बहुतांश तरुणी स्वतःहून संबंध ठेवतात अन् प्रेमभंग झाल्यावर बलात्काराची तक्रार करतात ! – छत्तीसगड महिला आयोगाच्या अध्यक्षा किरणमयी नायक

पूर्वी भारतीय स्त्री ही पावित्र्य, शालीनता आणि नीतीमत्ता यांची प्रतीक समजली जात होती; मात्र भारतीय स्त्रीचे अधःपतन पहाता समाजातील नैतिकता किती रसातळाला गेली आहे, हेच यातून लक्षात येते ! समाजाला आतापर्यंतच्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांनी साधना न शिकवल्याचाच हा परिणाम आहे !

किरणमयी नायक, अध्यक्ष, छत्तीसगड महिला आयोग

रायपूर (छत्तीसगड) – बहुतांश मुली आधी स्वतःहून संबंध ठेवतात आणि प्रेमभंग झाल्यानंतर पुरुषांवर बलात्कार केल्याचा आरोप करतात, असे विधान छत्तीसगड राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा किरणमयी नायक यांनी केले आहे. त्या पत्रकारांशी बोलत होत्या.

किरणमयी नायक म्हणाल्या की,

१. बहुतांश घटना अशा आहेत की, ‘लिव्ह इन’मध्ये राहून सहमतीने संबंध ठेवल्यानंतरही मुली बलात्काराच्या तक्रारी करतात. मी महिला आणि मुली यांना आवाहन करते की, त्यांनी आधी नाते समजून घ्यावे. जर तुम्ही अशा प्रकारच्या नातेसंबंधांमध्ये आहात, तर त्याचा परिणाम वाईटच होईल.

२. जर एखादी विवाहित व्यक्ती एखाद्या तरुणीसमवेत विवाहबाह्य संबंध ठेवत असेल, तर अशा वेळी तरुणींनी हे बघायला हवे की, ती व्यक्ती तिला जगण्यासाठी साहाय्य करणार आहे कि नाही ? पण जेव्हा असे संबंध तुटतात, तेव्हा बहुतांश घटनांमध्ये तरुणी पोलीस ठाण्यात धाव घेतात.

३. अल्पवयीन असणार्‍या मुलींना माझा सल्ला आहे की, कोणत्याही प्रेमाच्या जाळ्यात तुम्ही फसू नका. अशाने तुमचे कुटुंब, मित्र आणि तुमचे पूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकते. हल्ली १८ व्या वर्षीच विवाह करण्याचे प्रमाण वाढले आहे. पुढे काही वर्षांनंतर जेव्हा मुले होतात, तेव्हा दांपत्याला समवेत रहाणे अवघड होत आहे.

४. अधिकाधिक कौटुंबिक वाद सोडवण्याचे आयोगाचे प्रयत्न आहेत. त्यामुळेच आम्ही महिला आणि पुरुष यांना त्यांच्या चुकांवरून समज देत असतो. त्यांनी मार्ग काढावा, यासाठी प्रयत्न करतो. समुपदेशन हाच मार्ग आहे.