाली या दोन्ही देवींचे एकत्रित मंदिर हे आरोंदा गावचे वैशिष्ट्य आहे. यामधील श्री देवी सातेरी ही उत्तराभिमुख आणि श्री देवी भद्रकाली ही पूर्वाभिमुख आहे. श्री देवी सातेरीच्या अग्रशाळेच्या कोनाड्यातून भद्रकाली देवीचे गर्भागार दिसते, अशी येथील वास्तूरचना आहे.

या मंदिर परिसरानजीक श्री देव रवळनाथ, वेतोबा, दाडसांखळ, काज्रोबा ही नवसाला पावणारी जागृत देवस्थाने आहेत. नवसाला पावणारी देवी म्हणून श्री सातेरी भद्रकाली देवी प्रसिद्ध आहे. सासरी नांदायला गेलेल्या आरोंदा गावच्या सर्व सुवासिनी देवीची ओटी भरण्यासाठी या जत्रेला आर्वजून येतात. देवीची ओटी भरण्यासाठी जत्रेच्या दिवशी सकाळी १० वाजल्यापासून दुसर्‍या दिवशी संध्याकाळपर्यंत गावागावांतून भक्तगण येतात.

जत्रेच्या दिवशी सर्व देवतांवर ब्राह्मणांकरवी अभिषेक केला जातो. दुपारी ब्राह्मणभोजन आणि श्री देवीस नैवेद्य दाखवला जातो. रात्री ११ वाजता श्री देवीची पालखी घोड्यासह वाजत-गाजत काढली जाते. श्री देवी भद्रकाली, पुरमार, ब्राह्मण, सातेरी अशा सर्व मंदिरांना प्रदक्षिणा घालून पालखी श्री भद्रकालीदेवीच्या देवळाजवळ रात्री १ वाजण्याच्या सुमारास येते. यानंतर दारूकामाची (फटाक्यांची) आतषबाजी होते आणि त्यानंतर दशावतार नाट्यमंडळाचा नाट्यप्रयोग होतो.

जत्रोत्सवाच्या दुसर्‍या दिवशी पहाटे दहीहंडी फोडून काला होतो. ‘श्रीकृष्ण देवतळ्या’त आंंघोळ करून जत्रोत्सव पूर्ण होतो. दुसर्‍या दिवशी भक्तांच्या नवसाप्रमाणे गुळाचा तुलाभाराचा कार्यक्रम असतो. देवस्थानचे विश्‍वस्त मंडळाचे अध्यक्ष म्हणून श्री. बबन गणेश नाईक, तर विश्‍वस्त म्हणून समस्त नाईक परिवार सेवा पहातात.

कोरोनाविषयीचे नियम पाळण्याचे आवाहन

यावर्षी जत्रोत्सव कोरोनाविषयीचे नियम पाळून साध्या पद्धतीने साजरा करण्यात येणार आहे. त्यामुळे जत्रोत्सवाच्या दिवशी भाविकांनी गर्दी न करता कोरोनाविषयीचे नियम पाळून दर्शन घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.